उंची मोजली राधानाथ सिकदर यांनी पण नाव झालं जार्ज एव्हरेस्टचं..
जगातलं सर्वोच्च शिखर म्हणजे माउंट एव्हरेस्ट हे तर आपल्याला तोंड पाठ असतंय. एडमंड हिलरी तेनसिंग नोर्गेनी पहिल्यांदा हा शिखर सर केला वगैरे आपण शाळेत असताना शिकलो पण एव्हरेस्टचं नाव एका ब्रिटीश अधिकाऱ्यामुळे पडलं हे तुम्हाला माहिती आहे का?
सर जॉर्ज एव्हरेस्ट.
थांबा थांबा. या जॉर्ज एव्हरेस्टने जगातल्या शिखराचा शोध लावला असा गैरसमज करून घेऊ नका. बिचाऱ्या जॉर्ज एव्हरेस्टने माउंट एव्हरेस्ट काळा की गोरा हे पण बघितल नव्हत. मग त्याच नाव का दिल? काय आहे त्याची स्टोरी? प्रश्न लई आहेत. उत्तर सांगतो.
तर झालं असं की ४ जुलैला इंग्लंडच्या ग्रीनिच प्रांतात एव्हरेस्ट नावाच्या जमीनदार घराण्यात एक खोडकर बालक जन्माला आलं, त्याच नाव जॉर्ज. हा जॉर्ज शाळेत काही खूप हुशार नव्हता. पण बाबांनी वशिला लावून त्याला रॉयल आर्मी स्कूलमध्ये ॲडमिशन मिळवून दिला. तिथे पुढे त्याच शिक्षण झालं. ते पूर्ण झाल्यावर सैन्यात भरती झाली. त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या मोहिमेवर पाठवून देण्यात आलं.
जॉर्ज एव्हरेस्ट कोलकात्याला आला. तिथे बंगाल आर्टीलरीमध्ये त्याची नेमणूक सेकंड लेफ्टनंट म्हणून झाली. भारतात आल्यावरचा सुरवातीचा काळ त्याने कायम गणिताचा आणि खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात घालवला.
त्याची ही आवड, त्याच्या या टलेंटची चर्चा वरच्या अधिकाऱ्याकडे गेली. त्यांनी ठरवलं गडी कामाचा आहे, पाठवा त्याला सर्वेच्या कामाला. आधी जावा बेटावर पाठवलं मग त्याची रवानगी ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्वे (GTS)मध्ये करण्यात आली.
ब्रिटीशांनी भारतात येऊन वाट लावली वगैरे आपण म्हणतो खर पण तेवढंच आपल्या प्रगतीसाठी कामही केलं. (त्यांच्या स्वार्थासाठी का असेना)
आसिंधुहिमाचल आपला देश पसरला आहे असं आपण पूर्वापार म्हणत आलोय पण नेमक भारत देशात किती गावे आहेत, किती नद्या आहेत, त्या कुठून वाहतात, इथे किती पर्वत आहेत, त्यांची शिखरे किती उंच आहेत हे सगळ पहिल्यांदा इंग्रजांनी मोजलं तेही अठराव्या शतकात.
अजून संपूर्ण भारतावर त्यांच राज्य स्थापन झालं नव्हतं पण त्यांनी हा सर्वेक्षण सुरु केल होत. यात त्यांचा स्वतःचा सुद्धा फायदा होता. ज्या अजस्त्र पसरलेल्या देशावर त्यांना राज्य करायचं होतं त्या देशाचा संपूर्ण आराखडा हाताशी असणे गरजेचे होते आणि म्हणूनच एव्हरेस्ट सारख्या चळवळ्या अधिकाऱ्यांना घेऊन ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्वे करण्यात आला.
जॉर्ज एव्हरेस्टने गंगा नदीची लांबी मोजणे, बनारस ते कलकत्ता या दरम्यानच्या गंगेच्या खोऱ्याची इत्यंभूत माहिती काढणे हे काम केले. यामुळे इम्प्रेस झालेल्या GTS चे प्रमुख कर्नल विल्यम लँबटन यांनी एव्हरेस्टची नेमणूक आपला चीफ असिस्टंट म्हणून केली.
या काळात जॉर्ज एव्हरेस्टने प्रचंड काम केले. भारतातल्या कानाकोपऱ्यातल्या दऱ्याखोऱ्यात फिरला. इथल न मानवणार हवामान, या कामासाठी लागणारे प्रचंड श्रम, वेळोवेळी येणाऱ्या साथी यामुळे बऱ्याचदा आजारी पडला, पण थांबला नाही. आपण घेतलेली जबाबदारी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची हे लष्करी संस्कार त्याच्यावर होते. पुढे ग्रेट ट्रिगनॉमेट्रिक सर्वेचा हेड त्याला बनवण्यात आलं, काही वर्षांनी सर्वेअर जनरल ऑफ इंडिया या मानाच्या खुर्चीवर तो जाऊन बसला.
त्याच्याच काळात हिमालयातील शिखरे मोजण्यास सुरवात करण्यात आली. तेव्हा कळाल की हिमालय हा जगातला सर्वात उंच पर्वत आहे. यातलच एखाद शिखर असेल जे जगातलं सर्वोच्च उंचीच असेल. भारतातल्या काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेश एवढा लांब पसरलेला हिमालय, त्याच सर्वेक्षण करायचं तरी कसं?
हिमालयाचे काही उंच शिखरे नेपाळ मध्ये होती. त्या काळात नेपाळमध्ये ब्रिटीश अधिकाऱ्यांना घुसू दिल जायचं नाही. नेपाळच्या राजाला वाटायचं की हे परदेशी लोक आपल राज्य गिळंकृत करतील. तरी पण भारतातून जेवढे शक्य आहे त्या पद्धती वापरून हिमालयातील शिखरांची उंची मोजणे चालू झालं. जॉर्ज एव्हरेस्टने आपल्या ज्युनिअर्सची एक भारी टीम बनवली होती, त्यात होता अँड्र्यू स्कॉट वॉ.
आयुष्यभर भारतभर फिरून मलेरिया, पॅरालीसीस अशा अनेक असाध्य रोगांशी सामना केलेला जॉर्ज एव्हरेस्ट आता बहुतांशी ऑफिसमध्ये बसून ॲड्मिनीस्ट्रेशनचं काम पहात होता. त्यावेळी त्याची टीम हिमालयात चकरा मारत होती. टीममध्येचं एक भारतीय गणिततज्ञ देखील होता. त्याच नाव राधानाथ सिकदार. कालांतराने जॉर्ज एव्हरेस्ट रिटायर झाला, आपल्या देशाला निघून गेला.
त्याच राहिलेलं काम अँड्र्यू स्कॉट वॉने पुढे चालवले. त्याकाळात कांचनगंगा हे जगातील सर्वोच्च शिखर मानलं जात होतं. पण राधानाथ सिकदार यांनी आपल्या आकडेमोडीने जगात पहिल्यांदा दाखवून दिल की कांचनगंगा पेक्षाही उंच एक शिखर हिमालयात अस्तित्वात आहे. त्याकाळात त्या शिखराला कोणतेही नाव नव्हते.
स्थानिक लोक वेगवेगळ्या नावानी हाक मारायचे, ऑफिशियली पिक बी असे नाव होते. पुढे जसेजसे मोजणीचे काम पुढे सरकल्यावर याचे पीक XV असे नामकरण केले.
१८५२ साली अधिकृतरित्या पीक XV ला जगातील सर्वोच्च शिखर म्हणून घोषित करण्यात आले.
त्याची अचूक उंची मोजणार्या राधानाथ सिकदार यांचं नाव या शिखराला देणे जास्त संयुक्तिक ठरले असते पण त्यांचा बॉस अँड्र्यू स्कॉट वॉने आपल्या गुरुच्या कार्याचा सन्मान म्हणून या शिखराचे नामकरण माउंट एव्हरेस्ट करावे असा प्रस्ताव मांडला.
या नावाबद्दल अजून एक वाद असाही झाला की हे नाव उच्चारायला अवघड आहे. इंग्लंडमध्ये जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नावाचा खरा उच्चार इव्हरेस्ट असा होतो पण भारतात व इतर सगळीकडेच एव्हरेस्ट हाच उच्चार रूढ झाला.
तसही जर सर जॉर्ज एव्हरेस्ट नसते तर त्याकाळात ना हिमालयाचा सर्वे झाला असता ना राधानाथ सिकदार त्यात असते ना एव्हरेस्ट जगातला सर्वोच्च शिखर आहे हे कळाल असत. त्यामुळे राधानाथ सिकदार यांचा देखील आपल्या साहेबाच्या नावाला आक्षेप नव्हता.
१८६५ साली रॉयल जॉग्राफिकल सोसायटीने अधिकृत रित्या माउंट एव्हरेस्ट या नावावर शिक्कामोर्तोब केला.
पण दुर्दैव असं की जॉर्ज एव्हरेस्ट यांना कधी आपल नाव असलेल्या शिखराच दर्शन घेता आलं नाही. त्यांच नाव देण्यात आल्यानंतर एक वर्षातचं १ डिसेंबर १८६६ साली त्यांच निधन झालं.
जॉर्ज एव्हरेस्ट यांचं मसुरी येथील सुंदर घर भारत सरकारने त्यांच स्मारक म्हणून घोषित केलं आहे. असं म्हणतात की जगातल्या सर्वात उंच शिखराच माप मोजण्याची प्रेरणा असणाऱ्या, अखंड भारताच्या सर्वेक्षणाचा सिंहाचा वाटा असणाऱ्या सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी आपल्या गावाकडे आपल्या शेताचं माप चुकवून ठेवलेलं. आपला उस गेला की नांगर मारताना शेजारच्याचा बांध मारायचा ही पद्धत फक्त आपल्याकडे आहे असं नाही.
हे ही वाच भिडू.
- कधीही भारतात पाऊल न ठेवलेल्या माणसाने देशाचे तुकडे केले होते !
- मराठा साम्राज्याच्या नाशास कारणीभूत ठरलेल्या माणसानेच आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला !
- ते वयाच्या ४८ व्या वर्षी व्यवसायात उतरले, आज त्यांचा एवरेस्ट पाईप्सचा ब्रॅण्ड आहे.