२००७ च्या वर्ल्डकपला रवी शास्त्रींची भविष्यवाणी धोनीने चुकीची ठरवली होती…..

२००७ चा टी ट्वेन्टी वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता आणि भारताची जवळपास सगळीच टीम युवा होती.  या युवा टीमची जबाबदारी होती नवखा कर्णधार झालेल्या महेंद्रसिंग धोनीच्या हातात. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारताचं हे पहिलंवहिलं आयसीसी टूर्नामेंट होतं.

भारतीय संघ नवीन त्यात टी ट्वेन्टी वर्ल्डकप आणि अगोदरच्या काही सामन्यांमध्ये कर्णधार बदलावरून झालेले परिणाम स्पष्ट होते. अशा वेळी कॉमेंटेटर रवी शास्त्री यांनी एक भविष्यवाणी केली होती आणि महेंद्रसिंग धोनीने यावरून शास्त्रींची चांगलीच खरडपट्टी काढली होती. 

२२ सप्टेंबर २००७ साली भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच जिंकून दिमाखात फायनलमध्ये प्रवेश मिळवला. या मॅचसोबत एक अजून महत्वाची घटना घडली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मॅच जिंकली आणि मॅच प्रेझेंटेशनच्या वेळी रवी शास्त्री दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना प्रश्न विचारत होते आणि त्यांचा इंटरव्ह्यू सुरु होता. याचवेळी रवी शास्त्री यांनी धोनीबद्दल एक मजेदार कमेंट केली होती.

विनिंग कॅप्टनला ज्यावेळी बोलावण्यात आलं त्यावेळी धोनी शास्त्रींकडे गेला आणि शास्त्री काही बोलायच्या आतच तो म्हणाला, आपण सुरु करायच्या अगोदर मी थोडं सांगतो कि क्रिकइन्फो मध्ये मी एक आर्टिकल वाचलं होतं. ज्यात तुम्ही म्हणाला होता कि आजच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया फेव्हरेट आहे आणि ऑस्ट्रेलियाचा हि मॅच जिंकणार आहे. आज मला असं वाटतंय कि मी आणि माझ्या खेळाडूंनी तुमचा अंदाज चुकीचा ठरवला आहे.

जेव्हा हि घटना बाहेर आली तेव्हा क्रिकइन्फो या पोर्टलनेसुद्धा हि बातमी आपल्या ट्विटरवर शेअर केली होती. क्रिकइन्फोने ती बातमी ट्विटरवर शेअर केल्यावर त्यावर रवी शास्त्रींनी एक मजेदार कमेंटसुद्धा केली होती कि, क्रिकइन्फोवर लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरीच असते असं काही नाही, अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये.

फक्त रवी शास्त्रीच नाही तर तेव्हा अनईक दिग्गज खेळाडूंनी भारत हा टी ट्वेन्टी वर्ल्ड कप जिंकूच शकत नाही असं भाष्य केलं होतं पण धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये अशा भविष्यवाणी करणाऱ्या लोकांची तोंडं भारतीय संघाने बंद केली होती. त्या वर्षीचा वर्ल्डकप भारत जिंकला आणि जगभर भारतीय संघाबद्दल लोकांचा एक वेगळा दृष्टिकोन तयार झाला.

रवी शास्त्रीनी भलेही त्यावेळी भारताला विजेत्यांच्या यादीत ग्राह्य धरलं नसेल पण त्या वर्षी गौतम गंभीर, श्रीशांत, जोगिंदर शर्मा, युवराज सिंग अशा सगळ्यांनी बाजी पालटवली आणि भारताला विजय मिळवून दिला. अजूनही जोगिंदर शर्माच्या बॉलिंगवर मिस्बाह उल हकने हवेत मारलेला तो शॉट आणि श्रीशांतने घेतलेला तो कॅच अजूनही तमाम क्रिकेटप्रेमी विसरू शकत नाही. श्रीशांतने ऑस्ट्रेलियाची केलेली तोडफोड अजूनही बऱ्याच लोकांची ती फेव्हरेट मॅच आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.