इलेक्ट्रिकल इंजिनिअर करणाऱ्या मुलाच्या डोक्यात आलेली कल्पना म्हणजे मिस्टर बीन

आपण मोठे होत जातो तसे लहानपणी ज्या लोकांनी आपलं बालपण आनंददायी केलं अशा लोकांना आपण काहीसे विसरतो. ही माणसं कोण तर कार्टून्स. वय वाढत जातं तसं, लहानपणी जी कार्टून चॅनल आपण आवर्जून बघायचो, ती चॅनल लावण्याकडे पुन्हा काही हात जात नाही. सिनेमे, बातम्या अशा अनेक गोष्टी आपण पाहत असतो. परत बालपणीच्या या सवंगड्यांच्या हात आपण कधी सोडतो आपल्याला कळत नाही.

बालपणीचा काळ सुखाचा करणारा असाच एक माणूस म्हणजे मिस्टर बीन.

चार्ली चॅप्लिन आपल्या सर्वांना माहीत आहेत. अतिशयोक्ती होणार नाही परंतु चार्ली चॅप्लिन नंतर ज्या माणसाने एकही संवाद न बोलता खळखळून हसवलं असा माणूस म्हणजे मिस्टर बीन. चेहऱ्यावरील हावभाव किती बोलके असतात हे मिस्टर बीनने दाखवून दिलं. बदलणाऱ्या जगात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी पदोपदी धडपड करणारा असा मिस्टर बीन.

मिस्टर बीनच्या निर्मितीमागची कहाणी मोठी विलक्षण आहे.

रोवान ऐटकिन्सन या हॉलिवूड कलाकाराने मिस्टर बीनची भूमिका साकारली. रोवान ऐटकिन्सन यांनी हॉलिवूडमध्ये काही सिनेमांमध्ये सुद्धा भूमिका साकारल्या. परंतु मिस्टर बीन म्हणून त्यांना मिळालेली ओळख अजरामर आहे.

मिस्टर बीन या व्यक्तिरेखेची मूळ संकल्पना त्यांचीच आहे.

रोवान ऐटकिन्सन ऑक्सफर्ड विद्यापीठात इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग मध्ये मास्टर्स करत होते. यावेळी शिकतानाच त्यांच्या मनात ही कल्पना आली.

१९७९ साली रॉबर्ट बॉक्स या नावाने एका कॉमेडी शो मध्ये ऐटकिन्सन यांनी पहिल्यांदा ही व्यक्तिरेखा लोकांसमोर रंगवली.

पुढे अनेक छोट्या-मोठ्या लाईव्ह कॉमेडी शो मध्ये ऐटकिन्सन लोकांसमोर हे पात्र सादर करत होते. कोणताही संवाद नाही, आकर्षक अशी वेशभूषा नाही. फक्त चेहऱ्यावरील हावभावाने ऐटकिन्सन लोकांना हसवत होते.

आपण सादर करत असलेल्या व्यक्तिरेखेला काहीतरी वेगळं नाव असावं, जे पटकन लोकांना आवडेल असं ऐटकिन्सन यांना या काळात वाटत होतं. मग त्यांनी काही भाज्यांची नावे या व्यक्तीरेखेला द्यायला सुरुवात केली. एकदा मार्केटमध्ये भाजी खरेदी करायला गेले असताना तिथे असलेल्या अनेक भाज्या बघून त्यांनी मनात भाज्यांची नावं घोळवायला सुरुवात केली. गाजर, कोबी अशी अनेक नावं त्यांच्या मनात आली.

आणि अखेर समोर दिसलेली फरशीची भाजी बघून त्यांना व्यक्तिरेखेसाठी ‘मिस्टर बीन’ हे नाव योग्य वाटलं.

१९९० साली अमेरिकन टेलिव्हिजनवर ऐटकिन्सन यांनी मिस्टर बीनला जगभरातील प्रेक्षकांसमोर आणलं. अल्पावधीतच मिस्टर बीनची लोकप्रियता इतकी शिगेला पोहोचली की, जवळपास 200 देशांमधील असंख्य प्रेक्षक मिस्टर बीन पाहत होते. १४ भागांची असलेली ही मालिका पाच वर्ष टेलिव्हिजन वर सुरू होती. आणि त्यानंतर सुद्धा दाखवली गेली.

आजही क्वचित ‘पोगो’ या कार्टून नेटवर्क चैनल वर मिस्टर बीन ही मालिका दाखवली जाते.

मिस्टर बीन बोलत नाही. आणि जेव्हा बोलतो तेव्हा त्याचा आवाज फार जड असतो. ऐटकिन्सन यांनी स्वतःच्या व्ययक्तिक आयुष्यातून ही व्यक्तिरेखा रंगवली आहे. कारण, ऐटकिन्सन यांना आयुष्याच्या सुरुवातीला बोलण्याचा त्रास होता. त्यांचा आवाज काहीसा विचित्र होता. मग पुढे आवाजावर अनेक उपचार घेऊन त्यांनी स्वतःचं बोलणं सुधारलं.

सुरुवातीच्या आयुष्यातली बोलण्यामधील हीच विसंगती ऐटकिन्सन यांनी मिस्टर बीन साठी वापरली.

कालांतराने लोकप्रियता लक्षात घेऊन ऐटकिन्सन यांनी मिस्टर बीनची एक ॲनिमेटेड सिरीज बनवली. ही सिरीज सुद्धा लहान मुलांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

१९९७ साली ‘मिस्टर बीन : द अल्टिमेट डिझास्टर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. मालिकेप्रमाणेच ऐटकिन्सन यांनी सिनेमात रंगवलेले मिस्टर बीन सुपरहिट झाले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली.

२००७ साली याच सिनेमाचा पुढचा भाग ‘मिस्टर बीन हॉलिडे’ प्रदर्शित झाला. हा भाग सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडला. विशेष म्हणजे या सिनेमात ऐटकिन्सन यांच्या मुलीने एक छोटी भूमिका साकारली.

२०१२ साली लंडन येथे ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन होतं. या स्पर्धेमध्ये ऐटकिन्सन यांना निमंत्रण देण्यात आलं. तेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेच्या शुभारंभाच्या दिवशी ऐटकिन्सन यांनी स्पर्धक आणि हजारो प्रेक्षकांसमोर मिस्टर बीनचं लाईव्ह सादरीकरण केलं. एखाद्या कलाकाराच्या भूमिकेची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याला इतक्या मोठ्या स्पर्धेत निमंत्रण मिळणं, ही बहुदा पहिलीच गोष्ट असावी.

याच स्पर्धेच्या निमित्ताने ऐटकिन्सन यांनी “मिस्टर बीन या व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं.

परंतु आता मी यामधून रिटायर होतोय” अशी घोषणा केली.

हे जग माणसांच्या विचित्र स्वभावाने परिपूर्ण आहे. या जगात जशी चांगली माणसं असतात तशीच पावलोपावली स्वार्थी, मतलबी माणसं सुद्धा भेटतात. अशा जगात कोणाबद्दलही वाईट हेतू न ठेवता स्वतःच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घ्यायचा, हे मिस्टर बीन कायम शिकवत आला आहे.

जवळपास वीस वर्ष ऐटकिन्सन मिस्टर बीन भूमिका जगत होते. त्यांनी रिटायर व्हायचं जरी ठरवलं, तरी प्रेक्षकांच्या मनामधून ऐटकिन्सन आणि त्यांची मिस्टर बीन ही ओळख कधीच रिटायर होणार नाही.

  • देवेंद्र जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.