TRAPPED : ३५ व्या मजल्यावर लॉकडाऊन होण्याची गोष्ट

तुम्हाला कदाचित या गोष्टीची जाणिव नसेल पण लिहण्याची देखील मक्तेदारी आहे. तेच तेच लोक लिहीत राहतात आणि आपण वाचत राहतो. पण आपण कधी लिहायचं धाडस करत नाही.

लिहायचं धाडस करायला हवं म्हणून “बोलभिडू” मार्फत या पाच सिनेमांवर लिहण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली.

याचा उद्देश सिनेमांहून अधिक कधी न लिहणाऱ्या भिडू लोकांनी मनमोकळेपणाने लिहावं हाच होता. आपण लिहते झाला. या पाच पैकी एक सिनेमा हा “ट्रप्ड”. या सिनेमाबद्दल जे लेख आले ते सर्व लेख खाली दिलेले आहेत.

आत्ता एक काम करायचं, ज्यांचा लेख उत्तम आहे अस वाटतं त्यांना तुम्हीच मार्क द्यायचे. लोकप्रिय असणाऱ्या लेखांना दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स देणार आहोत. एका सिनेमावरचा एक सर्वोत्तम लेख.

वाचा आणि तुम्हीच सांगा यापैकी सर्वात्तम लेख कोणता. ज्याच्या नावाने अधिक कमेंट असतील तो व आमच्या परिक्षकांच मत याचा विचार करुन नंबर काढूया.

विशेष सुचना.

लेख वाचताना घ्यायची काळजी इतकची की, बरेच जण नवीन लिहणारे आहे. तथाकथित समिक्षक लिहणाऱ्यांनी सिनेमाचे स्पॉयलर दिले वगैरे सारख्या गोष्टी करुन वाद घालू नयेत. शिवाय हे लेख ज्या क्रमाने आम्हाला आले त्याच क्रमाने देण्यात आले आहेत. 

१. सचिन चिले यांचा लेख. 

सध्या कोरोनामुळे आपल्याला सर्वांना जबरदस्ती का होईना होम कंरोटाईन होयाला लागतेय. परंतु याची कल्पना आपलेला अगोदर असल्यामुळे किराणामाल, भाजी अश्या आवश्यक गोष्टी आणून ठेवल्या आहेत. यातच घरातले सगळ कुटूंब असल्यामुळे निवांत.

पण समजा तुम्ही एकटे अचानक एका घरात २-३ दिवसांसाठी बंदीस्त झाले तर?

अशीच काहीशी गोष्ट’ Trapped ‘ या सिनेमात दाखवली आहे. यात राजकुमार राव,गीतांजली थापा हे कलाकार आहेत, राजकुमार ज्याचा नावे काय पो छे, न्युटन, अलिगढ, स्ञी, शाहीद अशा अनेक सिनेमे करणारा भावी बॉलीवूडचा लंबी रेस का घोडा आहे.

Trapped मध्ये सुरवात हाेते शौर्य (राजकुमार) नावाच्या कॉल सेंटरला नोकरी करणारा तरूणाने, ज्याला त्याचाच ऑफीस मधे एक नुरी (गीतांजली थापा) नावाची मुलगी आवडत असते. शौर्य नेहमी नूरचा जवळ येण्यासाठी तिला कॉफी, जेवायचे प्रस्ताव देत असतो.

अगोदर लग्न ठरलेला असूनसुद्धा नुरी नकळत त्याचा जवळ येते. आपले स्वतःचे घर पाहीजे यावर नुरी शौर्यला लग्नासाठी अट घालते. माणूस प्रेमात आंधळा होतो त्याप्रमाणे मुंबईसारख्या ठिकाणी घर शोधायची शौर्यची धावपळ सुरू होते. असाच एक एजंट त्याचा अडचणीचा फायदा घेत काही कारणामुळे बंद पडलेला उंच नवीन अपार्टमेंट मधला फ्लँट दाखवतो.

शौर्य जोश ने होश गमावून तो फ्लँट भाड्याने घेतो, जे तिथल्या वॉचमनला पण माहीती नसत, पुढे अचानक लॉक झालेला दरवाजा, ती उघडण्याची धडपड त्यातच लाइट, अन्न पाणी नसणे, मोबाइल डाऊन होणे, यातून शौर्य हळू हळू  फ्लँट मध्ये Trapped होत जातो.

आकाराने छोटे असलेला झुरळ, उंदीर यांचा शौर्यशी सामना सही होतो अशा अनेक अडथळेना पार करताना नवनवीन युक्ता,बारीकसारीक वस्तुंना घेऊन शौर्य घराचा बाहेर कसा पडतो हे सिनेमात सुंदररीत्या दाखवले आहे.

मनामध्ये असणारी भीती, अचानक आलेली संकट, मुल्यांची तडजोड असे विविध पैलु मांडली आहेत

डायरेक्टर विक्रमादित्य मोटवानीचा या सिनेमाला ६३ वा फिल्मफेअरचा समीक्षक कॅटीगिरीतला सर्वोत्कृष्ट अभिनेता, बेस्ट सांऊड डिझांइनिंग,बेस्ट इडिटिंग असे पुरस्कार भेटले.

हा सिनेमा zee5 या एप वर ऑनलाइन पाहण्यास मिळेल. सध्या कोरोनाचा Trapped मध्ये सापडायच नसेल तर घरी बसल्या हा सिनेमा बघायला काही हरकत नाही.

  • सचिन चिले (पुणे)

२. जयवंत माळी यांचा लेख

Trapped ह्या शब्दाचा मुख्य अर्थ आहे, “अडकणे”. २०१६ मध्ये बॉलीवुड मध्ये Trapped हा चित्रपट  आला, ज्याचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आणि मुख्य कलाकार म्हणून राजकुमार राव ह्यांनी धुरा सांभाळली आणि ती प्रेक्षकांची मने खिळवून ठेवतील अशा पद्धतीने पारही पडली, त्यांच्या जोडीला गीतांजली थापा यांनीही त्यांच्या भूमिकेला उत्तम अशी कामगिरी केली आहे.

ह्या चित्रपटाला ६३वा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात उत्कृष्ट अभिनयासाठी राजकुमार राव ह्यांना आणि चित्रपटचे कथानक साठी अमित जोशी ह्यांना पारितोषिक मिळालं. 

ह्या चित्रपटात राजकुमार राव यांनी “शौर्य” ह्या कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या तरुणाची भूमिका साकार केली, तर गीतांजली थापा यांनी “नूरी” ह्या देखण्या, हुशार, स्वतच्या पायावर उभी असलेल्या तरुण मुलीचा अभिनय केला आहे. जेथे शौर्य हा नुकताच एका कॉल सेंटर मध्ये जॉब ला लागलेला, काही समवयस्क मित्रांसोबत एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहत असतो.

तेथे “नूरी” ही एक मध्यमवर्गीय देखणी, मुंबईतच शिकून मोठी झालेली आणि तिच्या आई व वाडिलांसोबत राहणारी, तरुण मुलगी दाखवली आहे. स्वभावाने म्हणाल तर शौर्य हा समंजस, अबोल, महत्वाकांक्षी, कष्टाळू, दाखवला आहे, आणि “नूरी” ही हुशार, देखणी, एक स्वतंत्र विचार करणारी मुलगी आहे. दोघेही एकाच ऑफिस मध्ये काम करत असतात.

अबोल स्वभावाचा शौर्य हा तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत असतो, शेवटी एके दिवशी नूरीचा विश्वास संपादन करून तिच्याशी मैत्री करतो. काही दिवसांनी त्याला असे कळते की नूरी चे आधीच लग्न ठरलेले असते. परंतु मधल्या काळात नूरी शौर्याला पसंद करत असते. 

आणि इथून, पुढे चित्रपटात सुरुवात होते, आपले प्रेम मिळवण्याची, आणि एकत्र पाहिलेल्या स्वप्ननां सत्यात उतरवण्याची धडपड ..

शौर्य हा एका चाळीत भाड्याच्या खोलीत राहणारा असल्याने नूरी नवीन घरासाठी अट घालते. शौर्य हा त्याच्या कडे असलेल्या सर्व साठवलेल्या पैशांनी नवीन घराच्या शोधात पडतो. तसे त्याला त्याच्या साठवलेल्या पैशात कुठेही घर मिळत नाही.

एका रियल इस्टेट एजेंट कडे शौर्य ला त्याची घराची असलेली निकड एका दुसऱ्या अनोळखी इसमाने हेरली, आणि त्याची घराची गरज पूर्ण करण्याचे आश्वासन देवून शौर्यला एका बंद इमारतीत सर्वात वरच्या मजल्यावर घेऊन जातो. दरम्यान तो इसम  त्याला त्या बंद घराची सर्व माहिती सांगतो.

तेव्हा त्याला समजते की घरचा मुख्य मालक हा परदेशी  गेलेला आहे, आणि तोपर्यंत त्याची घराची ही निकड तात्पुरती भागवून तो एक संसार सुरू करू इच्छित होता. म्हणून त्याने आणखी काही आढेवेढे ना घेता कागदी सोपस्कार ना करता त्याच दिवशी त्या १ BHK फ्लॅट चा ताबा घेतला, आणि कोणालाही पूर्वसूचना ना देता, तो चाळीत राहत असलेल्या भाड्याच्या घरातून बाहेर पडतो आणि नवीन पत्त्यावर येवून राहतो.

घर तर शौर्यला मनासारखे मिळते, पण नियतीने त्याच्या नशिबात काही वेगळेच लिहून ठेवलेले असते. 

एक रात्र त्या घरी काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे शौर्य हा नूरीला नवीन घरी आणणार असतो. त्यातच आदल्या दिवशी रात्री उशिरा पर्यन्त शौर्य त्याला जमेल त्या पद्धतीने घर सजवून सामानाची आवराआवर करून, झोपी जातो.

सकाळी त्याला जेव्हा जाग येते तेव्हा खूप उशीर झालेला असतो, नूरीचे बरेच कॉल्स येवून गेलेले असतात, आणि त्याच्या फोन ची बॅटरी ही संपणार असते, कारण त्याने फोन चार्ज ला तर लावलेला असतो, पण त्याचे बटण सुरू केलेले नसते. तेव्हा तो घाई करून तयार होतो आणि नूरीला कळवून ठेवतो की तो तिला घेण्यासाठी येतच आहे, आणि त्याच वेळेस घरातच एक अपघात घडतो.

ज्यामध्ये शौर्य घरातच अडकून पडतो आणि घराची किल्ली ही बाहेरच्या बाजूने दरवाजाला अडकलेली असते. 

हया, अवघड प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी शौर्य दरवाजा तोडणे, आपली त्या घरातील उपस्थिती शक्य होईल त्या मार्गाने कोणालाही कळवण्याचा प्रयत्नही करतो. परंतु त्याचे प्रयत्न फोल ठरतात. आपण ह्या नवीन घरात पूर्णपणे अडकून पडलेलो आहोत ह्याची पूर्ण जाणीव झाल्यावर, आणि शक्य असलेले सर्व प्रयत्न करून झाल्यावर शौर्य शांत होतो.

इथून पुढे एक वेगळाच शौर्य पाहावयास मिळतो. लहानपणापासून शाकाहारी असलेला शौर्य हा स्वतच जीव वाचवण्यासाठी पक्ष्याला मारून खाऊ लागतो. पावसाचे पाणी साठवून आपली तहान भागवू लागतो, आपल्या जीवघेण्या एकांतपणा घालवण्यासाठी तो उंदराशी संवाद करू लागतो.

दरम्यान, त्याला नूरीची आठवण त्याला त्या बाक्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी परिणामकारक ठरते.

शेवटी, शौर्य हा त्या संकटातून बाहेर पडायचा शेवटचा प्रयत्न करायचा ठरवतो. ज्यात तो त्याच्या घरच्या बाल्कनीतून बाहेर येवून आपल्या कंबरेच्या पट्ट्याच्या साहय्याने तो २ ते ३ मजले खाली येवून पोहचतो,

आणि त्या घराच्या दरवाजातून आपल्यावर आलेल्या जीवघेण्या प्रसंगातून तब्बल २१ दिवसांनंतर बाहेर पडतो. नंतर हॉस्पिटल मध्ये नूरी ही शौर्य ला भेटायलाही येते, पण तिच्या गळ्यातील मंगळसूत्र दाखवून त्याला सांगते की आता त्याला फार उशीर झाला आहे. 

तर असा हा चित्रपट प्रत्येकाला एक गोष्ट शिकवतो ती ही की, कोणत्याही प्रसंगातून तुम्ही स्वताला  बाहेर काढू शकता आणि त्यासाठी तुम्हाला फक्त स्वता:वर विश्वास पाहिजे.

आपण आपल्या समोर ठेवलेल्या परिस्थितिला घाबरून शरण जाता काम नये. स्वता:वर विश्वास आणि हिंमत असेल तर आपण कोणत्याही परिस्थितीला तोंड देवू शकतो. मात्र, प्रेक्षकांच्या मनात काही वेगळेच असेल, ज्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला म्हणावा तसा ठसा उमटवू शकला नाही.

मात्र ह्या चित्रपटाच्या निमित्ताने, तेव्हा राजकुमार राव हा त्याच्या उत्कृष्ट अभिनयसाठी प्रसिद्धीच्या झोतात आला, जेव्हा त्याला २०१८ या वर्षीचा वार्षिक फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला. 

लेखन : जयवंत माळी 

 

Screenshot 2020 04 04 at 11.40.15 AM

 

३. अनिकेत मस्के यांचा लेख 

मुंबईमध्ये विशेषतः साऊथ बॉम्बेत आणि सी व्ह्यू मिळणाऱ्या भागांमध्ये फ्लॅटच्या किमती भल्याभल्यांना हार्ट अटॅक आणतील अशा आहेत. या भागात घर घेणं अनेकांचं स्वप्न असतं पण याच भागातील एखाद्या इमारतीत जर तुम्ही बंदिस्त झालात तर ?

पाणी नाही, लाईट नाही, संपर्काचे साधन नाही, ३५ व्या मजल्यावर स्वतच्या घरात तुम्ही लॉक झालात, एवढ्या मोठ्या इमारतीत तुमच्याशिवाय कुणीच शेजारीपाजारी नाही, खाली हायवे आहे,लोकं दिसताय पण ३५ व्या मजल्यावरून आवाज जाणं शक्य नाही.

ता अशा परिस्थितीत तुम्ही बाहेर कसं निघणार ?

संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे, पण स्वतः च्याच घरात लॉक झालेल्या एका युवकाची कथा तीन वर्षापूर्वी दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाने याने “ट्रॅप” सिनेमाच्या रूपाने आपल्या समोर आणली होती.

राजकुमार रावचा जबरदस्त अभिनय, विक्रमादित्य मोटवानी चे दिग्दर्शन, यासोबतच अप्रतिम कथा आणि साऊंड यामुळे या सिनेमाला अनेक पुरस्कार मिळाले होते.

ट्रॅप सिनेमाच्या पूर्वी एखादा माणूस  एकटा वाळवंटात, जंगलात,बेटावर किंवा जहाजावर अडकलेला तुम्ही पाहिला असेल. अनोळखी प्रदेशात जिथं काहीच सुविधा नाही तिथून सुरक्षित बाहेर येणारा व्यक्ती अशा कथा अनेक सिनेमांत यापूर्वी आपण पाहिल्या आहेत.

पण मुंबईसारख्या शहरात आणि त्यातल्या त्यात प्रभादेवी सारख्या भागात एखादा व्यक्ती कसा अडकू शकतो ? ते पण स्वतच्या घरात ? अरे घरात अडकला तर फोन करायचा, शेजाऱ्यांना आवाज द्यायचा…

असे अनेक सल्ले मनात येतील पण अमित जोशी आणि हार्दिक मेहता या जोडीने १०० मिनिटांच्या कथेत एकही लुपहोल न ठेवल्याने प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सिनेमा पाहिल्यावर मिळते.

ट्रॅव्हल्स आणि टूर्स कंपनीत काम करणारा शौर्य (राजकुमार राव) याची ही कथा, सुरूवातीपासून शेवटपर्यंत खुर्चीस खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते, सिनेमाचा प्लस पॉइंट आहे तो म्हणजे संगीत.

२ गाणी आहेत ती उत्तम पण बॅकग्राऊंड स्कोअर तर दमदार आहे, अशा सिनेमात तो जर ताकदीचा नसेल तर प्रेक्षक कंटाळतात.

राजकुमार राव अभिनेता म्हणून कसा आहे हे सांगायची गरज नाही. पण या सिनेमात त्याच्यासमोर एक चलेंज होतं, १०० मिनिट एकच चेहरा तुम्ही कसा पाहू शकता? सहकलाकार नाही, माणसांची गर्दी नाही, ना विविध लोकेशन्स, मग अशावेळी त्या मुख्य कलाकाराची जबाबदारी अधिक वाढते.

त्याचा प्रत्येक संवाद, प्रतिक्रिया आणि चेहऱ्यावरचे हावभाव सगळं काही इतकं अप्रतिम आहे, की हा रोल त्याच्यापेक्षा कुणीच दुसरं उत्तम करू शकत नाही असं वाटतं. सिद्धार्थ दिवाण याने सिनेमॅटोग्राफी केलाय, सिनेमासाठी कुठलाही सेट न उभारता एका इमारतीत या सिनेमाचं चित्रण झालंय, अंधारात कॅमेऱ्याचा वापर तर बघण्यालायक आहे.

अजून एक बाब म्हणजे अशा सिनेमात टाईम ढकलण्यासाठी स्वप्न किंवा भूतकाळ याचा वापर केला जातो जेणेकरून तुम्ही तोच तोच चेहरा आणि लोकेशन बघून बोर होणार नाही, पण यात हा प्रकार क्वचितच पाहायला मिळतो. जास्तीत जास्त वेळ त्या अपार्टमेंट मध्ये आणि त्या खोल्यांवर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.

ट्रॅप सिनेमा म्हणून उत्तम आहेच पण याची संकल्पना सुद्धा भन्नाट आहे, अशी कथा सुचणे हे त्या लेखकाच् यश आहे. म्हणजे माणसांच्या गर्दीत एकटं पडणं, स्वतः मध्ये हरवून जाणं. मोठ्या शहरातील एकाकीपणा आणि अशा एक ना अनेक भावना सिनेमाच्या लेखकाने मांडल्या आहेत.

गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी अशी काहीशी त्या नायकाची अवस्था होते आणि मग जगण्यासाठी त्याचा संघर्ष सुरू होतो. ज्यावेळी गोष्ट आपल्या जीवावर येते तेव्हा तत्व काहीच कामाची उरत नाही असाही संदेश सिनेमातून दिलेला आहे, काही दिवस घरात बंदिस्त झालेला हा युवक त्या बंद घरातच इतकं काही शिकतो जे कदाचितच बाहेर त्याला शिकायला मिळालं असतं.

देशात सध्या संचारबंदी लागू आहेत,स्वतच्या घरातून बाहेर निघणे कठीण आहे. अशा प्रसंगी हा सिनेमा एकवेळ नक्की पाहावा, एकाकीपणा आणि त्याच जगणं दाखवणारे अनेक सिनेमे सध्या उपलब्ध आहेत.

कास्ट अवे, हाऊस अरेस्ट, ३६ घंटे, 127 hours, होम अलोन यांसारखे सिनेमे वेळ मिळाल्यास नक्की पहा.

  •  अनिकेत मस्के

४. गणेश बोचरे यांचा लेख

सिनेमा हे केवळ स्वप्नरंजनाचे साधन नसून ते वास्तव दाखवणारं एक सशक्त माध्यम आहे यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे. ‘उडान’, ‘लुटेरा’सारख्या चित्रपटाचे लेखन-‌दिग्दर्शन करणाऱ्या विक्रमादित्यने ‘देव डी’ चित्रपट लिहून त्याच्यातील वेगळेपण दाखवलं होतं.

अनुराग कश्यप, विकास बहल यांच्यासोबत त्याने निर्माण केलेले चित्रपटही असेच ‘प्रयोग’ सदरात मोडणारे! तर मुद्दा हा, की त्याचे दिग्दर्शन असलेला सिनेमा तुम्हाला निश्चितच काही तरी वेगळं पाहण्याचं समाधान देतो.

राजकुमार रावची प्रमुख भूमिका असलेला ‘ट्रॅप्ड’ही याच प्रकारात मोडणारा.

एका उंच टॉवरमध्ये ३५व्या मजल्यावर अडकलेल्या युवकाच्या सुटकेची ही धडपड आपल्याला पूर्णपणे खिळवून ठेवते, प्रसंगी अस्वस्थ करते आणि त्यापुढेही जाऊन खूप विचार करायलाही लावते. ‘हट के’ चित्रपटांच्या शोधात असणाऱ्यांनी ‘ट्रॅप्ड’ चुकवून चालणार नाही.

मित्रांसोबत मुंबईत फ्लॅट करून राहणारा शौर्य (राजकुमार राव) ऑफिसमधील एक मुलगी नुरीच्या (गीतांजली थापा) प्रेमात आहे. तिच्यासोबत लग्न करून आयुष्याची एक नवी सुरुवात करण्याचा त्याचा विचार आहे.

फ्लॅट भाड्याने घेण्याची त्याला घाई झाली आहे. कोर्टाच्या चक्रात अडकलेल्या आणि कोणीच राहत नसलेल्या एका इमारतीच्या ३५ व्या मजल्यावरचा एक फ्लॅट एजंट शौर्यच्या गळ्यात मारतो. शौर्यचे बजेटही कमी असल्यामुळे तो हा फ्लॅट भाड्याने घेतो आणि कथानक एक वळण घेते.

काही कारणाने या फ्लॅटमध्ये शौर्य अडकतो.

मुख्य दरवाजाचे लॅच लागते, बॅटरी डाउन असलेला फोन वीज गेल्यामुळे बंद होतो, पाणीही जाते. तो नुकताच या फ्लॅटमध्ये राहिला आल्यामुळे तेथे अन्य काहीही नसते. त्यानंतर सुरू होतो ३५ व्या मजल्यावरील ‘टू बीएचके’मधून बाहेर पडण्याचा प्रवास. या जाळ्यातून तो कसा बाहेर पडतो, त्यासाठी कोणत्या युक्त्या करतो हे पडद्यावरच पाहणे योग्य ठरेल.

त्याच्या सुटकेच्या संघर्षात एक प्रेक्षक म्हणून आपणही पूर्णणे गुंतून जातो. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानीचं यातच यश आहे.

मुंबईसारख्या शहरामध्ये हातपाय धडधाकट असलेली एक व्यक्ती इतके दिवस एका घरात ‘जायबंदी’ होते, हे वरकरणी अशक्य वाटेलही. मात्र, त्यामागची उत्तरं दिग्दर्शक आपल्याला देतो. काही प्रश्न अनुत्तरित राहतात.

कथेतील काही बदल भीषणता ताणण्यासाठी केले आहेत, याचीही आपल्याला जाणीव होते. मात्र, म्हणून चित्रपटाचा प्रभाव कमी होत नाही. चित्रपटावरची पकड ढिली पडणार नाही, याची पुरेपूर काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. चित्रपटाचा थरार टिकवण्यासाठी चित्रपटाला मध्यंतर नाही.

शौर्यची घुसमट, जिवंत राहण्यासाठी सुरू असलेली धडपड पाहून या फ्लॅटमध्ये आपणच अडकून पडल्याचा अनेकदा ‘फील’ येतो. एकटेपणाची भीती वाटू लागते. पडद्यावरच्या काही चित्रचौकटी अंगावर येतात आणि अस्वस्थपणाचा अनुभव देतात.

राजकुमार रावचा हा ‘एकपात्री’ पाहताना मानवी वृत्तीचे विविध कंगोरेही अधोरेखित होतात. जगण्यासाठीचा संघर्ष आणि ओढावलेली परिस्थिती माणसाला कोणत्या थरापर्यंत नेते, याची विक्रमादित्यने केलेली मांडणी प्रभावी वाटते. विशिष्ट जागेत एकटे पडलेल्या व्यक्तिरेखांच्या गोष्टी आपण यापूर्वीही अनेकदा पाहिल्या आहेत.

मात्र, ‘ट्रॅप्ड’ या सर्वांपेक्षा वेगळा ठरतो. ‘ट्रॅप्ड’ कोठेही मेलोड्रामा मांडत नाही आणि उगाचच मुख्य व्यक्तिरेखेवर आलेली वेळ ‘वाढवून’ सांगत नाही.

त्यातून सुटण्यासाठी कोणतीही ‘हिरोगिरी’ दाखवली जात नाही. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस जे करील, तेच पडद्यावर मांडलं जातं. या फ्लॅटमध्ये अडकल्यावर तेथे असणारी झुरळं, उंदीर याचं जगणही बारकाईनं दाखवून माणूस आणि प्राण्यांमधील जगण्याच्या मूलभूत संकल्पना दिग्दर्शक मांडू इच्छितो.

अर्थात हे सारं काही ‘बिटवीन द लाइन्स’ असल्यामुळं पडद्यावरच्या दृश्यामागील हेतू समजावून घेतला तर चित्रपट पाहताना आणखी मजा येते. ‘एका फ्लॅटमध्ये अडकलेल्या युवकाची गोष्ट’ एवढ्यापुरतं ते मर्यादित राहत नाही.

समकालीन वास्तव, महानगरातील युवकांनी बाळगलेली स्वप्नं, एकाच पिढीमधील दोन व्यक्तींची मतमतांतरं असं सारं काही येत जातं, त्यावर भाष्य केलं जातं. संपर्णू चित्रपट राजकुमारने अक्षरशः खाल्ला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्याचा परफॉर्मन्स लाजवाब! शौर्यच्या व्यक्तिरेखेतील हतबलता तो पूर्ण ताकदीने पडद्यावर उतरवतो.

संपूर्ण चित्रपटात त्याच्याखेरीज केवळ कृतीनं बोलणाऱ्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे सिद्धार्थ दिवाणचा कॅमेरा आणि अलोकनंदा दासगुप्ताचं पार्श्वसंगीत. या दोन्ही गोष्टी चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखाच आहेत. ‘टू बीचएके’मध्ये घडणारा थरार त्या फ्लॅटमध्ये शौर्यसोबत राहून पाहिल्याचा अनुभव आपण घेऊ शकतो. त्या दर्जाची ‘सिनेमॅटोग्राफी’ इथे आहे.

अन्न, पाण्याविना तडफडणाऱ्या, शोष पडल्याने आवाजही फुटत नसणाऱ्या शौर्यचे प्रसंग भन्नाट कॅमेरावर्क आणि पार्श्वसंगीताने बोलके होतात. तथ्यांमध्ये अर्थातच काही गोष्टी खटकतात. सुटकेसाठी शेवटच्या मजल्यावर शौर्यने लावलेली आग लक्ष वेधून घेत नाही, हे पटत नाही.

तसंच शौर्यच्या मैत्रिणीसह त्याचे मित्र, ऑफिसमधील सहकारी सात-आठ दिवस गायब झालेल्या शौर्यचा शोधच घेत नाहीत, हेदेखील जरा अतिरेकी वाटतं. अर्थात तथ्यामधील या उणिवांकडे वेगवान मांडणीमुळं दुर्लक्ष होतं.

असं असलं तरीही ‘ट्रॅप्ड’ बघावा असाच आहे. या जाळ्यात अडकून ‘जायबंदी’ करून घेण्यात एक वेगळीच मजा आहे

५. हर्षल पाठक यांचा लेख

 

ट्रॅप हा सिनेमा मी २,३ वर्षा पूर्वी बघितला होता राजकुमार हा लीड रोल मध्ये आहे या सिनेमात तर या पिक्चर ची स्टोरी अशी असते की,

राजकुमार हा नवीन फ्लॅट घेतो आणि तिथे राहिला जातो त्याचा गर्लफ्रेंड च्या सांगण्यावरून आणि त्याला त्याचा  पगारात नवीन फ्लॅट भेटत नाही म्हणून तो सेकंड हँड फ्लॅट घेतो त्या इमारतीत त्याचा फ्लॅट हा सर्वात वरच्या मजल्यावर असतो आणि ती बिल्डिंग जुनी असल्यामुळे तिथे जास्त कोणी राहत नसते.

तो एकटाच तिथे राहत असतो आणि त्या बिल्डिंग मध्ये एक वॉचमॅन पण असतो पण त्याला  एक प्रॉब्लेम असतो त्याला ऐकायला कमी येत असते आणि तो थोडा वयोवृद्ध पण असतो तर आपल्या सिनेमा चा हिरो राजकुमार तिथे राहयला गेल्यानंतर सकाळी त्याचा कडून एक चुकी होते.

त्याचा फ्लॅट चा दरवाजा हा जुना असल्यामुळे तो लॉक होऊन जातो आणि तो त्या फ्लॅट मध्ये अडकून जातो त्याचा मोबाइल पण दुसऱ्या खोलीत अडकून जातो तर तो खूप पर्यंत करतो दरवाजा उघडण्याचा पण तो दरवाजा  काही उघडत नाही तो  बाल्कनी वरून वॉचमन ला खूप आवाज देतो पण त्याला तो आवाज जात नाही कारण त्या वॉचमन ला ऐकू येत नसल्यामुळे त्याला आवाज जात नाही तर राजकुमार हा त्या फ्लॅट मध्ये 21 दिवस अडकुन राहतो.

ही स्टोरी या पिक्चर मध्ये सांगितली आहे. सुरवातीला त्याचा कडे खायला थोडे समान असते पण ते देखील संपून जाते मग तो बाल्कनी ला आलेले कबुतर पकडून खायला सुरवात करतो त्याचा नंतर त्याचा टाकीतले पण पाणी संपून जातो कधी ही नॉनव्हेज न खाणारा त्या दिवसापासून नॉनव्हेज खायला सुरवात करतो असा एक एक दिवस तो काढत जातो वरतून कधी काही घरातल्या वस्तू पण तो  खाली फेकतो पण तरी त्या वॉचमन ला ऐकू जात नाही मग तो वरतून घरातला टीव्ही पण खाली फेकतो पण तरी काही फरक पडत नाही.

त्याचे खायला जास्त न भेटल्यामुळे वजन पण कमी होते आणि त्याला अशक्तपणा पण येतो मग कसा तरी तो या परिस्थितीत सुटतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात अशी स्टोरी आहे या सिनेमातील.

हा माझा लिहण्याचा पहिला प्रयत्न आहे. तरी काही चूक झाली असल्यास समजून घ्यावे 

लेखक : हर्षल पाठक

६. प्रा. धोंड यांचा लेख. 


जसं आपण एखाद्या ब्रॅण्ड कडे बघितलं की त्याचं प्रॉडक्ट कसं असेल याची कल्पना येते अगदी तसचं विक्रमादित्य मोटावने म्हटलं की त्याचा चित्रपट हा दर्जेदारच असणार अशी अपेक्षा असते.साधारण २-३ वर्षांपूर्वी आलेला त्याचा ‘Trapped’ हा असाच एक दर्जेदार चित्रपट.

एका ट्रॅव्हल कंपनी मध्ये काम करणारा शौर्य याची ही कथा. त्याचीच एक सहकारी असणाऱ्या नूरीच्या प्रेमात तो पडतो, जिचं लग्न येत्या दोन महिन्यानंतर असतं. काही दिवसांच्या टाईमपास नंतर ते खरंच सिरीयस होतात आणि एकत्र राहण्याचा निर्णय घेतात.

हातात पैसे आणि वेळ दोन्ही कमी अशा परिस्थिती मध्ये “२१ दिन मे पैसा डबल”  टाईप झोलर असणाऱ्या ब्रोकरच्या जाळ्यात अडकून शौर्य एका “स्वर्ग” नावाच्या निर्जन टोलेजंग इमारतीमध्ये फ्लॅट भाड्याने घेतो आणि त्यात कसा अडकतो याची ही कथा.

गोष्टी चुकत गेल्या आणि आपलं दुर्लक्ष झालं तर कशी पद्धतशीर वाट लागते हे यात दाखवलंय. बहिरा असणारा वॉचमन, खराब दरवाजा, सारखी ट्रीप होणारी लाईट, कधीतरीच येणारं पाणी, नसलेले शेजारी या गोष्टी आपल्याला अगदी सुरुवातीलाच दिसतात पण आपला नायक त्याच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतो आणि राहायला आल्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी फ्लॅट मध्ये बेकार अडकतो. खराब नेटवर्क आणि त्यातच डिस्चार्ज झालेला मोबाईल, गेलेली वीज यामुळे आधीच कमी असलेले बाहेरचे मदतीचे पर्याय एकदम शून्यावर येतात आणि राहतो तो फक्त आपला नायक आणि फ्लॅट मधे उपलब्ध असणाऱ्या वस्तू!

हा, आता आपला नायक काय तथाकथित बॉलिवूड हीरो नाही त्यामुळे त्याच्या धडक मारण्याने दरवाजा तुटणार नसतो किंवा त्याच्या गगनभेदी आरोळीने लोकांचं त्याच्याकडे लक्ष जाणार नसतं. तो असतो तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य तरुण त्यामुळे आपण जे करणार तेच तो करतो जसं की पहिल्यांदा पक्कडने लॉक उघडण्याचा प्रयत्न, मग घरातील एक एक वस्तू खाली टाकून लोकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न, मोबाइल ची बॅटरी जीन्स वर घासून, उन्हात ठेवून ती चार्ज करण्याचा प्रयत्न…

ह्या सगळ्या १३ दिवसांच्या प्रयत्नानंतर आपला नायक बाहेर पडण्यात यशस्वी होतो का नाही यासाठी हा चित्रपट पाहणेच योग्य…

ज्यावेळी आपण एखाद्या ठिकाणी अडकतो आणि प्रश्न जीवन मरणाचा असतो त्यावेळेस आपले संस्कार,आपल्या सवयी, आपले भय हे सगळं दुय्यम होवून फक्त जिवंत राहायची एकच इच्छा ह्या सगळायावर कशी मात करते हे यात मस्त दाखवलं आहे. उदा. शाकाहारी असणारा आणि त्यावरून लोकांना उपदेश देणारा नायक काहीच उपाय शिल्लक नाही राहिल्यावर पाखरांना मारून खातो किंवा उंदरांची भीती असणारा आणि त्यासाठी कधीतरीच आलेल्या पाण्यावर पाणी सोडणारा नायक नंतर त्याच्याशी बोलायला लागतो.

तसच त्याला इथून बाहेर पडून कधी पावभाजी खातो आणि लोकल मधून घामेजल्या लोकांबरोबर प्रवास करतो असं वाटायला लागतं.

चित्रपटात नावांचा वापर पण खूप चांगला केलाय उदा. भित्रा असलेल्याला नायकाचे नाव शौर्य, निर्जन इमारतीचे नाव स्वर्ग,त्याच्याकडे असलेल्या एकुलत्या एक बिस्कीट पुड्याच नाव गुड डे आणि घराच्या भिंतीवर लिहिलेलं वेलकम. तसच सर्व्हायवल ह्या शोचे रेफरांस पण भारी आहेत.

राजकुमार रावचा अभिनय एकदम उच्च दर्जाचा झालाय,

उद्विग्नता,असहायता,हतबलता त्याने अशी दाखवली आहे की ज्याचं नाव ते…आपण त्याच्याशी पार एकरूप होवून जातो जसं की जेव्हा त्याचं रक्त निघत तेव्हा त्या वेदना थेट आपल्यापर्यंत पोचतात, ज्यावेळेस तो शिवांबु पितो त्यावेळी आपल्यालाच मळमळल्यासारखं होतं. येणाऱ्या कित्येक वर्षात त्याच्या अभिनयाचे दाखले दिले जातील.

तांत्रिक आघाड्यांवर तर चित्रपट अव्वल आहे. गोळीबंद, लूपहोल्स नसलेली पटकथा, बॅकग्राऊंड स्कोर, छायाचित्रण एकदम भारी.

त्यामुळे या २१ दिवसात जर तुम्हाला वाटत असेल की काय यार आपण कसे बेकार अडकलोय, कुठे बाहेर जाता येत नाही, तर हा चित्रपट जरूर बघा आणि आपण किती सुदैवी आहोत याचा विचार करून नेटफ्लिक्स आणि चील करा!

आपला नम्र,
भिडू प्रो. धोंड

यापैकी तुम्हाला आवडलेला लेख कमेंट करुन कळवा.  

हे ही वाचा. 

3 Comments
  1. Pranay says

    Jaywant Mali

  2. Sudesh Adak says

    Jaywant Mali is Best👍🏻

Leave A Reply

Your email address will not be published.