जसे सोनिया गांधींसाठी अहमद पटेल त्याप्रमाणे राहुल गांधींसाठी राजीव सातव महत्वाचे होते..

हिंगोली जिल्ह्यात भारत जोडो यात्रा येताच काँग्रेस राहुल गांधी यांना सगळ्यात आगोदर आठवले ते राजीव सातव. रविवारी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या समाधीस्थळी राहुल गांधी यांनी भेट दिली. यावेळी राहुल गांधी भावनिक झाले होते. राहुल गांधी यांनी सुरक्षेचा प्रश्न होता. ते सर्व बाजूला ठेऊन राहुल यांनी राजीव सातव यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. 

याच कारण म्हणजे दोघांमध्ये असणारी मैत्री आणि बरेच काही. 

वर्ष होत २०१७. 

गुजरात मध्ये विधानसभा निवडणूक होत होत्या. मोदी मुख्यमंत्री नसताना लढल्या जाणाऱ्या या तिथल्या पहिल्याच निवडणूक. तस बघायला गेलं तर अख्ख्या भारतावर राज्य करणाऱ्या मोदी शहा यांचं हे होम ग्राउंड. मोदींनी सलग तीन टर्म मुख्यमंत्री असताना बनवलेल्या गुजरात मॉडेल वर संपूर्ण देशावर विजय मिळवला होता. मोदींचा डंका भारतातच नाही तर भारताबाहेर वाजत होता असा तो काळ.

काँग्रेस संपूर्ण देशात पूर्णपणे संपली आहे असच म्हटलं जात होतं. विशेषतः गुजरात मध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एकही खासदार निवडून आला नाही अशी वाईट अवस्था होती. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कोणतं वेगळं चित्र दिसणार नाही अशीच चर्चा होती.

पण काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली होती. पण कोणालाही अपेक्षा नव्हत्या.

त्यावेळी फोकसमध्ये आलेला मतदारसंघ होता राजकोट पश्चिम. गुजरातचे मुख्यमंत्री विजयकुमार रूपानी तिथून निवडणूक लढवत होते. त्यांच्या विरुद्ध काँग्रेसने इंद्रनील राजगुरू यांना मैदानात उतरवलं.

सुरवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक काँग्रेसच्या प्रचाराने चांगलीच रंगू लागली. विजयकुमार रूपानी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. संपूर्ण गुजरात हरला तरी चालेल पण हा मतदारसंघ जिंकायचाच असं म्हणून काँग्रेस कार्यकर्ते कंबर कसून प्रचार करत होते.

या प्रचारा दरम्यान एक घटना घडली, काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरू यांचे भाऊ दीप राजगुरू यांनी भाजपाचे पोस्टर काढण्यावरून हल्ला झाला. त्यात भाजपचा हात असल्याचा काँग्रेसने आरोप केला. या रागातूनच, काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजय रुपाणींच्या घराबाहेरचे पोस्टर काढण्याचा प्रयत्न केला आणि ‘राडा’ सुरु झाला.

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अमोरासमोर आले. जोरदार धुमश्चक्री सुरु झाली.

या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी पोलीस देखील तिथे हजर झाले. त्यांनी जमावावर लाठीचार्ज करण्यास सुरवात केली. त्यांचं लक्ष्य काँग्रेसचा एक तरुण नेता होता. या नेत्याला लाठीने मारण्यात आले, त्याचा शर्ट देखील फाडण्यात आला.  इतर कार्यकर्त्यान्सोब्त त्यांची रवानगी पोलीस स्टेशनवर केली. त्याचे अटकेचे पडसाद पार दिल्लीपर्यंत पोहचले.

हा नेता गुजरातचा नव्हता. तर तो महाराष्ट्राचा होता. नाव राजीव सातव !

महाराष्ट्राच्या माजी मंत्री रजनी सातव यांचे चिरंजीव, मोदी लाटेत ही निवडून येणारे हिंगोलीचे खासदार हि एवढीच त्यांची ओळख नव्हती. त्यांना ओळखलं जायचं राहुल गांधी ब्रिगेडचे युवा शिलेदार म्हणून.

मूळचे मसोड तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोलीचे. त्यांच्या आई रजनी सातव या बाबासाहेब भोसले यांच्या काळापासून महाराष्ट्राच्या मंत्री होत्या. त्यांची ओळख एक अभ्यासू मंत्री व तडफदार आमदार अशी होती.

ऐंशीच्या दशकात रजनी सातव यांच्या  प्रयत्नांतून गर्भलिंग तपासणी प्रतिबंधक म्हणजेच ‘पीएनडीटी’ कायदा महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर झाला. महाराष्ट्रानं जगाला दिलेल्या अनमोल देणग्यांपैकी ही एक असं समजलं जात होतं . कारण असा कायदा भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात सर्वप्रथम महाराष्ट्रात झाला. १९८८ मध्ये झालेला हा कायदा पुढे १९९४ मध्ये लोकसभेतही संमत झाला आणि देशभरात लागू झाला.

या कायद्यामुळे रजनी सातव यांचं नाव दिल्लीत सोनिया गांधी यांच्या पर्यंत पोहचलं. स्वतः सोनिया गांधींनी रजनी सातव यांची भेट घेऊन कौतुक केलं. तेव्हा पासून सुरु झालेला गांधी घराणे व सातव कुटुंब यांच्यातील नात्याचा वारसा राजीव सातव व राहुल गांधी यांच्या पर्यंत जाऊन पोहचला.

२००४ साली जेव्हा राहुल गांधींची राजकारणात एंट्री झाली तेव्हा त्यांना स्वतःच्या समर्थकांची ब्रिगेड उभी र्कायची होती. ज्या प्रमाणे काँग्रेस मध्ये आल्यावर संजय गांधी, राजीव गांधी यांनी नव्या तरुण नेत्यांना आणलं होत त्याप्रमाणे राहुल गांधी यांनी देखील देशभरात असलेल्या आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांना राजकारणात मोठ्या पदांची संधी दिली.

पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमधून एम.ए. तर आय.एल.एस. लॉ कॉलेजमधून एल.एल.एम. केलेल्या सातव यांना २००८ साली महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. पुढच्याच वर्षी ते हिंगोलीमधून आमदारकी देखील विजयी झाले.

राजीव सातव यांच संघटन कौशल्य, त्यांचा अभ्यास बघून राहुल गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय पातळीवर युवक काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं. २०१० ते २०१४ या काळात ते युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद राहिले.

त्याच वर्षीच्या लोकसभा निवडणुकीवेळी राहुल गांधींच्या आग्रहानुसार राजीव सातव यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले. फक्त एवढंच नाही तर राहुल गांधींनी राजीव सातव यांच्यासाठी पूर्वनियोजन नसताना प्रचार सभा घेतली होती. सातव हे राहुल गांधींचे सगळ्यात जवळचे शिलेदार आहेत व दिल्लीत त्यांना महत्वाची भूमिका पार पाडायची आहे हा संदेश या निमित्ताने गेला.

२०१४ च्या मोदी लाटेत संपूर्ण महाराष्ट्रातून काँग्रेसचे फक्त दोनच खासदार निवडून आले, यात राजीव सातव यांचा समावेश होता. सातव यांनी राहुल गांधींचा विस्वास सार्थ करून दाखवला.

हिंगोलीच्या खासदारपदी असताना सातव यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, मनरेगा, दुष्काळ, रेल्वे यासारख्या अनेक मुद्द्यांवर संसदेत आवाज उठवला होता. त्यांना सलग चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

वरचा प्रसंग सांगितल्याप्रमाणे २०१७ सालच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. अगदी रस्त्यावरून उतरून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यापासून ते पडद्याआड चालणाऱ्या सूत्रांचे नियोजन करण्यापर्यंत राजीव सातव आघाडीवर होते. या निवडणुकीत काँग्रेस विजयी तर झाली नाही पण त्यांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत भाजपच्या तब्बल १६ जागा कमी केल्या.

गुजरात मध्ये जाऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात. त्यांच्या घरासमोर टक्कर घेणे म्हणजे सिंहाच्या दाढेत हात घालण्याप्रमाणे होते. राहुल गांधींच्या एकनिष्ठ समजल्या जाणाऱ्या राजीव सातव यांनी हे शिवधनुष्य लीलया उचललं होतं.

ज्या प्रमाणे सोनिया गांधींसाठी अहमद पटेलांचं स्थान होतं त्याप्रमाणे राहुल गांधींसाठी राजीव सातव महत्वाचे होते.

पुढे गुजरात राज्याच्या काँग्रेस प्रभारीपदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. वयाच्या चाळीसाव्या वर्षी एवढ्या एका संपूर्ण राज्याची जबाबदारी मिळालेला हा काँग्रेसचा सर्वात तरुण नेता असावा. गुजरात निवडणुकांमुळे ते २०१९ ची लोकसभा निवडणूक लढले नाहीत

परंतु राज्यसभेत हुसेन दलवाई यांची जागा रिक्त होताच राहूल गांधी यांनी सातव यांची त्या जागी निवड करत त्यांना वरच्या सभागृहात पाठवले. संसदेत भाजपच्या विरोधात आक्रमकपणे बोलणाऱ्या काँग्रेसच्या यंग ब्रिगेडचे ते महत्त्वाचे वक्ते मानले जात होते. कितीही टोकाचा प्रसंग आला तरी आपली सभ्यता न सोडणाऱ्या पण तरीही आक्रमकपणे आपला मुद्दा मांडणाऱ्या सातव यांना काँग्रेसचे उज्वल भविष्य म्हणूनच ओळखले जात असे.

लोकसभेत खासदार म्हणून त्यांची कामगिरी चांगली आहे असे विरोधक देखील मान्य करायचे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी राजीव सातव यांनी जय्य्त तयारी केली होती. काँग्रेस मधील सगळे गट तट बाजूला ठेवून मोदी शहा याना जोरदार टक्कर देण्यासाठी ते सज्ज झाले होते. मध्यंतरी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपद त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं नकार दिला होता व माझी पक्षाला गरज गुजरात मध्ये आहे असा सांगितलं होतं. यावरून २०२२ च्या निवडणुकीसाठी ते किती गंभीर आहेत हे दिसत होतं.

अहमद पटेल यांच्या निधनानंतर गुजरातची सगळी सूत्रे त्यांच्याच हातात अली होती. आता कुठे लढाईला सुरवात होत होती मात्र अचानक आलेल्या कोरोनाच्या आघातात त्यांना विजय मिळवता आला नाही. त्यांचे निधन झाले. या तरुण नेत्याच्या अकाली जाण्यामुळे फक्त काँग्रेस साठी नाही तर संपूर्ण देशासाठी न भरून काढता येण्याजोगे नुकसान झाले आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.