फुगे बनणारी MRF कंपनी आज टायर क्षेत्रात किंग बनली आहे….

टायरांची ओळख हि गावाकडल्या पोरांना सांगायची गरज नसते, कारण काठीने टायर पळवू पळवू त्यांचं लहानपण आनंदात व्यतीत झालेलं असतं. पुढे भलेही हा टायर पळवापळवीचा खेळ गायब झाला पण हे टायरचं आकर्षण मात्र कायम राहिलं. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीच्या बॅटवर असलेलं एमआरएफचं स्टिकर डोक्यात घर करून राहिलं. एमआरएफ टायर हा रबर क्षेत्रातला किंग मानला जातो, तर जाणून घेऊया एमआरएफची यशोगाथा.

ज्या ज्या वेळी टायरांचा विषय निघतो आपसूक डोळ्यापुढे एमआरएफ नाव येतं. एमआरएफ हि भारतातली सगळ्यात मोठी टायर निर्माण करणारी कंपनी आहे. या एमआरएफ कंपनीची सुरवात केली के एम मम्मन मप्पिलाई यांनी. १९२२ साली केरळच्या एका ख्रिस्ती परिवारात त्यांचा जन्म झाला. ८ भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा मोठा परिवार होता, मद्रासच्या ख्रिश्चन कॉलेजातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 

के एम मम्मन मप्पिलाई यांच्या वडिलांचा एक न्यूजपेपर आणि बँकेचा व्यवसाय होता पण स्वातंत्र्यकाळातील आंदोलनांमुळे एका वादात ते सापडले आणि हे व्यवसाय कामाचे बंद होऊन त्यांना जेलमध्ये जावं लागलं. मप्पिलाई यांच्यासाठी हा मोठा धक्का होता, वडिलांना अटक झाल्यावर घरची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. कॉलेजातल्या फरशीवर ते रोज झोपी जायचे इतकी बिकट वेळ त्यांच्यावर आली.

पुढे कसबसं शिक्षण पूर्ण करून के एम मम्मन मप्पिलाई पत्नीसोबत एका झोपडपट्टीत राहू लागले. या झोपडपट्टीत राहत असताना नातेवाईकांकडून उधारीवर त्यांनी १६ हजार रुपये घेतले आणि फुगे बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. या कंपनीचं नाव त्यांनी ठेवलं मद्रास रबर फॅक्टरी. के एम मम्मन मप्पिलाई हे फुगे बनवून स्वतः विकायला जात असे. 

के एम मम्मन मप्पिलाई हे बोलण्यात इतके पटाईत होते कि ग्राहकांना ते रिकाम्या हाताने जाऊ देत नसायचे, चांगल्या बोलण्याने ते ग्राहकाला मोहित करत असे. १९४९ पर्यंत त्यांनी लॅटेक्स, खेळणी विकायला सुरवात केली. एक नवीन ऑफिस सुरु केलं. मप्पिलाई यांनी इथून आपला व्यवसाय वाढवायला सुरवात केली. ते आपल्या एका भावाला भेटले ज्याचा टायरवर रबर चढवण्याचा व्यवसाय होता.

हे रबर ते परदेशातून मागवत असायचे. भावाच्या मदतीने के एम मम्मन मप्पिलाई रबर बनवायचं तंत्र शिकले आणि या क्षेत्रात त्यांनी उडी मारली. एमआरएफने इथून मागे वळून पाहिलंच नाही, ग्राहकांना एमआरएफच्या टायरांची भुरळ पडू लागली. कारण हे टायर टिकावू आणि मजबूत होते. एमआरएफच्या एन्ट्रीने इतर कंपन्यांनी या क्षेत्रातून काढता पाय घेतला.

एमआरएफ हा रबर बाजारातला किंग बनला.

एमआरएफ टायरला सरकारकडून चांगलं उत्तेजन आणि मदत मिळाली. १९६४ साली एमआरएफचा लोगो आला. या लोगोतला मसल मॅन चांगलाच गाजला. १९६७ हे साल महत्वाचं होतं कारण भारताने टायर बनवणाऱ्या अमेरिकेलाच एमआरएफचे टायर विकायला सुरवात केली. अनेक कंपन्यांसोबत टाय अप करून एमआरएफने आपला व्यवसाय वाढवला आणि विदेशातही आपली हवा केली.

भारताची पहिली गाडी असलेल्या मारुतीमध्ये एमआरएफचीच टायर होती. आज घडीला एमआरएफ मुळे १७ हजार लोकांना रोजगार मिळतोय. १२ हजार करोडपेक्षा जास्त टर्नओव्हर आज एमआरएफ कंपनीचा आहे. २००९ साली एमआरएफ कंपनीने ५ हजार ६७२ करोडचा सेल केला होता. भारतातली सगळ्यात मोठी टायर कंपनी म्हणून एमआरएफला ओळखलं जातं. 

१९९३ साली एमआरएफच्या शेअरची किंमत ११ रुपये होती आज बाजारात एमआरएफच्या शेअरची किंमत ८० हजाराच्या पार गेली आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.