आजही अनेक घरांची पहाट आणि सांज एम एस सुब्बुलक्ष्मी यांच्याच लिजेंडरी आवाजाने होते

भारतीय संस्कृतीत कलेला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. त्याचमुळे तर अशा कलाकारांना देखील आपण भारतीय खूप मान, प्रेम, प्रोत्साहन देतो. अशाच भारताच्या रत्नांसाठी तर भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो. १९९८ साली असाच पुरस्कार एका भारतीय गायिकेला देण्यात आला. या गायिकेच्या आवाजाची जादू अशी होती की मोठमोठे दिग्गज लोक ते न कळणारे लहान लेकरंही आवाज ऐकला की मंत्रमुग्ध व्हायचे.

दिवाळीची पहाट असते. बाबा सकाळी लवकर आपल्याला उठवतात. जाम जीवावर आलेलं असतं मात्र तरीही आपण डोळे चोळत कसंतरी उठतो. डोळ्यातील अर्धवट झोप आईने तयार केलेल्या उटण्याच्या वासाने हळूहळू नाहीशी होत असतानाच अचानक एक आवाज कानी पडतो. बॅकग्राउंडला विष्णुसहस्त्र नाम सुरु असतं. क्षणातच आपण खडबडून जागी होतो. अगदी प्रसन्न वाटू लागतं. 

ही सगळी फिलिंग ज्या आवाजाने येते तो आवाज असतो ‘एम एस सुब्बुलक्ष्मी’ यांचा.

फक्त दिवाळीचीच नाही तर अनेक घरांची पहाट आणि सांज एम एस सुब्बुलक्ष्मी यांच्याच लिजेंडरी आवाजाने होते. सर्वसामान्यांच्या संगीत विश्वात सुब्बुलक्ष्मी प्रवेश करतातच संस्कृत श्लोक आणि बोलीभाषेतल्या काव्यामधून. 

फक्त हेच गाणं नाही तर ‘वैष्णव जन तो तेणे कहिये’ आणि ‘हरी तुम हरो जनु की पीर’ ही महात्मा गांधींची सगळ्यात आवडती गाणी सुब्बुलक्ष्मी यांनी गायली आणि अमर केली. फक्त हीच नाही तर त्यांची सगळीच गाणी भारतीय संगीतातली अनमोल रत्न ठरली आहेत. त्यांच्या गाण्यामध्ये गांधीजींना सुद्धा आपल्या मनाचा प्रतिध्वनी गवसला. एकदाच नाही तर आयुष्यभर गवसत राहिला. 

सुब्बुलक्ष्मी यांच्या आवाजातील ही गाणी गांधीजींना इतकी आवडायची की एकदा गांधीजी असंही म्हणाले होते, “या भजनांचे शब्द सुब्बुलक्ष्मी यांनी आपल्या आवाजात नुसते उच्चारले तरी, माझ्यालेखी ते दिव्य संगीत असेल”.

१९१६ सालचा त्यांचा जन्म. मदुरै इथे जन्मलेल्या सुब्बुलक्ष्मी त्यांनी लहानपणापासूनच संगीताला आपलं बनवलं होतं त्यांना गायनाची आवड लागली ती वयाच्या आठव्या वर्षी आणि ती देखील अशी की वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिलं भक्ती संगीत अल्बम गायलं. कर्नाटकी संगीतावर त्यांची मजबूत पकड तेव्हापासूनच तयार व्हायला लागली होती.

सुब्बुलक्ष्मी यांना संगीताची आवड लागायचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या घरातील सर्वांनाच संगीताची आवड होती. त्यामुळेच सगळ्यांनी त्यांना संगीत क्षेत्राशी जोडून धरलं. अवघ्या १३ व्या वर्षी संगीतात विलक्षण प्रतिभा दाखवणाऱ्या या मुलीला आनंदानं विद्यादान करणारे गुरु मिळत गेले. त्यांनी कर्नाटकी संगीत श्रीनिवास आयंगर, नंतर सेमंनगुडी श्रीनिवास आयंगर, पाननाशन शिवम यांच्याकडून शिकलं भारतीय संगीताची शिकवण त्यांना  पंडित नारायणराव व्यास, सिद्धेश्वरी देवी यांनी दिली.  

सुब्बुलक्ष्मी यांनी वयाच्या आठव्या ते दहाव्या वर्षापासूनच जनसभेसमोर गाणं सुरू केलं होतं. गायनाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा पुरुषांचे वर्चस्व होतं त्याच काळात सुब्बुलक्ष्मी यांनी स्वतःचं स्थान संगीतात निर्माण करणं सुरू केलं होतं. १९३६ मध्ये त्यांची भेट स्वातंत्र्य सैनिक आणि पत्रकार सदाशिवम यांच्याशी झाली होती. जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा सदाशिव विवाहित होते मात्र त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर १९४० मध्ये त्यांनी सुब्बुलक्ष्मी यांच्याशी लग्न केलं.

सुब्बुलक्ष्मी गायनात महारथी तर होत्याच मात्र त्यांनी अभिनयातही आपलं नाणं आजमावलं होतं.

 १९३८ मध्ये ‘सेवासदनम’ या चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता. तर ‘मीरा’ नावाच्या चित्रपटात त्यांनी मीराबाईचा रोल केला होता. शिवाय या चित्रपटातील सगळ्या गाण्यांना त्यांनीच आवाज दिला होता. ‘सावित्री’ नावाच्या चित्रपटात त्यांनी पुरुषाचा अभिनय केला होता. त्यांच्या पात्राचं नाव होतं नारद मुनी. मात्र गायनासाठी बनलेल्या सुब्बुलक्ष्मींनी लवकरच अभिनयाशी नातं तोडलं आणि गायनाची आणि संगीताशी नातं अजून घट्ट केलं. 

पत्रकार पतीच्या सहवासात असल्यामुळे स्वातंत्र्य लढ्यामधील व्यवहारांशी त्यांचा आयुष्यभर संबंध राहिला. त्यांच्या सांगण्यावरून निरनिराळ्या सामाजिक संस्थांसाठी निधी गोळा करण्याकरता, सुब्बुलक्ष्मी यांनी आनंदाने अनेक कार्यक्रम केले. सुब्बुलक्ष्मी सारखे संगीत साधना करणारे कलाकार कलेची उपासना करतात आणि तो रस एका निर्मळ स्वरुपात आपल्यासमोर सादर करतात. 

अंध हेलन केलरने सुब्बुलक्ष्मींच्या चेहऱ्याला स्पर्श करून म्हटलं होतं, “तुम्ही एखाद्या देवदुतासारखं गाता.”

सुब्बलक्ष्मी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत दहापेक्षा अधिक भाषांमध्ये गायल्या होत्या.  त्यामुळे संस्कृत, हिंदी, तामिळ, तेलगु अशा कोणत्याही भाषेत त्यांनी गायलेले श्लोक, बंदिशी, कविता सहजपणे मनाला भिडतात. संगीत संमेलनं, सिनेमा अशा जगात त्या वावरल्या. त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. त्यांनी मानवी जीवनातील सगळ्या भावनांना इतकं सुंदरतेने प्रेक्षकांसमोर मांडलं की ऐकणारा अगदीच त्यात स्वत:ला आपोआप शोधतात.

सुब्बुलक्ष्मी यांना आजही गायनातील देवी म्हटलं जातं. पंडित नेहरूंनी देखील त्यांचं वर्चस्व मान्य केलं होतं. ते म्हणाले होते, “सुरांच्या देवीसमोर मी तर साधा पंतप्रधान आहे”. 

अशा या सुब्बुलक्ष्मी यांना त्यांच्या गायन कलेने अजरामर केलं. मात्र त्या त्यांच्या खाजगी आयुष्यात खूप साधारण राहायच्या. असं सांगितलं जातं, जेव्हा त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला होता त्यावेळी त्या घरामध्ये हळदीचा लेप लावून बसल्या होत्या आणि ही बातमी कळताच त्यांचे उद्गार होते, ‘हे मला का दिलं जात आहे?’ यामध्ये त्यांचा साधेपणा दिसून येतो.

पंडित नेहरू, महात्मा गांधी यांच्या पासून ते थेट फाटक्यातुटक्या कपड्यानिशी, अनवाणी तीर्थाटन करणाऱ्या गावंढळ भक्तांपर्यंत सर्वांना त्यांच्या संगीतातलं सौंदर्य सहज जाणवतं. अशा सुब्बुलक्ष्मी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांना १९५४ मध्ये पद्मभूषण, संगीत कालानिधि, १९७४ मध्ये रैमन मैग्सेसे अवॉर्ड, १९७५ मध्ये पद्मविभूषण, १९८८ मध्ये कालीदास सम्मान, १९९० मध्ये इंदिरा गाँधी पुरस्कार आणि १९९८ मध्ये भारतरत्नने सन्मानित करण्यात आलं. 

८८ वर्ष आयुष्य जगलेल्या सुब्बुलक्ष्मींनी अपार यश आणि धन मिळवलं. परंतु त्याचा संचय केला नाही.  पुष्कळ आधीपासूनच कार्यक्रमांमध्ये मिळालेला सगळा पैसा त्या मोठ्या उदारपणे निरनिराळ्या समाजसेवी संस्थांना दान करीत असत. त्यांच्या मृत्यूनंतर लक्षात आलं की त्यांच्याकडे जे जे काही देण्यासारखं होतं ते सगळं त्यांनी देऊन टाकलेलं होतं. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.