अगोदर ईडी चौकशी मग ‘लेटरबॉम्ब’…पण तरी संजय राऊत म्हणतायेत “अभी ट्रेलर बाकी हैं “

आज सकाळी-सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठा बॉम्ब फोडला आहे…..शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे कि, सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली. इतकाच नाही तर राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना लिहिलेल्या पत्रात ईडीवर अन भाजपवर अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. 

“सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर…तुरुंगात डांबलं जाईल”

हि बातमी आलीच कि, तितक्यात दुसरा बॉम्ब त्यांनी पत्रकार परिषद घेऊन फोडला…

त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत, सरकार चालवताय की, माफियांची गँग, असा सवाल केंद्र सरकारला विचारला. आता पुढची पत्रकार परिषद आपण थेट ईडीच्या कार्यालयासमोर घेऊ आणि ईडीच्या घोटाळ्याचं कशा पद्धतीनं कामकाज चालतंय या साऱ्याचा पर्दाफाश करु, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे. 

तसेच मला काय सांगायचं आहे, हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलं कळतंय, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात देवेंद्र फडणवीस कनेक्शन कसा काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

संजय राऊत म्हणाले की, “तुम्ही पाहत राहा फक्त याचे सुत्रधार कोण आहेत. बेकायदेशीरपणे ईडी ऑफिसमध्ये जाऊन कोण लोक बसत आहेत आणि ऑपरेट करत आहेत. ईडीच्या कार्यालयात इतरांना प्रवेश नाही ना? मग हे दोन-तीन लोक, कार्यालयात बसतात. ईडीच्या अधिकाऱ्यांना आदेश देतात. काय करायचंय? कोणाला बोलवायचं? कोणाला टॉर्चर करायचं? मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतोय आणि त्यांना माहितीये मला काय सांगायचंय ते.”

हे सरकार पडणार नाही. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो. मी मागेही म्हणालो, आम्ही तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही.” असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.

ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.  भाजपच्या अनेक नेत्यांच्या नावे मोठमोठे घोटाळे आहेत. केंद्र सरकारमुळे आणीबाणीपेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असं राऊतांनी म्हटलं आहे.

त्यांनी हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत ‘सत्यमेव जयते’ असे लिहिले आहे.

संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करतांना म्हटले की, राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली होती. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात असेही राऊत यांनी म्हटले आहे. 

राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिल्यानंतर प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी आपल्याला फोन केल्याचा गौप्यस्फोटही केला आहे.  आपण कोणत्या दडपशाहीला जुमानत नाही असे सांगत राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. राऊत म्हणाले ‘केंद्रीय तपास यंत्रणा क्रिमिनल सिंडिकेटचा भाग झाल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आर्थिक घोटाळे सुरु आहेत. विरोधक वारंवार सांगत आहेत की तुम्हाला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल. मात्र, त्याच कोठडीत आमच्या मागोमाग तुम्हालाही जावं लागेल.

तसंच हे पत्र म्हणजे फक्त माहितीसाठी आहे अजून तर ट्रेलर यायचा बाकी आहे असं देखील ते बोलले. 

सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर मी नाकारली आणि म्हणूनच माझ्या मागे आणि माझ्या कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर ईडी मार्फत कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

पण या पत्राच्या आधीची पार्श्वभूमी आणि संपूर्ण प्रकरण पाहणं देखील महत्वाचं आहे….

काहीच दिवसांपूर्वी संजय राऊत यांच्या जवळच्या सहकाऱ्यावर ईडीची कारवाई झाली. १०३४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) संजय राऊत यांचा जवळचा सहकारी प्रवीण राऊत याला अटक केलीय. याप्रकरणी संजय राऊत यांच्या मुलींच्या फर्ममध्ये भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावर ईडीने छापा टाकला होता. जमीन घोटाळ्याचे तार पाटकर यांच्याशी संबंधित असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

२०१० मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नीला ५५ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. या पैशांचा उपयोग करत त्यांनी दादरमध्ये फ्लॅट खरेदी केले होते. मात्र यावर चर्चा झाल्यानंतर आपण माधुरी राऊत यांच्याकडून घेतलेले पैसे त्यांना परत केल्याचे राऊत यांच्या पत्नीने म्हटले होते. एचडीआयएलमध्ये १ हजार ०३४ कोटी रुपयांचा घोटाळा उघड झाल्यानंतर प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आले. त्यांच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले होते अशी माहिती ईडीला मिळाल्याच्या आधारे ईडीने ही कारवाई केली आहे.

तपास यंत्रणांनी आतापर्यंत २८ जणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. या लोकांनी तपास यंत्रणांना अनुकूल असा जबाब द्यावा अन्यथा गंभीर परिणाम भोगावे अशी धमकी त्यांना देण्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले.

राऊत यांनी म्हणल्याप्रमाणे, अलिबागमध्ये त्यांची एक एकर जमीन आहे. ही जमिन १७ वर्षांपूर्वी खरेदी केली होती. ज्यांच्याकडून जमीन खरेदी केली, त्यांच्या कुटुंबीयांना ईडीकडून त्रास दिला जात आहे. जमीन व्यवहारासाठी कागदपत्रांसाठी नमूद असलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम मिळाली अशी कबुली द्यावी यासाठी ईडीकडून त्यांना धमकी दिली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.

तसेच राऊत यांच्या मुलीचा मागील वर्षात विवाह सोहळा पार पडला. त्याशी संबंधित देखील ईडीने चौकशी सुरु केल्याचं सांगितलं जातंय. राऊत यांच्या सांगण्यानुसार, तपास यंत्रणांकडून विवाह सोहळ्यासाठी असलेले डेकोरेटर्स आणि इतर विक्रेत्यांना ५० लाख रोख मिळाल्याचा जबाब घेण्यासाठी फोन करून धमकावत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. आमच्या पक्षाचे आमदार, खासदार, राजकीय नेते तसेच त्यांचे नातेवाईक, मित्र आणि परिचित यांना धमकावण्यास आणि त्यांचा छळ करण्यात येत असल्याचाही आरोप राऊत यांनी केला आहे.

आता संजय राऊत यांचे आरोप आणि त्यांची लिहिलेले पत्र हे पाहता नेमका काय गोंधळ आहे हे तर समोर आले पण संजय राऊत ज्याप्रकारे म्हणाले कि, हे पत्र फक्त माहितीसाठी मी पाठवले अजून तर ट्रेलर यायचा बाकी आहे.

जसं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं तसं भाजप आणि शिवसेनेतील कोल्ड वॉर संपूर्ण महाराष्ट्र बघतोय..

त्यात केंद्रात असलेल्या भाजप सरकारवर सातत्याने आरोप होत आला आहे कि, महाराष्ट्रात त्यांची सत्ता स्थापन होऊ शकली नाही म्हणून ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुद्दाम गैरव्यवहारात गोवलं जातंय.  तर भाजपकडून कायम या आरोपांचा इन्कार केला जातो.

पण या नेत्यांचे आरोप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाया आणि सातत्याने भाजपवर होणारे उघड आरोप. तसेच “भाजप नेते ब्लॅकमेल करत, आमच्या पक्षात या नाही तर तुरुंगात जा अशी कूटनीती वापरत असल्याचा आरोप आघाडीचे नेते आजवर करत आलेत. त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपमध्ये होणारे इन्कमिंग देखील जोरात सुरू होते, त्यात एक महत्वाचं नाव होतं ते म्हणजे काँग्रेसमधील बडे नेते हर्षवर्धन पाटील. 

भाजपवर तपास यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापराचे आरोप आणि त्याचदरम्यान नुकतेच भाजपमध्ये गेलेले हर्षवर्धन पाटील यांचे हे “भाजपमध्ये आल्यापासून सगळं निवांत; चौकशीचा त्रास नाही, शांत झोप लागते” हे विधान हे काहीतरी संकेत देतायत का याची देखील चर्चा झाली होती…असो आत्ता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा बॉम्ब फोडला आहे…अजून काय पिक्चर असणार आहे तेही काही काळात स्पष्टच होईल.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.