घराणेशाही असावी तर हरित क्रांती करणाऱ्या स्वामिनाथन यांच्यासारखी

घराणेशाहीची चर्चा आपण ऐकतो. आई वडिलांचा वारसा वापरून राजकारणात, सिनेमात, क्रिकेटमध्ये प्रतिभा नसतानाही बळजबरीने अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले नेपोकिड्स आपण पाहिलेले आहेत. घराणेशाही ही एक शिवी बनून गेली आहे.

पण भारतात अशी ही काही घराणी आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वावर जगात देशाची मान उंचावली आहे. या पैकीच एक म्हणजे 

एम.एस.स्वामिनाथन. 

मोनकोंबू सांबशिवन् स्वामिनाथन यांचा जन्म ७ ऑगस्ट १९२५ रोजी तमिळनाडू येथील कुंभकोणम येथे झाला. त्यांचे वडील एम.के. सांबशिवन हे त्याकाळी मोठे सर्जन होते. भारतातल्या इंग्रजी सत्तेचा तो काळ. गांधीजींच्या स्वातंत्र्यलढयाच लोन काश्मीर ते कन्याकुमारी देशभर पसरलं होत. मिठाचा सत्याग्रह, कायदेभंग आंदोलन यात आबाल वृद्ध स्त्री पुरुष उतरत होते.

कुभकोणममध्ये या आंदोलनाच नेतृत्व करत होते डॉ. एम.के. सांबशिवन. विदेशी कपड्यांची होळी करणे, सरकारी कार्यालयावर निदर्शने करणे यात ते आघाडीवर असायचे. या बद्दल ब्रिटीश सरकारची नाराजी असली तरी डॉक्टर कधी मागे हटले नाहीत.

तामिळनाडूमध्ये दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी योगदान दिलेलं. त्याकाळी पसरत चालेल्या हत्तीरोगाच्या निर्मुलनासाठी सांबशिवम यांचं कार्य आजही आठवल जातं. त्यांच्या गांधीवादी विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. वडिलांमृत्यूनंतर तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले.

१९४३ साली बंगालमध्ये आजवरचा सर्वात मोठा दुष्काळ पडला होता. अन्नपाण्याअभावी अनेकांचा मृत्यू आला.

 त्याच वेळी स्वामीनाथन यांना जाणवल की ज्या देशात आजारी पडण्या पेक्षा उपासमारीने लोक जास्त मरतात तिथे डॉक्टरची नाही तर कृषीशास्त्रज्ञाची गरज आहे.

स्वामिनाथन यांनी डॉक्टरकीचं शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळधील महाराजा कॉलेजातून त्यांनी बायोलॉजीतली पदवी घेतली. पुढे मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली.

१९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४ ९मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्‍त केली. UPSC ची अत्यंत अवघड समजली जाणारी परीक्षा त्यांनी पास केली होती पण  भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाल्यामुळे त्यांनी ती नाकारली.

IPS ऑफिसर होण्यापेक्षा कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले.

नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२मध्ये पी‍एच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. त्यांची नेमणूक कटकच्या केंद्रीय भात संशोधन केंद्रात वनस्पती शास्त्रज्ञपदी झाली.

स्वातंत्र्यानंतरचा हा काळ नवसर्जनशिलतेचा होता. अनेक नव नवीन प्रयोग केले जात होते.

१९६६ साली स्वामिनाथन भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक म्हणून रुजू झाले. तेव्हा त्यांनी शेतीच आपली प्रयोगशाळा मानली. शेतकऱ्यांबरोबर प्रत्यक्ष शेतात काम करताना त्यांना शेतकऱ्यांच्या पारंपरिक कृषि पध्दतीच्या मर्यादा लक्षात आल्या. त्यामुळे त्यांनी संस्थेमध्ये गव्हाच्या सुधारीत वाणाच्या निर्मितीचे प्रयोग हाती घेतले.

गव्हाचं उत्पादन वाढवणं ही त्या वेळी जगभरातील सर्व राष्ट्रांची समस्या होती.

प्रसिध्द कृषिशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते नॉर्मन, बोर्लॉग यांनी भरघोस उत्पन्न देणारी गव्हाची खुजी जात विकसीत केली होती. त्यामुळे मेक्सिकोत दर एकरी उत्पादन चौपटीने वाढले होते. १९४५ पर्यंत गहू आयात करणारा देश १९६० नंतर गव्हाची निर्यात करू लागला होता.

हाच प्रयोग स्वामिनाथन यांनी भारतात केला. त्यांनी गव्हाच्या मेक्सिकन जातीच्या साहाय्याने नवीन गव्हाच्या संकरीत जाती शोधून काढल्या. जपानी आणि देशी वाणांशी संकर करून सोनेरी वर्णाचा दाणा असलेल्या कसदार गव्हाचा नवा वाण तयार केला आणि त्या वाणाचा देशभर प्रसार करण्यास उत्तेजन देऊन पाठपुरावा केला.

त्यामुळे देशातील गव्हाचे उत्पादन अनेक पटींनी वाढले आणि देशात हरितक्रांतीला सुरुवात झाली.  

फक्त गहूच नाही तर तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, कापूस, शेंगदाणा, बटाटा या प्रमुख पिकांचेही उत्पन्न वाढू लागले. ऊस, द्राक्षे, सफरचंद, केळी, आंबा, पपई, पेरु, चिकू अशा फळांच्या उत्पन्नात वाढ झाली. अशा रीतीने तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतात काही उत्पादन वाढले. यामध्ये डॉ. स्वामिनाथन यांचे योगदान मोलाचे ठरते.

डॉ. स्वामिनाथन यांना इंदिरा गांधी यांनी अनेक राष्ट्रीय समित्यांवर सल्लागार म्हणून नेमले. राष्ट्रीय शेती आयोगाचे ते सदस्य होते. दारिद्य्र निर्मुलन प्रकल्पासाठीच्या तज्ञ समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक समित्यांमध्येही निवड झाली तसेच वैज्ञानिक क्षेत्रातील संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

राज्यसभेचे ते सदस्यही होते. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण,पद्मविभूषण अशा सर्वोच्च पदवी देऊन सन्मान केला.

एम.एस.स्वामिनाथन यांना तीन मुली. डॉ.मधुरा स्वामिनाथन या इंडियन स्टॅटेस्टिकल इन्स्टिटय़ूटमध्ये प्रोफेसर आहेत तर दुसरी कन्या नित्या स्वामिनाथन या इंग्लंडमधील एका प्रथितयश विद्यापीठात लिंग विश्लेषण आणि विकास हा विषय शिकवणाऱ्या प्राध्यापिका आहेत. या दोघीही आपआपल्या क्षेत्रात मोठ्या स्थानावर पोहचल्या आहेत.

पण स्वामिनाथन यांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे चालवला आहे तो त्यांच्या तिसऱ्या मुलीने. सौम्या स्वामिनाथन

सौम्या लहानपणापासून अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थिनी होत्या. त्यांनी पुण्याच्या आर्म्डफोर्स मिलिटरी कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी उच्च श्रेणीत संपादन केली. दिल्लीच्या एम्समधून  पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांना अमेरिकेत लॉज एन्जेलिस येथे एका नामांकित रुग्णालयाची Neonatology and Pediatric Pulmonology या विषयाची फेलोशिप मिळाली.

पुढे रिसर्च ऑफिसर म्हणून ब्रिटन, कॅलिफोर्नियामध्ये काही वर्ष नोकरी केल्यानंतर त्या भारतात परतल्या.

भारतात आल्यावर क्षयरोग आणि एचआयव्हीवर संशोधन करणाऱ्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर ट्यूबरक्युलोसीस या संस्थेमध्ये त्या डायरेक्टर म्हणून रुजू झाल्या. तिथे त्यांनी संशोधनच केले असं नाही तर तेथील तरुण संशोधकांना सोबत घेऊन ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला. क्षयरोग व एचआयव्हीबाधितांशी संवाद साधून हे रोग पसरण्याच्या कारणांचा शोध घेतला. मग त्या अनुषंगाने उपाययोजना केल्या.

डॉ. सौम्या स्वामिनाथन यांच्या पुढाकारानेच भारतात अनेक शहरांतून क्षयरोगाचे उच्चाटन करण्याची मोहीम राबवण्यात आली व ती यशस्वीही ठरली. पुढे त्यांची युनिसेफ,वर्ल्ड बँक, जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने उष्णकटिबंधीय रोगाचा अभ्यास व ट्रेनिंग देण्यासाठी निवड झाली. भारत सरकारच्या आरोग्य व संशोधन विभागाच्या सेक्रेटरी म्हणून देखील त्यांनी काम केलं.

संशोधनातील त्यांचा आवाका, त्यांचा अनुभव बघून जागतिक आरोग्य संघटना उर्फ WHO ने २०१७ साली त्यांची  उपमहासंचालक तर २०१९ साली प्रमुख शास्त्रज्ञ या अत्यंत जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली.

सध्या जगभरात चालू असलेला कोरोनाच्या कोव्हीड -१९ या रोगा विरुद्धचा लढा त्यांच्याच नेतृत्वाखाली लढला जात आहे. प्रसिद्धीच्या झोताबाहेर राहून काम करणाऱ्या सौम्या स्वामिनाथन यांनी जनसेवेचा, रुग्णसेवेचा व देशसेवेचा तीन पिढ्यांचा वारसा पुढे नेला आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

 

2 Comments
  1. Vighnesh says

    1943 Chya dushakala baddal kahi mahiti milu shakate ka

  2. Eknath dinkar more says

    Great information of all farmer necessary solutions dr m.s.swamithan commission be excepted

Leave A Reply

Your email address will not be published.