एसटीच्या संपांचा इतिहास १९७२ सालापासून सुरु होतो.
मागच्या पंधरा-वीस दिवसांपासून एसटीचे कर्मचारी संपावर गेले होते. त्यात शेवटी तडजोड झालीच नाही. पण एकूणच संपाची पार्श्वभूमी पाहता सरकार आपल्या हेक्यावर ठाम होतं तर कर्मचारीही आपल्या मागण्यांच्या पूर्ततेवर अढळ होते. एकतर ‘शेंडी तुटो की पारंबी’ अशा दृढ निश्चयाने ते निर्वाणीच्या युद्धात उतरले होते. तळहातावर शीर घेऊन रणात उतरलेले हे उपाशी जीव मरणाच्या तयारीनेच पुढे सरसावल्याचा प्रत्यय आला.
पण आज जे एसटी कर्मचाऱ्यांच आंदोलन सुरू आहे ते संबंध महाराष्ट्रभर जरी पोहोचलं असलं तरी त्याआधी सुद्धा बरीच आंदोलन झाली आहेत. म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.
त्याच आंदोलनाच्या इतिहासाविषयी…
सार्वजनिक प्रवासी वाहनाची सुरुवात महाराष्ट्रात १९३२ पासून म्हणजे ब्रिटिश काळात झाली. ही खाजगी वाहतूकच होती. पुढं काही वर्षांनी या वाहतुकीचे नियम व कायदे करण्यात आले. १९४७ मध्ये ब्रिटिश राजवट संपली. भारतात भाषावार प्रांतरचना अस्तित्वात आली.
१९४८ मध्ये मुंबई स्टेट रोड कॉर्पोरेशन नावाची सरकारी कंपनी प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन करण्यात आली. प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा एकाधिकार या कंपनीला देण्यात आला. तद्नंतर संयुक्त महाराष्ट्र उदयास आला. त्यामुळे या आधीच्या वाहतूक कंपन्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एमएसआरटीसी कंपनीत विलीन करण्यात आल्या. सुरुवातीच्या काळात महामंडळाची कामगिरी नेत्रदीपक होती.
त्यामुळं सर्वच कर्मचाऱ्यांना चांगला आणि वेळेवर पगार मिळायचा. एसटीसुद्धा नफ्यात होती. परिणामी गावगाड्यातील शेतकऱ्यांची, गोरगरिबांची मुलं एसटीकडे आकर्षित व्हायची. अधिकाऱ्यांपासून ड्रायव्हर, कंडक्टरपर्यंतच्या नोकऱ्यांसाठी ते धडपड करायचे. उच्च शिक्षण घेतलेली मुलंही महामंडळात सेवा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असायची.
इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या व त्यांचे नियंत्रणही समाधानकारक होते. पण पुढे पुढे एसटीच्या समृद्धीसोबतच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर त्यांचा दबाव वाढू लागला. त्याची जागा पुढे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवर अन्यायाने घेतली. त्यांचा कोणी वाली नसल्याचे अनुभव येऊ लागले. त्याविरुद्ध तो ओरडू लागला. मुकी बिचारी कुणीही हाका अशी त्यांची अवस्था झाली. आणि मग संपाना सुरुवात झाली.
एसटीचा कर्मचाऱ्यांचा पहिला संप हा १९७२ मध्ये झाला होता. हा संप सलग १२ दिवस सुरू होता. त्यावेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती.
त्यानंतर १९९६, २००७ सालीही संप झाले होते.
पण मागच्या ५ वर्षांमध्ये दरवर्षी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप केला आहे. तरीही त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.
या पाच वर्षातला पहिला संप १७ डिसेंबर २०१५ ला झाला.
वार्षिक वेतनवाढ आणि महागाई भत्त्यात वाढ करावी या मागणीसाठी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी १७ डिसेंबर २०१५ रोजी बेमुदत संप केला होता. हा संप २ दिवसांचा होता. त्यावेळी महामंडळाचे २ दिवसांचे २० कोटी रुपये नुकसान झाले होते. महामंडळाच्या सर्व कामगार संघटनांनी या संपात सहभाग घेतला होता. पण तोडगा काही निघालाच नाही.
पुढं १६ ऑक्टोबर २०१७ ला संप झाला. मागच्या पाच वर्षातला हा दुसरा संप होता.
महामंडळाच्या कामगार कृती समितीने १६ ऑक्टोबर २०१७ रोजी मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरु केला होता. यावेळीही वेतनवाढीच्या मागणीसाठी हा संप करण्यात आला होता. ऐन दिवाळीत हा बेमुदत संप केला होता. हा संप तब्बल ५ दिवस चालला. त्यामुळे महामंडळाला या संपामुळे १०० कोटींहून अधिक आर्थिक नुकसान झालं होतं. त्यावेळी तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र लवकर यश आले नाही. त्यामुळे हा विषय मुंबई उच्च न्यायालयात पोहचला.
पुढं ८ जून २०१८ ला तिसरा संप झाला.
एसटी कर्मचाऱ्यांनी ८ जून २०१८ रोजी मध्यरात्रीपासून बेमुदत संप सुरु केला. हा संप दोन दिवस सुरू होता. राज्यभरातील २५० आगारांतून हा संप झाला. त्यामुळे ३३ कोटी रुपयांचे नुकसान महामंडळाला सहन करावं लागलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी, जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना २५ टक्के हंगामी वाढ देण्यात यावी, या मागण्यांसाठी हा संप करण्यात आला होता.
चौथा संप २८ मे २०१९ रोजीचा. हा संप ३ दिवस संप सुरु होता. त्यामुळे ४५ कोटी रुपयांचे महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले. वेतनवाढ आणि महागाई भत्ता या मागणीसाठीच हा संप करण्यात आला होता.
त्यानंतर एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे ही प्रमुख मागणी घेऊन २६ ऑक्टोबर २०२१ पासून ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनाला राज्यातील विविध भागातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि एसटीचा संप सुरू झाला.
आज जवळपास महिना होत आला तरी हा संप सुरूच आहे.