सांगून खोटं वाटेल, पण धोनीला एकेकाळी प्रत्येक सिक्सचे ५० रुपये मिळायचे…

पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका मॅच होती. भारतानं किरकोळीत मॅच जिंकली. अजित आगरकर पाच विकेट्स काढून बादशहा ठरला होता. पण दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेत फक्त धोनीची चर्चा होती.

कुणी म्हणत होतं धोनीचा सिक्स स्वारगेटला येऊन पडला, तर कुणाचं म्हणणं होतं तो रोज ५ लिटर दूध पितो. आता पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे म्हणून आपण हरलो आणि पुन्हा एकदा वर्ल्डकप फायनल खेळवणार आहेत, या अफवेवर आपण किरकोळीत विश्वास ठेवला होता, त्यामुळं धोनीचा छकडा स्वारगेटला आलाय आणि तो पाच लिटर दूध पितो, यावर विश्वास न ठेवण्याचा प्रश्नच नव्हता.

रुंद खांदे, मानेपर्यंत आलेले केस, खुंखार तब्येत, आरबीकेचं स्टिकर असलेली बॅट आणि बॉल चुकून पट्ट्यात घावला की पार लांबच्या स्टॅन्डमध्ये मारायची ताकद यामुळं धोनी तेव्हा कित्येक जणांचा फेव्हरिट झाला. 

आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये शून्यावर रनआऊट झालेला धोनी, आजच्या घडीला भारताच्या सगळ्यात यशस्वी कॅप्टन्सपैकी एक आहे. त्याच्याकडे दोन वर्ल्डकप आहेत, एक चॅम्पियन्स ट्रॉफी आहे, आयपीएल ट्रॉफ्यांचा तर विषयच नाही. एवढंच नाही, तर संपत्तीच्या बाबतीतही धोनी लय मोठ्या स्टेजवर गेलाय.

पण सांगून विश्वास बसणार नाही, धोनीला सुपरस्टार बनवण्यात त्याच्या कष्टासोबतच ५० रुपयांचाही मोठा वाटा आहे.

२००७ मध्ये भारतानं वनडे वर्ल्डकपमध्ये बेक्कार माती खाल्ली. म्हणजे बांगलादेशनं आपल्याला हरवावं इतकी तर आपली टीम शंभर टक्के खराब नव्हती. पण या पराभवानंतर भारतात लय राडा झाला. क्रिकेटर्सचे पोस्टर्स जाळण्यात आले, धोनीच्या तर घरावर पण दगडफेक झाली. त्यावेळेस एक फोटो बघितलेला, धोनीच्या फोटोवर कुणीतरी चिखल फेकलेला.

धोनीनं यावर प्रतिक्रिया काय दिली ? त्यानं भारताला २००७ चा टी२० वर्ल्डकप जिंकवून दिला. तेव्हा कित्येकांनी धोनीचे पेपरमधले फोटो कापून घरात लावलेले.

धोनीची प्रत्येक अचिव्हमेंट सांगायची म्हणलं, तर लय लांबड लागेल, पण २०११ च्या वर्ल्डकप फायनलशिवाय सगळंच अधुरं राहतं. फायनलमध्ये आपली वाट लागल्यात जमा होती. युवराजच्या वाटेवर डोळे लावलेले असताना, पॅव्हेलियनमधून धोनी उतरला. सगळ्या स्पर्धेत फॉर्ममध्ये नसलेल्या धोनीनं सगळ्यात मोठ्या मॅचमध्ये रिस्क घेतली.

त्यादिवशी धोनी फेल गेला असता, तर २००७ चा टी२० वर्ल्डकप विसरायला मिनिटही लागलं नसतं. पण त्यादिवशी धोनीची बॅट बोलली, अगदी मुरलीधरनला मारलेल्या बाऊंड्रीपासून ते कुलसेकराला मारलेल्या सिक्सपर्यंत.

आयुष्यातल्या सगळ्यात टफ मॅचमध्ये धोनीनं स्वतःवर जबाबदारी घेतली आणि ती गाजवलीही.

मैदानाबाहेरचा धोनी फॅसिनेटिंग वाटण्याचं कारण म्हणजे, क्रिकेट नसलं की तो काय करतो याचं गूढ त्यानं कायम ठेवलंय.

 त्याचे मित्र सांगतात, की तो रांचीत असला की कधीतरी कुणालाच न सांगता बॅडमिन्टन खेळायला येतो, तर कधी डोक्यात हेल्मेट आणि पोटाला लायसन्स असलेली गन लाऊन आवडत्या यामाहावर हिंडत असतो. 

त्याच्या आयुष्यावर पिक्चर आलेला असला, तरी अजूनही धोनीबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नाहीत, अशीच एक गोष्ट ५० रुपयांची.

झालं असं की, धोनी सेंट्रल कोल फिल्ड लिमिटेडकडून क्रिकेट खेळायचा. धोनी हाणामारीवाली बॅटिंग करायचा पण त्यामध्ये आणखी सुधारणा व्हायला हव्या असं धोनीचे कोच देवल सहाय यांना वाटायचं. ते कायम धोनीला नवीन नवीन आयडिया सांगायचे. पण धोनीचा खेळ हा पूर्णतः नॅचरल होता.

तो काय लय लोड घ्यायचा नाही. बाकीच्या प्लेअर्समधून उठून दिसायचं असेल, तर धोनीनं काहीतरी वेगळं करणं गरजेचं होतं. त्यामुळं सहाय सरांनी त्याला एक चॅलेंज दिलं.

त्यांनी शिश महल स्पर्धेदरम्यान धोनीला सांगितलं, ‘जितके सिक्स मारशील त्या प्रत्येक सिक्ससाठी तुला ५० रुपये मिळतील.’

धोनीनं समोरचा बॉलर ज्युनिअर की सिनिअर हे बघितलं नाही. त्यानं फक्त मारायचं हे धोरण कायम ठेवलं आणि सहायसरांना लई वेळा ५० रुपये द्यावे लागले. पण याच ५० रुपयांनी धोनीचा आत्मविश्वास वाढवला.

इथूनच त्याला सिक्स मारायची सवय जडली आणि याच सवयीनं आपलं २८ वर्ष लांबलेलं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न पूर्ण केलं.     

दर १ जानेवारीला धोनी जगाच्या पाठीवर कुठंही असला तरी नेमबाजीचा सराव करायला जातोच, त्याच्या हॉटेल रुमचं दार कधी बंद नसतं, मॅचचा रिझल्ट काहीही लागला तरी त्याचे हावभाव फारसे बदलत नाहीत. त्यानं हेअरस्टाईल सोबतच आणखी एक ट्रेंड सेट केला, ट्रॉफी जिंकली की नव्या प्लेअरकडे देऊन स्वतः कोपऱ्यात जाऊन उभं राहण्याचा.

धोनी असा प्लेअर आहे, की त्यानं ज्या पद्धतीनं रिटायरमेंट जाहीर केली, त्याचाही ट्रेंड झाला आणि त्यानं झाडाखाली गुडघेदुखीचे उपचार घेतले, त्याचीही बातमी झाली. त्याच्या रिटायरमेंटच्या व्हिडीओमध्ये त्याचं पहिल्या मॅचमधलं आणि शेवटच्या मॅचमधलं रनआऊट होणं आहे, कारण त्यानं स्वतःचं अपयश झाकायचे प्रयत्नही कधी केले नाहीत.

क्रिकेट आवडणाऱ्या कित्येकांनी सचिन रिटायर झाल्यावर क्रिकेट बघणं सोडून दिलं. धोनीच्या वाट्याला कदाचित तसं प्रेम येणार नाही. कारण सचिन आऊट झाला की कार्यक्रम गंडणार हे फिक्स असायचं. पण धोनीनं आपल्याला सवय लावली की, शेवटचा बॉल पडत नाही तोवर मॅच जिंकता येऊ शकते.

एम एस धोनी पिक्चरमधल्या एका सिनमध्ये, रेल्वे स्टेशनवर धोनीचे मास्तर त्याला आयुष्य आणि क्रिकेट कसं सारखं आहे हे दोन मिनिटात समजून सांगतात. धोनीही पहिल्या आणि शेवटच्या रनआऊटमधल्या अंतरात आपल्याला वेगळं काहीच शिकवत नाही.

धोनी भोवतीचं गूढ मैदानातही कायम राहण्याचं एक कारण आहे, कुठल्या मॅचनंतर धोनी अचानक रिटायरमेन्ट जाहीर करेल, हे सांगता येत नाही. 

त्यानं वर्ल्डकप फायनलमध्ये मॅच फिनिश केली होती तेव्हा आपल्या डोळ्यात आनंदाश्रू होते, तो रिटायरमेंट जाहीर करेल, तेव्हाही परिस्थिती वेगळी असणार नाही, हेच खरं….

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.