प्रेक्षक ‘राजी’ तो…

 

१९७१ चा काळ. ‘भारत-पाकिस्तान’ हे सक्खे शेजारी पण पक्के वैरी देश. त्यांच्यात सतत ‘तुझी लाल की माझी’ यावरूनच सततच्या मारामाऱ्या. पाकिस्तानच्या एका अंगाला अल्लगच बिऱ्हाड थाटायचं असतं. त्या (ब)अंगाला भारत पाठिंबा देतो आणि मग पुन्हा मारामाऱ्या सुरू. या सर्व पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानात पाठवलेल्या गुप्तहेराची स्टोरी म्हणजे ‘राजी’. ही गुप्तहेर ‘आलिया भट’ आणि भारत पाकिस्तानच्या मारामाऱ्या या आपल्या दोन जिव्हाळ्याच्या  विषयांसाठी ‘राजी’ हा सिनेमा बघितला जाऊ शकतो. यातला पहिला विषय थेटरातली विशीतल्या मुला-मुलींची गर्दी पाहता मार्गी लागलेला  आहे. बहुतेक त्यामुळेच दुसऱ्या विषयाकडे फारसं गांभिर्याने बघण्याची तसदी दिग्दर्शक मेघना गुलजार यांनी घेतलेली दिसत नाही.

सत्तरच्या दशकामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये मोठी राजकीय स्थित्यंतरं घडली. ‘बांगलादेश मुक्तीजुद्धो’ (liberation war) ही त्यातली प्रमुख घटना. बांगलादेश स्वतंत्र होण्याची काय कारणं, त्यामागच्या राजकीय उलथापालथी या सगळ्या घटनाक्रमाला चित्रपटात बगल देण्यात आली आहे. पटकथा घडते ती मुख्यतः काश्मिर आणि पाकिस्तानातील रावळपिंडी इथं. ७१ चा काळ उभा करण्यासाठी बंद खोल्यांमध्ये, रावळपिंडीच्या काही ठराविक रस्त्यांवर बहुतेक घटनाक्रम चित्रित केलेला आहे. त्यातील माणसंही बऱ्यापैकी टिपिकल आणि आपल्या पूर्वकल्पनेनुसारच वागतात. ‘देशभक्ती’ आणि ‘कुटुंबाचं प्रेम’ या दोन तारेवरची कसरत खरंतर दिग्दर्शकाला मांडायची आहे. काही ठिकाणी ते तोडीस तोड उतरलेलंही आहे, पण कुठेच त्यातल्या अंतर्विरोधाचं चित्रीकरण नाही. जे असेल ते आपण आलिया भटच्या डोळ्यात वाचायचं. विषय आणि कथेचा आत्मा हा खूप संवेदनशील आणि बहुआयामी आहे, पण पटकथेत आणि चित्रीकरणात त्याचं ‘एकरेषीय सामान्यीकरण’ झालेलं आहे. ‘राजी’ एक बरा थ्रिलर आहे.

हिचकॉकच्या “there is no thrill in the bang, but in the anticipation of it.” या नियमानुसार धडधड वाढवणारे बरेच प्रसंग चित्रपटात घडतात, पण ते अपेक्षितच असतात. आता नवीन ‘थ्रिल’ तरी काय देणार असा प्रश्न साहजिकच आहे. प्रत्येक दिग्दर्शकाने एका गोष्टीचा विचार करणं गरजेचं की, आपल्याकडे प्रेक्षकांनी असे किमान १० सिनेमे तरी पाहिलेले असतात. त्यामुळे आपणही तेच प्रसंग उभे करून नेमकं काय साध्य करतोय ?

‘राजी’ मधल्या सेहमतच्या (आलिया भट) एक नवविवाहित स्त्री आणि गुप्तहेर या दोन परस्परमारक भूमिकांमधल्या संघर्षाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. जो की पटकथेचा जीव असायला हवा होता. शिवाय गोष्टीचा हा मुद्दा आपल्याकडे नवीनही आहे, पण त्याचं रूपांतर एका साध्या थरारपटात करण्यात आलंय. ‘सेहमत’ जे काही करतेय, ते करताना तिची घटकाभरही कोंडी होत नाही. देशभक्तीच्या नावाखाली आपण कुठल्या थराला चाललो आहोत हे तिला कळत नसावं का? रक्ताच्या थेंबानेही चक्कर येणारी सेहमत पुढे आपल्या सर्व्हायव्हलसाठी दुसऱ्याच्या जीवाचीही कदर करत नाही. हा बदल मोठ्या ताकतीने दाखवता आला असता. अशा परिस्थितीतल्या लोकांचा  घरदार, जमीन, देश या संकल्पनांवरचा विश्वासच खरंतर उडायला पाहिजे, पण तशी अपेक्षा आपण बॉलिवूडच्या खपाऊ फॅक्टरी कडून न केलेलीच बरी.

अतिशय चांगली आणि नवीन संकल्पना असलेली पटकथा  सामान्यीकरणात वाया गेली  की फार त्रास होतो. मागे ‘मद्रास कॅफे’ नावाचा सिनेमाही असाच वाया गेल्याचं वाईट वाटलं होतं. यामागे नेमकी काय गोम असावी? राजकीय घटनांमागचं खरं वास्तव आणि एका गुप्तहेराची घुसमट लोकांना नको आहे का? त्यांना काहीतरी “greater good” चं वेष्टन, जे या सिनेमात “देशभक्ती”आहे ते लागतंच का? ‘मद्रास कॅफे’ आणि ‘राजी’ हे दोन्ही चित्रपट देशकाल ओलांडून व्यक्तिवादी चित्रपटातले मैलाचे दगड ठरू शकले असते, पण त्यांचे निव्वळ थिल्लरपट झाले. “आपला प्रेक्षक तेवढा प्रौढ नाही” हे कारण किती दिवस आपण ऐकायचंय? माझा एक मित्र म्हणतो त्याप्रमाणे “आपल्याकडेही तेच लागतं, जे बाहेर पाश्चिमात्य प्रेक्षकांना लागतं. फरक एवढाच आहे की आपल्याला तेच सर्व भरपूर “डायलूटेड” लागतं.” पण आता पहिल्या धारेची तयारी लवकर करायला पाहिजे.

बाकी, ‘आलिया भट’ या चित्रपटाची नुसती  ‘हिरोबिरो’ नाहीच, तर खरी ‘युनिक सेलिंग पॉईंट’ आहे. तिची निवड आणि कामातली हुशारी इतकी तडाखेबाज आहे, की पुढे ती ‘पॉप्युलर’ हिंदी सिनेमातल्या अभिनयाचा मापदंड ठरू शकेल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.