बॉयकॉट करण्यात आघाडीवर असणाऱ्या नरोत्तम मिश्रांनी पठाणच्या बाबतीत यु टर्न मारलाय…
नरोत्तम मिश्रा हे असं नाव आहे जे बॉलीवूडला बॉयकॉट करण्याच्या ट्रेण्डमध्ये आघाडीवर असतात. सध्या हा ट्रेंड चालू होता तो शाहरूख खानच्या पठाणच्या बाबतीत. या बॉयकॉट करण्याच्या प्रकरणातसुद्धा नरोत्तम मिश्रा आघाडीवर होतेच. शाहरूखच्या पठाणमधलं बेशर्म रंग हे गाणं रिलीज झाल्यावर त्यांनी आक्षेप घेतला होता.
त्यावेळी त्यांनी या गाण्यात आक्षेपार्ह दृष्य आहेत असं म्हणत त्यांनी गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरही आक्षेप घेतला होता. चित्रपटातून भगवा आणि हिरवा दोन्ही रंग काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केली होती आणि असं झालं नाही तर, मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असं म्हणाले होते.
आता नरोत्तम मिश्रा यांनी यु टर्न मारलाय.
आता चित्रपट रिलीज झाल्यावर नरोत्तम मिश्रा यांनी म्हटलंय,
“मला विश्वास आहे की त्यात (चित्रपट) सर्व सुधारणा झाल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाने दुरुस्त्या केल्या आहेत. वादग्रस्त शब्द काढून टाकण्यात आले आहेत, त्यामुळे मला आता विरोध करण्यात अर्थ दिसत नाही.”
यात युटर्नचा मुद्दा येतोय तो रंगावरून. कारण, नरोत्तम मिश्रा यांनी गाण्यातला भगवा रंग काढून टाकावा अशी मागणी केली होती, पण फायनल कटमध्ये दीपिकाच्या अंगावर भगव्या रंगाची बिकिनी आहे. त्यामुळे, ती मागणी पूर्ण न होताच त्यांनी विरोध केलेला नाही. म्हणून आता त्यांनी आपल्या भुमिकेवरून यु टर्न घेतला असल्याच्या चर्चा आहेत.
मोदींनी भाजप नेत्यांना याबाबतीत सल्ला दिला होता.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व भाजप नेत्यांना एक सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, चित्रपटांबाबत अनावश्यक टिप्पणी कोणत्याही नेत्याने न केलेलीच बरी.
आता नरोत्तम मिश्रा यांनी पठाणच्या मुद्द्यावर घेतलेला युटर्न बघता, मोदींनी दिलेल्या सल्ल्याचाच हा परिणाम असल्याची चर्चा आहे.
नरोत्तम मिश्रा यांची बॉलीवूडवर आक्षेप घेण्याची ही पहिलीच वेळ नाहीये…
नरोत्तम मिश्रा यांचं राजकीय वजन:
नरोत्तम मिश्रा हे सध्या मध्य प्रदेशचे गृहमंत्री आहेत. याशिवाय, भाजपमधील आणि मध्य प्रदेशमधील एक आक्रमक नेतृत्त्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झालीय.. कट्टर हिंदुत्त्ववादी विचारधारा असलेले नरोत्तम मिश्रा हे राजकारणातील फार अनुभवी व्यक्तीमत्व आहे… आजवर ते ६ वेळा आमदार राहिलेत तर, जवळपास १५ वर्षांचा मंत्रिपद सांभाळण्याचाही त्यांना अनुभव आहे… याशिवाय २००८ साली त्यांनी लोकसभेची निवडणूकही लढवली होती पण, ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याकडून पराभव झाला. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात त्यांचं स्थान हे मोठं आहे.
मागच्या वर्षभरातील नरोत्तम मिश्रा विरूद्ध बॉलीवूड संघर्ष:
मागच्या वर्षी सनी लिओनीच्या गाण्यावर मिश्रांनी आक्षेप घेतलेला…
डिसेंबर २०२१ मध्ये अभिनेत्री आणि पुर्वाश्रमीची पॉर्नस्टार सनी लिओनी हिचं एक गाणं रीलीज झालं होतं… या गाण्याचं शीर्षक होतं, ‘मधुबन में राधिका नाचे रे’. या गाण्यातील डान्स स्टेप्स मादक असल्यानं नरोत्तम मिश्रा यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला होता. त्यावेळी ते म्हणाले होते,
“राधा ही आमच्यासाठी देवी आहे… भारतात अनेक ठिकाणी राधेची मंदिरं आहेत. सतत आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात आणि हे आम्ही अजिबाक सहन करणार नाही. हे गाणं तात्काळ डीलीट केलं नाही तर, आम्ही लीगल अॅक्शन घेऊ”
श्वेता तिवारीनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मिश्रा आक्रमक झाले होते…
जानेवारी महिन्यात श्वेता तिवारी तिच्या आगामी वेबसीरिजच्या प्रमोशनसाठी मध्य प्रदेशात असताना तिनं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर तिने हसत हसत “मेरी ब्रा का साईझ भगवान लेता है” असं वादग्रस्त आणि धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर गृहमंत्री असलेल्या नरोत्तम मिश्रा यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर श्वेता तिवारीविरोधात तक्रारही दाखल झाली होती.
आमिर खानच्या लाल सिंग चड्ढा चित्रपटाला मिश्रांनी केलेला जोरदार विरोध…
ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या लाल सिंग चड्ढा या चित्रपटाविरोधात तर देशभरात जणू मोहिमच सुरू होती… ट्विटरवर #बॉयकॉट_लाल_सिंग_चड्ढा हा ट्रेंड सुरू होता. या चित्रपटाविरोधात मध्य प्रदेशचे गृहमंत्री मिश्रा यांनी आमिरसह संपुर्ण बॉलीवूडला एक प्रकारे इशाराच दिला होता. त्यावेळी ते म्हणाले होते,
“मुळात माफी मागावी लागेल अशी परिस्थिती निर्माणच का करता? कुणाच्याही भावना न दुखावता कलाकृती साकारता आली पाहिजे. या विषयावर सगळ्या दिग्दर्शक, निर्माते आणि खान यांच्यासारख्या लोकांनी गांभीर्यानं विचार केला पाहिजे”
आमिरच्या जाहीरातीवरून आक्रमक न होता मिश्रांनी विनंती केली होती…
एका प्रायव्हेट बँकेच्या जाहिरातीमध्ये आमिर खान आणि कियारा अडवानी हे दोघे होते. या जाहिराातीत असं आमिर आणि कियारा हे नवविवाहीत जोडपं दाखवलं होतं. आमिर हा लग्न करुन कियाराच्या घरात प्रवेश करतोय अशी या जाहिरातीची स्टोरी होती. यावरून मिश्रा यांनी आक्रमक भुमिका न घेता आमिर खानला पारंपारिक भावनांना आणि परंपरांना दुखावलं जाईल अशी कामं न करण्याची विनंती केली होती.
मिश्रांच्या निशाण्यावर शबाना आझमी, नसुरूद्दीन शाह आणि जावेद अख्तर…
मिश्रांच्या मते हे सेलिब्रिटीज फक्त भाजपशासित राज्यात काही चुकीचं घडलं तरच प्रश्न उपस्थित करतात… बिल्कीस बानो प्रकरणावरून शबाना आझमी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलताना बोलताना ते म्हणाले, फक्त भाजप शासित राज्यात काही गैरप्रकार झाला की हे सेलिब्रिटीज बाहेर येतात. असं काही झालं की मग, नसुरूद्दीन शाहांना देश असुरक्षित वाटायला लागतो आणि या अवॉर्ड वापसी गँगवाल्यांना कळवळा येतो.”
आदिपुरूश चित्रपटावरून ओम राऊत यांना दिला होता इशारा
बाहूबली फेम अन् सुपरस्टार प्रभास, सैफ अली खान, क्रिती सैनन अश्या तगड्या स्टारकास्टला घेऊन दिग्दर्शक ओम राऊतने बनवलेल्या ‘आदिपुरूष’ या श्री राम यांच्य जीवनावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर २ दिवसांच्या आतच मिश्रा यांनी इशारा दिला. ‘या चित्रपटात हिंदू देवी-देवतांचे कपडे आणि अवतार हे पुराणाला धरून नसल्यानं चित्रपट प्रदर्शित करण्यापुर्वी हे सगळं बदलावं आणि मग प्रदर्शित करावा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा मिश्रा यांनी ओम राऊत यांना दिला.
आणि आता आगामी पठाण चित्रपटाविरोधात मिश्रा आक्रमक…
जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार असलेल्या या चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं रीलीज झालंय. या गाण्यात दीपिका पादुकोनचे टोकडे कपडे हा वादाचा मुद्दा ठरलाय. याशिवाय, गाण्यामध्ये दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातलेली दिसतेय. यामुळे चित्रपटाविरोधात भुमिका मांडताना मिश्रा म्हणाले,
“पठाण या चित्रपटातील गाण्यात तुकडे तुकडे गँगला सपोर्ट करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोण आहे.वेशभूषा अत्यंत आक्षेपार्ह असून हे गाणे गलिच्छ मानसिकतेने चित्रित करण्यात आलंय. गाण्यातील दृश्ये आणि वेशभूषा दुरुस्त करावी, अन्यथा मध्य प्रदेशात चित्रपटाला परवानगी द्यायची की नाही, यावर विचार करावा लागेल.”
याशिवाय त्यांनी गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीवरही आक्षेप घेतला. चित्रपटातून भगवा आणि हिरवा दोन्ही रंग काढून टाकावे अशी मागणी त्यांनी केलीय.
मागच्या काही दिवसांचा विचार केला तर, बॉलिवूडमध्ये हिंदू देव-देवता आणि हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्या जात असल्याचा आरोप सातत्यानं केला जातोय… आणि जेव्हा जेव्हा हे आरोप होतायत तेव्हा तेव्हा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आक्रमक होऊन चर्चेत येतायत.
हे ही वाच भिडू:
- लोकांना वाटायचं तब्बूऐवजी तिची बहीण बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालेल…
- टॉलिवूडचे रिमेक बॉलिवूडला तारत होते, पण आता सगळं गणितच बदललंय…
- महाराष्ट्रावर मद्यराष्ट्र म्हणून टीका झाल्यानंतर आत मध्य प्रदेशला मद्यप्रदेश म्हटलं जातंय