विदर्भाच्या महापुरात शहीद झालेली कोंबडी आणि रामदास आठवले.

गोष्ट आहे १९९१ सालची. नागपूर जिल्ह्यात मध्यप्रदेशच्या सिमेजवळ मोवाड नावाच एक गाव आहे. तीन बाजूनी नद्यांनी वेढलेले हे गाव एकेकाळी संपन्न म्हणून ओळखल जायचं. नागपूर जिल्ह्यातील पहिली नगरपालिका इथेच स्थापन झाली होती. हातमागाचा व्यवसाय ही जोरात चालायचा. मोवाड ला उद्योगधंदावाल्यांचं गाव म्हणून ओळखल जायचं.

२९ जुलैची ती काळ रात्र ढगफुटी घेऊन आली.

न भुतोनभविष्यती असा पाऊस पडला. जाम नदीला महापूर आला. असे पूर यापूर्वीही आले होते पण गावाला कधी धोका झाला नव्हता. म्हणून मोवाडवासी साखर झोपेत होते. पण पावसाचा जोर इतका वाढला की जाम नदीचा बंधाराच फुटला. पाणी मोवाडसह तेरा गावात घुसले. हजारो एकर बागायती शेती वाहून गेली. संत्र्याची झाडे मोडून गेली. 

अडीचशे लोक वाहून गेले. एका इमारतीमध्ये आसऱ्याला आलेले ७५ जण भिंत कोसळल्यामुळे जागीच गतप्राण झाले. मालमत्तेच नुकसान किती झालं याची मोजदाद नाही. पाणी उतरल्यावर अनेकांचे मृतदेह काही किलोमीटर अंतरावर सापडत होते.

विदर्भात पहिल्यादांच महापुराचा एवढा मोठा प्रलय अनुभवयाला मिळाला होता.

सगळ प्रशासन खडबडून जागे झाले. मोवाड गावी नुकताच पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या नरसिंहराव यांनी भेट दिली. हे गाव ज्या रामटेक लोकसभा मतदारसंघात येत होते तिथून नरसिंहराव तीन वेळा निवडून गेले होते यामुळे त्यांची या गावाप्रती सहानुभूती असणे साहजिक होते. तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक दुखीतांचे अश्रू पुसण्यासाठी हजर झाले होते. देशाचे तेव्हाचे संरक्षण मंत्री शरद पवार हे लष्करी मदत घेऊन तिथे पोचले होते.

आणीबाणीची परिस्थिती होती. सगळी चक्रे वेगाने फिरत होती. एवढ्या मोठ्या मंत्र्यांचा वावर सुरु झाल्यामुळे राष्ट्रीय मिडियाचे सुद्धा या आपत्तीकडे लक्ष जाणे सहाजिक होते. मिडिया आल्यानंतर अनेक हौसे गवसे नवसे आपत्तीच्या स्थळी घुटमळू लागले. अनेक छोट्यामोठ्या मंत्र्यांचे दौरे सुरु झाले. त्यांची सरबराई करण्यात प्रशासनावरचा ताण वाढला.

अशातच तेव्हाचे महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी मोवाडचा दौरा काढला.

त्यावेळी यावेळी त्यांच्यासोबत काही स्वीय सहायक व इतर ताफा देखील मोवाडमध्ये आला होता. आठवलेनी पूरग्रस्त छावणीची भेट घेतली, पूरग्रस्तांना धीर दिला. त्यांचा कार्यक्रम आटोपेपर्यंत संध्याकाळ झाली. आठवलेंच दिवसभरात जेवण झाले नव्हते. या दौऱ्यानंतर ते नागपूरला परतणार होते.

मंत्रीमहोदयांच्या पीएनां रात्रीच्या जेवणाची गडबड लागली होती. त्यांना नागपूरच्या रविभवनामध्ये सामिष भोजनाची सोय करा असा निरोप पाठवायचा होता.

त्याकाळात मोबाईल फोन नव्हते. पूरग्रस्तांच्या छावणीमध्ये फोनची देखील सोय नव्हती. पोलिसांकडे असणारे वायरलेस फोन हाच एकमेव दुवा होता.

मंत्र्यांच्या स्वीय सहायकांनी नागपूरचे जिल्हाधिकारी गुरुमुर्ती बेडगे आणि पोलीस अधीक्षक बच्चेवार यांच्याजवळ वायरलेसवरून हा निरोप पाठवा असा हट्ट केला.

आपत्तीच्या परिस्थितीत मदतकार्य मागर्दर्शनाच्या ऐवजी जेवणाचे आदेश देणे याचे पडसाद तहानभूकेची पर्वा न करता रात्रंदिवस कामात असलेल्या स्वयंसेवकाच्यावर होईल असे कलेक्टरनां वाटले. त्यांनी मंत्र्यांच्या पीएनां तसं समजावून सांगण्याचा देखील प्रयत्न केला. स्वीय सहायक जर गावात जाऊन तिथे सुरु असलेल्या एसटीडी बूथवरून हा निरोप पाठवला तर याची जास्त चर्चा होणार नाही असा सल्ला देखील दिला.

पण आले मंत्र्यांच्या पीए च्या मना तिथे कोणाच काही चालेना अशी वेळ आली. अखेर सामिष जेवणाच्या स्वयंपाकाचे आदेश पोलिसांच्या वायरलेसवरून नागपूरला पोचवण्यात आले. मगच मंत्र्यांचा ताफा तिथून हलला.

काही तरी घडतंय हे पत्रकारांना जाणवत होते पण पोलीस अधीक्षकांनी याचा थांग लागु दिला नाही. पण याप्रकाराने उद्विग्न झालेल्या कलेक्टर बेडगे यांचा बांध सुटला. त्यांनी जे काही घडल ते तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना सगळ सांगितलं.

जेष्ठ पत्रकार सुरु मिश्रा व प्रवीण बर्दापूरकर यांनी या माहितीचा सविस्तर शोध घेतला. वायरलेसच्या पोलीस रेकोर्डवर देखील त्यांना हीच माहिती मिळाली. रविभवनावर चौकशी केली असता आठवलेंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कोंबडीचे भोजन केले असा दुजोरा दिला. 

सगळी खातरजमा झाल्यावर या दोन्ही पत्रकारांनी आपापल्या वर्तमानपत्रात ही चटपटीत मीठमसाला लावून ही बातमी लावली.

बर्दापूरकरांनी तर लोकप्रभा मध्ये मोडलेले मोवाड यामध्ये एका शहीद झालेल्या कोंबडीची कथा प्रसिद्ध केली. ती राज्यभर गाजू लागली.

इकडे त्याच रात्री समाजकल्याण मंत्री रामदास आठवले विमानाने मुंबईला परतले होते. तिकडे पत्रकारपरिषदेमध्ये या कोंबडीवरून त्यांना प्रश्न विचारून खिंडीत पकडण्यात आले. खळबळ उडाली. समाजकल्याण मंत्रालयाने मंत्रीमहोदयांचा अपमान केला म्हणून बर्दापूरकर यांना अटक करा अशी मागणी केली. शासकीय कामात ढवळाढवळ केली म्हणून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करा अशी मागणी आठवलेंच्या सहकाऱ्यानी केली.

बर्दापूरकर यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. पण कोंबडी खाल्ल्याची बातमी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा ठरत नसल्यामुळे अटक कशी करावी हा प्रश्न पोलिसांपुढे पडला होता. अखेर तेव्हाचे पोलीस महासंचालक रामराव बारवकर यांनी तोडगा काढला की मंत्रालयाने पत्रकारांना अटक करण्याचा लेखी आदेश द्यावा मग पोलीस कार्यवाही करतील. यानंतर हे प्रकरण थंडावले.

पुढे एकदा विधिमंडळ अधिवेशनाच्या साठी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक  नागपूरला आले असता त्यांनी बर्दापूरकरांना बोलावून घेतले आणि हसत हसत म्हणाले,

“अशा कोंबड्याबिबड्याच्या बातम्या देऊन त्यांना कशाला शहीद करता आणि खाल्लेल्या चविष्ट कोंबडीची करपत ढेकर देण्याची वेळ आणता कशाला?”

त्यानंतर त्या महापुरातल्या कोंबडीवर कायमचा पडदा पडला. पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांनी आपल्या डायरी या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.