आणि दिवाळीच्या आदल्या दिवशीच धोनी नावाचा बॉम्ब फुटला
भावा धोनी रोज चार लिटर दूध पितो, मॅच बघितलेल्या प्रत्येक पोराच्या तोंडात हेच वाक्य होतं. आता जशी पॉन्टिंगच्या बॅटमधली स्प्रिंग खरी मानली होती, तसंच पोरांनी धोनीनं पिलेलं दूध पण खरं मानलं. त्याचं कारणही तेवढंच सॉलिड होतं, धोनीनं दिवाळीच्या आदल्याच दिवशी लंकेविरुद्ध लय बेकार फटाके फोडलेले.
श्रीलंकेची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. पहिल्या दोन वनडे भारतानं किरकोळीत जिंकल्या, तिसरी वनडे होती जयपूरला, दिवाळीच्या आदल्या दिवशी.
लंकेनं टॉस जिंकून बॅटींग घेतली आणि तोडायला सुरुवात केली. संगकारा नॉटआऊट १३८, जयवर्धने ७१ आणि जाता जाता परवेझ महारुफचे नॉटआऊट ३३, तिघांनी हाणामारी केली आणि लंकेचा स्कोअर झाला २९८.
आता त्या दिवसात तीनशेचं टार्गेट म्हणजे डोक्यावरून पाणी वाटायचं. सचिन-सेहवाग ओपनिंगला आले. चामिंडा वासनं पहिल्याच ओव्हरमध्ये सचिनला आऊट केलं. पण सचिन आऊट झाल्यावर टीव्ही बंद करायचे दिवस आता गेले होते.
मग तिसऱ्या नंबरवरचा भिडू क्रीझवर आला. मानेवर रुळणारे लांब केस, दंडाला सैल बसणाऱ्या टीशर्टच्या बाह्या आणि हातात Rbk लिहिलेली बॅट. नाव महेंद्रसिंह धोनी!
आल्यावर पहिली ओव्हर धोनी जरा निवांत खेळला, त्यानं पहिला सिक्स हाणला तो चमिंडा वासलाच. तिथून पुढं सुरू झालं ते बाजार उठवणं. वास, फर्नांडो, महारुफ, चंदना, पार्ट टाईम टाकायला आलेला दिल्शान सगळ्यांनी मार खाल्ला. फटके न पडलेला एकच बॉलर होता, तो म्हणजे मुरलीधरन.
धोनीनं फक्त ४१ बॉलमध्ये आपली फिफ्टी पूर्ण केली. इंडिया फिक्स तीनशे करणार असं वाटायला लागलेलं, त्याचं कारण होतं धोनी! पन्नास झाली आता टार्गेट शंभरचं. पुढच्या ४५ बॉलात त्यानं सेंच्युरी पण पूर्ण केली. जयपूरच्या ग्राऊंडवर नुसता कल्ला सुरू होता.
तेव्हा धोनी सेलिब्रेशन पण करायचा, त्यानं बंदुकीसारखी बॅट धरली आणि ड्रेसिंग रूमकडे बघत बार उडवला. हेल्मेट काढून दोन्ही हात उंचावले आणि त्याचे हवेवर उडणारे केस बघून, पोरींनी फ्लाईंग किस फेकल्या.
मग हाणामारी वाढत वाढत दीडशेपर्यंत गेली. तेही फक्त १२३ बॉलमध्ये. पाकिस्तानला मारलेले १४८ आणि आता १५० नॉटआऊट, सगळ्या जगाला कळलेलं धोनी काय साधा खिलाडी नाही. आता मॅच जिंकवून द्यायचा विषय तेवढा राहिलेला.
द्रविड आणि युवराज गेल्यामुळं धोनीवर एक्स्ट्राचं प्रेशर आलेलं. पण त्यानं ठरवलेलं, जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही. भारतानं ४० ओव्हर्समध्येच २५६ रन्स मारले होते. त्यामुळं जिंकायचं गणित फिक्स बसणार असं वाटत होतं.
वेणूगोपाळ रावनं जरा निवांत गाडी धरली. धोनी पण तसा निवांतच खेळतच होता, पण लूज बॉल मिळाला की छपरावर नायतर ऑडियन्समध्ये हाणायचा. म्हणता म्हणता टार्गेट जवळ आलं, ४५ व्या ओव्हरमध्ये चंदनानं २ सिक्स खाल्ले. पुढच्या ओव्हरमध्ये धोनीनं वेणूगोपाळला स्ट्राईक दिली, त्या गड्यानं सगळी ओव्हर टुकूटुकू खेळली.
आता ४७ वी ओव्हर, बॉलर दिल्शान, स्ट्राईकवर धोनी. पहिल्याच बॉलला धोनी क्रीझ सोडून पुढं आला आणि मिडविकेटवरून कडकडीत छकडा. एकदम, फिनिशिंग ऑफ इन स्टाईल.
धोनीभाऊंनी १४५ बॉलमध्ये १५ फोर आणि १० सिक्स हाणत नॉटआऊट १८३ केले. त्यादिवशी मनापासून वाटलेलं लंकेनं जरा २०-२५ रन्स जास्त केले असते, तर धोनीनी एकट्यानं दोनशे मारायला पण कमी केलं नसतं.
धुरळा काय असतो, हे सगळ्या जगानं बघितलं. ललित मोदींनी धोनीला डायरेक्ट १० लाखांचं बक्षिस जाहीर केलं. कॅप्टन द्रविडपासून सगळ्यांनी धोनीचं फुल फ्लेज कौतुक केलं. सगळ्या भारताची दिवाळी गोड झाली.
पण धोनीची हवा फक्त तीनच गोष्टींमुळं झाली- चार लिटर दुधाची ताकद, लांब केस आणि Rbk लिहिलेली बॅट.
हे ही वाच भिडू:
- धोनीअण्णाची चेन्नई सारखीच कशी बरं जिंकत्या?
- लांब केसाच्या धोनीला बघून मुशर्रफ गांगुलीला म्हणाले, इसे कहां से उठा के लाए हो..?
- एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक सिक्ससाठी धोनीला ५० रुपये बक्षीस म्हणून मिळायचे