काँग्रेसचे अध्यक्ष बदलत राहिले पण तिजोरीच्या चाव्या व्होरांच्या हातातच राहिल्या.

९ मार्च १९८५ मध्यप्रदेश विधानसभेचा निकाल हातात आला होता. काँग्रेसचे मुख्यमंत्री अर्जुनसिंग यांनी शपथ देखील घेतली होती. अचानक त्यांना दिल्लीत पंतप्रधानांचे मंत्रिमंडळाची यादी बनवण्यासाठी म्हणून बोलवणे आले.

अर्जुनसिंग तिथे पोहचले आणि त्यांना कळालं की आपल्याला पंजाबचा राज्यपाल बनवण्यात आलं आहे. असे तडकपडकी निर्णय ही राजीव गांधी यांच्या राजकारणाची स्टाईलच होती. अर्जुन सिंग यांना मुख्यमंत्रीपदाच्या दुसऱ्याच दिवशी राजीनामा द्यावा लागणार हा मोठाच धक्का होता.

पण ते ही काही कच्चे खिलाडी नव्हते. त्यांनी हा धक्का पचवला आणि लगेच आपल्या मुलाला अजयसिंगला आणायला विमान पाठवून दिल. अर्जुनसिंग यांनी त्याला एकच निरोप दिला होता,

“येताना सोबत मोतीलाल व्होरा यांना घेऊन ये. “

मोतीलाल व्होरा मध्यप्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांना विमानात बसल्या बसल्या अजयसिंगनी वडलांच्या राजीनाम्याचं सांगितलं. व्होरानीं अंदाज केला की आता अजयसिंग पुढचे मुख्यमंत्री असणार. त्यांनी सवयीप्रमाणे त्यांना गुळ लावण्यास सुरवात केली. पुढच्या मंत्रिमंडळात आपलं स्थान पक्कं करण्याच वचन त्यांनी घेतलं.

विमान दिल्लीला लँड झालं. तिथे विमानतळावर अर्जुनसिंग भेटले. राजीव गांधी देखील तिथेच होते. त्यांचा रशियाचा दौरा होता म्हणून ते विमानाची वाट बघत होते. मोतीलाल व्होरा यांना राजीव गांधीनी जवळ बोलावलं आणि एकच वाक्य म्हणाले,

“‘आप अब मुख्यमंत्री हैं.’”

मोतीलाल व्होरा याना कळायचं बंद झालं. मंत्रिपदासाठी लॉबीयिंग करणारे व्होरा एकदम मुख्यमंत्री बनले.

ते मूळचे राजस्थानचे मारवाडी. त्यांचं कुटुंब व्यवसायच्या निमित्ताने मध्यप्रदेशला दुर्ग येथे आलं होतं. मोतीलाल व्होरा मात्र घरच्या उद्योगात न पडता पत्रकार बनले. सायकलवरून फिरायचे आणि बातम्या गोळा करून नवभारत टाइम्समध्ये छापून आणायचे. पुढे प्रत्येक पत्रकाराला महत्वाकांक्षा असते त्याप्रमाणे समाजकारण करू लागले.

१९६८ साली पहिल्यांदा नगरसेवक पदाची निवडणूक प्रजा समाजवादी पार्टी कडून लढवली.निवडून देखील आले. त्याकाळी मुख्यमंत्री होते द्वारकाप्रसाद मिश्र. दुर्गचे आमदार त्यांच्या विरोधी गटातले होते. त्यांनी त्यांचं तिकीट कट केलं आणि नवीन उमेदवार शोधत होते तेव्हा कोणी तरी या तरुण पत्रकारच नाव सुचवलं. मुख्यमंत्री म्हणताहेत तर मोतीलाल व्होरा पक्ष बदलून काँग्रेस मध्ये आले. त्यांना तिकीट मिळालं, निवडून देखील आले.

मुख्यमंत्र्याचा विश्वास सार्थ ठरवलं, मध्यप्रदेशच्या राजकारणात आपली छाप पाडायला त्यांनी सुरवात केली होती.

१९७२ सालची गोष्ट. तेव्हाचे मुख्यमंत्री पी.सी.सेठी यांनी त्यांना परिवहन मंडळाचा उपाध्यक्ष बनवलं होतं. एकदा परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी टूम काढली की मोठमोठ्या शहरात जाऊन गाड्यांचे स्पेअरपार्टस बनवणाऱ्या कंपन्यांना भेट द्यायची. पण अध्यक्ष जाजू हे वयस्कर होते. त्यांनी आपल्या ऐवजी व्होरानां त्या टीमसोबत पाठवायचं ठरवलं.

व्होरानी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि तो कार्यक्रमच रद्द करून टाकला,

“जिसे अपना माल बेचना होगा, वह खुद मेरे पास चलकर आएगा.” 

मोतीलाल व्होरा असा चाप्टर माणूस. पत्रकारितेत असल्यामुळे मोतीलाल व्होरा यांना राजकारणाची दिशा कशी बदलते याचा अंदाज होता आणि व्यापारी कुटुंबातून असल्यामुळे नफा तोट्याची गणिते कळत होती. यामुळे मोतीलाल व्होरा आयुष्यभर आपल्या निष्ठा वाहिल्या आणि त्या जोरावर मोठ्या भराऱ्या मारत राहिले.

त्या काळात देखील अर्जुन सिंग यांच्याबरोबर दिग्विजय सिंग आणि कमलनाथ हेच मध्यप्रदेशचे मोठे नेते होते. मोतीलाल व्होरा यांनी या पैकी अर्जुनसिंग यांचा गट पकडला होता. याचमुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी देखील लागली होती.

व्होरा यांनी अर्जुनसिंग सांगितलं तसा कारभार केला, त्यांच्या विरोधकांना नामोहरम केलं. पण हळूहळू स्वतःचा गट देखील बनवायला सुरवात केली. अचानक राजीव गांधींची लहर फिरली, अर्जुन सिंग पुन्हा मुख्यमंत्रीपदी आले.

त्यांनी मोतीलाल व्होरा यांना केंद्रात आरोग्यमंत्री म्हणून आणलं. मध्यप्रदेशाच्याच नाही तर देशातल्या मोठ्या नेत्यांच्या यादीत मोतीलाल व्होरा अलगद जाऊन बसले. मोतीलाल व्होरा यांनी आता गांधी घराण्याची मने जिंकली होती. दिल्लीच्या श्रेष्टींमध्ये त्यांचं नाव चर्चेत असायचं.

परत जेव्हा दिग्विजय सिंग, अर्जुनसिंग, माधवराव शिंदे, कमलनाथ यांची भांडणे सुरु झाली तेव्हा त्यांच्यातील एखाद्याला मुख्यमंत्रीपद देण्याऐवजी व्होराना देण्यात आलं.

ज्या अर्जुनसिंग यांचे निष्ठावन्त म्हणून ओळखले जायचे त्यांचंच मुख्यमंत्रीपद मोतीलाल व्होरा यांनी खाऊन टाकलं. पक्का मारवाडी माणूस राजकारणाची सगळी छक्के पंजे ओळखून होता.

पुढे जेव्हा राजीव गांधींच्या मृत्यूनंतर केंद्रात पंतप्रधान पदासाठी स्पर्धा सुरु झाली तेव्हा अर्जुनसिंग यांच्या विरुद्ध नरसिंह राव यांना सगळी मदत राज्यातून मोतीलाल व्होरा पुरवत होते. नरसिंहराव पुढे पंतप्रधान बनले आणि त्यांनी व्होरा यांच्या उपकाराची व्यवस्थित परतफेड केली.

१९९८ साली सोनिया गांधी राजकारणात आल्या तेव्हा त्यांच्यापाठीशी राहणाऱ्या नेत्यांमध्ये मोतीलाल व्होरा आघाडीवर होते. राजीव गांधींच्या काळापासून आपली निष्ठा गांधी घराण्यामागे कशी आहे हे त्यांनी पटवून दिलं.

तिथून पुढचे वीस वर्ष काँग्रेसवर त्यांनी राज्य केलं. अहमद पटेल सोनिया गांधींचे खास विश्वासू होते पण तिजोरीच्या मेन चाव्या मोतीलाल व्होरा यांच्याकडेच असायच्या. एवढेच काय तर नॅशनल हेराल्डच्या केसमध्ये राहुल गांधी,सोनिया गांधी यांच्या बरोबर त्यांचं देखील नाव होतं.

अगदी जख्ख झालेल्या मोतीलाल व्होरा यांचा हात धरून राहुल गांधी काँग्रेस कार्यालयात येत आहेत हे चित्र अनेकदा पाहण्यात येत असायचं. काँग्रेस ओल्ड गार्ड अशी ज्यांची ओळख होती ते मोतीलाल व्होरा. नरसिंह राव यांच्या पासून ते सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यापर्यंत प्रत्यके हायकमांडचे विश्वासू राहिले.

जेव्हा राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा सोनिया गांधी परत येईपर्यंत मोतीलाल व्होरा यांच्याकडे तात्पुरते अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. पुन्हा आता सोनिया गांधींच्या राजीनाम्याची चर्चा सुरु झाली होती तेव्हा भावी काँग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेत मोतीलाल व्होरा वयाच्या ९३ व्या वर्षी  धावताना दिसत होते.

आज त्यांचे निधन झाले. अहमद पटेल यांच्या पाठोपाठ गांधी घराण्याचा सर्वात मोठा शिलेदार काँग्रेसने हरपला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.