राज्यात मंत्री झाले तरी पंतप्रधानांनी अजित पवारांना खासदारकीचा राजीनामा देऊ दिला नाही

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रकारचे नेते आहेत. एक पुण्यामुंबईसारख्या शहरातले नेते आणि दुसरे खेडोपाड्यातून वर आलेले ग्रामीण नेते. सहसा गावाकडचे नेते मुंबईत आले की दबून असतात. आपल्या रांगडी भाषेतले एखादे वक्तव्य कधी आपलं राजकारण संपवेल अडचणीत आणेल सांगता येत नाही. पण तरी हट्टाने आपली ग्रामीण पार्श्वभूमी जपणारा नेता म्हणजे अजित दादा पवार.

पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्र, साखर उद्योग यांना रीप्रेझेंट करणाऱ्या नेत्यांच्या पिढीचा शेवटचा शिलेदार.

आजकाल राजकारणाच केंद्र ग्रामीण क्षेत्रातून शहराकडे वळलाय. राजकारणाचीपद्धत चेंज झाली आहे. पण किती तरी टीका टिप्पणी झाली, भ्रष्टाचाराचे आरोप झाले पण अजित पवारांनी आपली स्टाईल बदलली नाही.  याच कारण त्यांच्या रक्तात गावाकडचा रांगडेपणा भिनलाय.

अजित पवार आणि शेती हे एक वेगळ नातं आहे. ते राजकारणात येण्या आधी बारामतीत काही वर्ष ते शेती करत होते. त्यांच शिक्षण काही जास्त नाही. दहावी पास झाल्यावर शेतीची आवड असल्यामुळे झाल्यानंतर अजित पवार शेती कडे वळले.

शरद पवार मुख्यमंत्री असताना अजित दादा आपल्या शेतातला माल गाडीत घालून विकायला पुणे मार्केटयार्डमध्ये यायचे ही आठवण कित्येकजण आजही सांगतात.

राजकारणात येण्याबद्दल अजित पवारांनी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. ते आपल्या आठवणी सांगताना म्हणतात,

विधिमंडळ सभागृहाचा सदस्य होण्यापूर्वीची मी विधान भवनात अनेकदा यायचो. विशेषतः पवारसाहेब मुख्यमंत्री असताना प्रेक्षक गॅलरीत बसून सभागृहाचे कामकाज कसे चालते? आमदार कसे बोलतात?  मंत्री कसे उत्तर देतात हे मोठ्या कुतूहलाने बघत असे. तेव्हा कधी वाटलं नव्हतं की या सभागृहाचा सदस्य होईन.

अजित पवारांच्या डोक्यात जरी नसलं तरी ते विधानभवनाच्या गॅलरीत येऊन बसायचे तेव्हा काँग्रेसच्या काही नेते पाठीमागून कुजबुज करायचे,

“आता हा बाबा देखील राजकारणात येतो कि काय?”

त्यांच्या मनातली शंका काही वर्षांनी मात्र खरी ठरली. अजित पवार यांनी १९८२ साली सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. पश्चिम महाराष्ट्रात तेव्हा सत्तेचा मार्ग साखरेच्या माध्यमातून पुढे जायचा. अजित पवारांनी हाच सहकाराचा मार्ग चोखाळला. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते.

अजित पवारांनी १९९१ साली काँग्रेस तर्फे लोकसभा निवडणूक लढवली. मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आले. निकालानंतर काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.

पण या निवडणुकीदरम्यान काँग्रेससाठी एक धक्कादायक घटना घडली, ती घटना होती पक्षाध्यक्ष राजीव गांधींची हत्या. तेच काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील होते. पण राजीव गांधी यांच्या अकाली मृत्यूमुळे पक्ष नेतृत्वाचा आणि पंतप्रधानपदाचा प्रश्न काँग्रेसपुढे उभा राहिला.

त्या वेळी तीन नाव पुढे आली. अर्जुनसिंह, शरद पवार आणि पी.व्ही.नरसिंहराव. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी पंतप्रधानपदासाठी मोठी मोर्चा बांधणी केली. मात्र दक्षिणेकडच्या खासदारांच्या जोरावर नरसिंहराव यांनी बाजी मारली.

पी व्ही नरसिंहराव हे विरोधकांना देखील सोबत घेऊन जाणारे नेते होते. त्यांनी शरद पवारांना आपल्या मंत्रिमंडळात येण्यासाठी तयार केले. पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि ते देशाचे संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात गेले.

शरद पवारांच्या जागी महाराष्ट्रात त्यांचे समर्थक सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले. अजित पवारांना त्यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून स्थान मिळाले. शरद पवारांनी केंद्रात आणि अजित पवारांनी राज्यात शपथ घेतली.

मंत्री झाल्यावर अजित पवारांना शरद पवारांसाठी बारामतीमधून खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार होता आणि विधानसभा लढवावी लागणार होती. लवकरातल्या लवकर ही पदांची अदलाबदल करायचं होतं.

पण त्याकाळात आशा काही घडामोडी घडल्या की नरसिंह राव यांनी अजित पवार यांना खासदारकीचा राजीनामा देऊ नका अस सांगितलं.

नरसिंह राव यांच्या सरकारकडे मोठे बहुमत नव्हते. त्यामुळे अधिवेशन काळात एक एक मत महत्वाचं असणार होत. म्हणूनच त्यांनी अजित पवार यांना एक अधिवेशन होई पर्यंत राजीनामा देऊ नका अस सांगितलं.

अजित पवार सांगतात,

खासदार असतानाच महाराष्ट्राचा मंत्री बनलेला त्याकाळातला मी एकमेव नेता असेन.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.