जडेजानं चेन्नईची कॅप्टन्सी सोडली, ‘तो’ पुन्हा आलाय, पण यामागची कारणं काय असतील…

पहिल्या बाहुबलीचा पिक्चरचा इंटरव्हल आठवतो का? भल्लाळदेवचा मेहनतीनं बनवलेला सोन्याचा पुतळा बाहुबलीचं पोरगं ताकद लाऊन पडण्यापासून वाचवतं. भल्लाळदेवचा पुतळा उभा राहतो खरा, पण त्याच्यामागं बाहुबलीचा त्याहीपेक्षा मोठा पुतळा उभा राहतो आणि आपल्या फ्युजा उडतात.

हा एवढा जुना सिन तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे, सध्या चेन्नई सुपर किंग्सची असलेली अवस्था.

विस्कटून सांगतो, चेन्नई सुपर किंग्स म्हणजे ‘एक राजा, बाकी सगळी प्रजा.’ इथला खरा बाहुबली म्हणजे थाला धोनी. २०२१ ची आयपीएल थाटात जिंकवून दिल्यानंतर धोनी बोलताना दिसला होता, ‘जॉब डन.’

लोकांचा अंदाज होता, की पल दो पल का शायरचं आयपीएल व्हर्जन आता येणार. पण धोनी म्हणला ‘I haven’t left behind.’ यंदाच्या आयपीएलवेळी प्रॅक्टिस आणि सोशल मीडियावरही दिसला. पण मॅचच्या आधी धक्का देण्याची परंपरा मात्र त्यानं कायम ठेवली.

चेन्नई सुपर किंग्सनं नवा कॅप्टन जाहीर केला, रवींद्र जडेजा.

१५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सनं धोनी सोडून कुणाला तरी पूर्णवेळ कॅप्टन म्हणून नेमलं होतं. पण स्टोरी सुफळ संपूर्ण झाली नाय. कारण कॅप्टन बदलला आणि चेन्नईचं नशीबही.

पहिल्या चारही मॅचेसमध्ये चेन्नईला एकपण विजय मिळवता आला नाही. पाचव्या मॅचमध्ये जिंकले, सहाव्यात हरले, सातव्यात जिंकले आणि पुन्हा आठव्यात हरले. म्हणजे आठ मॅचेसमध्ये फक्त २ विजय, खात्यात फक्त चार पॉईंट्स. चेन्नईनं प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा पूर्णपणे संपुष्टात आल्या नसल्या, तरी गोष्ट अवघड आहे.

ही अवघड गोष्ट सोपी करण्यासाठी चेन्नईनं महेंद्रसिंह धोनीला पुन्हा कॅप्टन केलंय.

आता ‘तो पुन्हा आला’ असला, तरी गुणी आणि मेहनती जडेजानं अचानक कॅप्टन्सी का सोडली? या प्रश्नानं आमचं लय डोकं खाल्लं. आम्ही आधी आमच्याच कार्यकर्त्यांना विचारून बघितलं, प्रत्येक जण क्रिकेट विश्लेषक झाला आणि पर हेड दोन थेअऱ्याही मांडल्या.

त्यातला सार असा होता, की चेन्नई जिंकत नाही म्हणून जडेजानं कॅप्टन्सी सोडली, पण एवढं सिम्पल नसतंय. 

कॅप्टन बदलताना चेन्नई सुपर किंग्सनं कारण दिलं, की जडेजाला स्वतःच्या खेळावर लक्ष द्यायचं होतं. त्यामुळं त्यानं कॅप्टन्सी सोडली.

बघायला गेलं, तर हे कारण खरं आहे. जडेजा हा चेन्नईचाच नाही, तर जगातल्या बाप ऑलराऊंडर्सपैकी एक. बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तुम्ही डिपार्टमेंटमधून जडेजा मॅच फिरवू शकतो. पण कॅप्टन झाल्यापासून हा स्पार्क चमकलाच नाही.

आठ मॅचेसमध्ये जडेजानं फक्त ११२ रन्स केलेत. ज्या आक्रमकतेसाठी जडेजा ओळखला जातो, ती त्याच्या बॅटिंगमध्ये एकदाही दिसली नाही. समोरच्या टीमला तो जडेजा स्पेशल तडाखा बसलाच नाही आणि साहजिकच चेन्नईच्या विजयाचं गणित अवघड होत गेलं.

जडेजाचं दुसरं बलस्थान म्हणजे बॉलिंग. 

त्याच्या वळणाऱ्या बॉलपेक्षा सरळ येणारा बॉल जास्त घातक असतोय. पण सध्या ना त्याचा सरळ येणारा बॉल भारी ठरतोय, ना वळणारा. कारण आठ मॅचेसमध्ये भावाला फक्त पाच विकेट्स मिळाल्यात. कित्येक मॅचेसमध्ये त्यानं आपल्या चार ओव्हर्सही पूर्ण टाकलेल्या नाहीत. थोडक्यात खुंखार जड्डूचा आत्मविश्वास कुठंतरी हरवून गेल्यासारखा झालाय.

सगळ्यात आश्चर्य वाटणारी गोष्ट म्हणजे, जडेजाकडून चक्क फिल्डिंगमध्ये चुका होतायत. जडेजानं कॅच सोडला, ही डोळ्यांनी बघितल्याशिवाय विश्वास न बसणारी गोष्ट. मात्र सध्या हे जगातलं नववं आश्चर्यही घडताना दिसतंय.

पण ही झाली आकडेवारीची आणि प्रेशरची कारणं…

जडेजा कॅप्टन झाल्यावरही मैदानातले बरेचसे निर्णय धोनीच घेत होता. बॉलर बदलणं असेल किंवा फटके पडलेल्या बॉलरला समजावणं असेल, सिनियर खेळाडू म्हणून धोनी आपली जबाबदारी पार पाडत होता खरी. नाही म्हणलं, तरी इतके वर्ष नेतृत्व करुन या गोष्टी त्याच्या अंगवळणीही पडल्या असणारच. पण जरा कुठं खुट्ट झालं, की मैदानात धोनीच दिसायचा.

दुसऱ्या बाजूला आतापर्यंत आयपीएलवर राज्य गाजवणारी चेन्नईची टीम एकामागोमाग एक मॅचेस हारत होती तरीही संघात फारसे बदल झाले नाहीत.

चेन्नईच्या गोटात कायम एक चर्चा असते, ती म्हणजे इथले सगळे निर्णय धोनीच घेतो. जडेजाला कॅप्टन बनवण्याचा सल्ला त्यानंच दिला होता. तेही वर्षभर आधीच. सिझनच्या आधी जडेजाला कॅप्टन बनवण्यातही त्याचीच भूमिका असणार. आता पुन्हा कॅप्टन होणंही, त्याच्या संमतीशिवाय झालेलं नसणार.

क्रिकेट बघताना थोडंफार डोकं लावलं की एक गोष्ट सहज समजते, की इथंही आयुष्यासारखंच लाऊन धरावं लागतंय. आज धंदा उभा केला आणि उद्या लाखात पैसे छापले असं कधी होत नाही. तसंच आज कॅप्टन झालो आणि लगेच जिंकायला सुरुवात झाली असं कसं होणार..?

असंही चेन्नईचं प्लेऑफमध्ये जाणं कठीण आहे, हाताशी टीम नवी आहे, त्यामुळं जडेजाला अनुभव येण्यासाठी संधी द्यायला हवी होती, असं कोणत्याही चाहत्याला वाटेल.

पण चेन्नईला कदाचित तसं वाटलं नाही, उरलेल्या सगळ्या मॅचेस जिंकून प्लेऑफ गाठण्याची त्यांची जिद्द अजून संपलेली नाही आणि तीच पूर्ण करायला धोनी पुन्हा आलाय…

चांगला प्लेअर, चांगला कॅप्टन बनतोच असं नाही, हे जडेजामुळं सिद्ध झालं असलं. तरी आपण अजून संपलेलो नाही, हे सिद्ध करण्याची आणखी एक संधी मात्र धोनीनं मिळवली आहे…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.