संभाजीराजेंना विमानात भेटलेले पायलट, खरंतर माजी केंद्रीय मंत्री आहेत

राजकीय नेते म्हणलं की प्रोटोकॉल आले, मानसन्मान आला. पण अनेकदा राजकीय नेते ही प्रोटोकॉलची चौकट मोडताना दिसून येतात. राजकारणाच्या व्यतिरिक्त आपले छंद जोपासतानाही ते दिसून येतात. काही नेते फोटोग्राफी करतात, काही व्यंगचित्रकार असतात; तर काहींना लेखनाचाही छंद असतो. बऱ्याचदा राजकारणात येण्याआधी काही नेत्यांनी वेगवेगळी क्षेत्रही गाजवलेली असतात.

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे, राज्यसभा खासदार संभाजीराजे यांनी केलेलं ट्विट.

 

या ट्विटनुसार, पोर्ट ब्लेअर इथं झालेल्या पर्यटनविषयक संसदीय अभ्यास दौऱ्यानंतर संभाजीराजे बँगलोरमार्गे मुंबईला आले. त्यांनी ज्या विमानानं प्रवास केला, त्याचे वैमानिक माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार राजीव प्रताप रुडी स्वतः होते. ‘आमचं बेंगळुरूचं विमान इतर कोणीही नाही, तर माझे संसदीय सहकारी आणि माजी केंद्रीय मंत्री श्री. राजीव प्रताप रुडी यांनी चालवलं आहे. ते आमच्या शिष्टमंडळाचा एक भाग होते आणि आता ते आमचे चांगले मित्र आणि सहकारी व पायलट असल्यामुळे एक वेगळाच आनंद झाला आहे,’ असं खासदार संभाजीराजे यांनी ट्विटद्वारे सांगितलं.

त्यांच्या या भेटीवेळी भंडारा गोंदियाचे खासदार सुनील मेंढे आणि संभाजीराजेंचे मित्र केविन अँटो अँथनीही उपस्थित होते.

कोण आहेत राजीव प्रताप रुडी

२००१ मध्ये त्यांची अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातल्या एनडीए सरकारमध्ये केंद्रीय राज्य, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदी नियुक्ती झाली. त्यानंतर, २००८ मध्ये त्यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती झाली.  त्यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी यांचा ४० हजार ९४८ मतांनी पराभव केला आणि बिहारमधल्या सारणा मतदारसंघातून बाजी मारली होती.

नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांनी कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पदाचा कार्यभार पाहिला, मात्र २०१७ मध्ये मंत्रिमंडळ फेरबदलात मात्र त्यांना मंत्रीपद गमवावं लागलं. २०१८ मध्ये त्यांची भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून निवड झाली. रुडी हे सध्या सारणा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत

रुडी हे व्यावसायिक पायलट असून कोलकातामधल्या दरभंगा विमानतळावरुन उडालेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचे ते फ्लाईट क्रू कॅप्टन होते. त्यांनी २०१५ मध्ये सुखोई लढाऊ विमानंही उडवलं होतं, त्यांनी राफेलचंही सारथ्य केलं आहे. विशेष म्हणजे, जगातले पहिले खासदार पायलट म्हणून रुडींचं नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.