जीभेवरची चव आणि ओठांवरची चर्चा… मुच्छड पानवाला दोन्हीकडे रेंगाळत राहतो

रात्रीच्या वेळी ब्रीच कँडी हॉस्पिचलजवळच्या केम्प्स कॉर्नर या भागात मोठ-मोठाल्या आलिशान गाड्या झगमगते चेहरे आणि गर्दी दिसतेच दिसते. ही गर्दी असते ती रस्त्याच्या शेजारी एका लहानशा पानाच्या दुकानात आपण दिलेली ऑर्डर आपल्याला कधी मिळतेय याची वाट पाहणाऱ्या श्रीमंतांची. या गर्दीत मुंबईतले मोठ-मोठे बिझनेमन्स, बॉलीवूड सेलिब्रेटीज आणि नाही म्हटलं तरी राजकीय मंडळीही असतात.

ही गर्दी कशासाठी असते? तर, पान खाण्यासाठी… साधंसुधं पान नाही तर, मुंबईतलं सगळ्यात फेमस ‘मुच्छड पान’.

मार्केटिंगचा एक अलिखीत नियम असल्याचं बोललं जातं… तो म्हणजे, ‘There is nothing called Good Publicity or Bad Publicity. Publicity is just Publicity’. अगदी तसंच या मुच्छड पानवाल्याचं झालंय. तो प्रसिद्ध आहे खरा पण चांगल्या वाईट दोन्ही कारणांमुळे. म्हणजे त्याच्याकडे मिळणारं पान हे अफलातून असतं असं ग्राहकांचं म्हणणं आहेच. याशिवाय हे दुकान आणि दुकानाचे चालक कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये सुद्धा राहिलेत.

या दुकानाच्या इतिहासापासून सुरूवात करूया.

मुंबईतल्या बाकीच्या पानवाल्यांसारखाच या मुच्छड पानवाल्याचाही इतिहास आहे. म्हणजे हा व्यवसाय त्या तिवारी परिवारात सुरू केला तो अलाहबाद वरून मुंबईत आलेल्या श्यामचरण तिवारी यांनी. ते मुंबईत आलेले ते पोटाची खळगी भरण्यासाठी. मुंबईत आल्यावर त्यांनी सुरूवातीला भाजी, फळं विकायचा व्यवसाय केला खरा पण तो काही फार चालला नाही.

मग त्यांनी आणखी काही लहान-सहान कामं केली पण फार काही मिळकत मिळाली नाही. मग त्यांनी पानाचं दुकान टाकलं. १९७० च्या काात मग त्यांचा मुलगा जयशंकर तिवारी याने या दुकानाची सूत्र हाताता घेतली. असं म्हणतात की, तोवर या दुकानाला नावच नव्हतं. जयशंकर यांनी आपल्या वडिलांच्या मोठ मोठाल्या पिळदार मिशा डोळ्यांसमोर ठेऊन या दुकानाला मुच्छड पानवाला असं नाव दिलं.
त्यानंतर या परिवारातले सगळे पुरूष अशा मिशा ठेवायला लागले.

मुच्छड पानवाला दुकानापासून ब्रँड बनला त्यामागे डिजीटलायझेशनचा मोठा हात आहे. तो कसा? तर, १९९० च्या दशकात मुच्छड पानवालाने स्वत:ची वेबसाईट लाँच केली होती. कदाचित एखाद्या पान विक्रेत्या व्यवसायाची ही पहिलीच वेबसाईट असावी. सध्या ‘muchhadpaan.com’ ही वेबसाईट चालू नसली तरी या वेबसाईटचं मुच्छड पानवालाच्या यशात मोठा वाटा आहे.
या वेबसाईटवरून फक्त पान ऑनलाईन ऑर्डर करण्याची किंवा मोबाईल नंबर मिळवण्याची सुविधाच नव्हती तर, याशिवाय पान काय असतं? ते कशाप्रकारे बनवलं जातं ? अशा प्रकराची बेसिक माहितीसुद्धा दिलेली होती. ज्यामुळे त्यावेळी या वेबसाईटनेही बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळवलेली.

दुकानाचं असलेलं वेगळं नाव, दुकानावर बसलेल्यांच्या भल्या मोठ्या आणि पिळदार मिशा आणि जगात भारी चव या गोष्टींच्या जीवावर हे दुकान मार्केट खात राहिलं.

या झाल्या मुच्छड पानवाल्याच्या चांगल्या गोष्टी, पण मुच्छड पानवाला हे नाव बऱ्याचदा वाईट कारणांमुळंही लोकांच्या ओठांवर राहिलंय.

सगळ्यात पहिल्यांदा मुच्छड पानवाल्याच्या ग्राहकांमध्ये तो जरा निगेटीव्ह चर्चेत आला. परफेक्ट साल सांगता येणार नाही, पण तेव्हा झालेलं असं की भाऊबंदकीमुळं मुच्छड पानवालाचे दोन भाग झाले. आजही तुम्ही मुच्छड पानवाल्याकडे गेलात तर, तुम्हाला त्याच्या बरोबर समोरच्या बाजूला तिवारी पानवाला दिसेल. हा तिवारी पानवाला मुच्छड पानवालाच्याच घरातला आणि भाऊबंदकी झाल्यावर त्याने स्वत:चं दुकान सुरू केलं.

२०११ मध्ये हाणामारी झालेली.
२०११ मध्ये तिवारी कुटुंबातील दोन गटात रस्त्यावर भांडण झालेलं. हे भांडण इतक्या टोकाला गेलं की, एकमेकांवर लोखंडी रॉड आणि काठ्यांनी हल्ला केला होता. पोलिसांनी दोन्ही गटातल्या लोकांना ताब्यात घेतलं होतं.

तिथल्या स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार,

“त्यांच्यातली भांडणं अजूनही मिटलेली नाहीयेत. सतत कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून या परिवारातल्या दोन गटांमध्ये भांडणं होतंच राहतात. बऱ्याचदा ही भांडणं  बऱ्याचदा पोलीस चौकीपर्यंत जात नाहीत, पण भांडणं होत असतात. बऱ्याचदा या दोन्ही गटांकडून एकमेकांच्या दुकानाविरोधात ग्राहक चोरल्याची किंवा रात्री विनापरवाना दुकान सुरू ठेवल्याची तक्रार पोलिसांत दिली जाते.”

२०२१ मध्ये गांजा जप्त केला होता.
२०२१ मध्ये एनसीबीने नवाब मलिकांचे जावई समीर खान यांना गांजाच्या संबंधीत प्रकरणात अटक केलेली. साधारण त्याच काळात एनसीबीने या मुच्छड पानवालाच्या गोडाऊनवर रेड टाकलेली. तिथे त्यांना जवळपास ५०० ग्रॅम गांजा, भांग असे मिश्र पदार्थ सापडलेले. त्यावेळी अटक झाल्यानंतर अगदी कमी प्रमाणात हे पदार्थ आढळलेले असल्यामुळे रामकुमार तिवारी यांना बेलवर सोडण्यात आलं.
हे मुच्छड पानवाल्याचं प्रकरण आणि मलिकांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाशी निगडीत असल्याच्या चर्चाही त्यावेळी रंगलेल्या. काही काळानंतर मात्र हे प्रकरण लोक विसरून गेले.

१५ फेब्रुवारी २०२३ ला ई-सिगरेटच्या प्रकरणात अटक.
साधारण आठवड्याभरापुर्वी मुच्छड पानवालाच्या दुकानात भारतात बॅन असलेल्या जवळपास दीड लाख किंमतीच्या ई-सिगरेट्स सापडलेल्या. त्यानंतर परवा म्हणजे, १५ तारखेला त्यांच्या गोडाऊनमध्ये पून्हा सव्वा लाख किंमतीच्या ई-सिगरेट्स सापडल्यात.

या सगळ्या गोष्टींशिवाय या मुच्छड पानवाल्याकडं खूप पैसा आहे, तो मुंबईतल्या पॉश एरियामध्ये एका आलिशान घरात राहतो, तो दुकानावर येताना मर्सिडीजमध्ये बसून येतो, त्याच्याकडे रोल्स रॉयस गाडी आहे वगैरे अशा चर्चा तर सुरूच असतात.

आता हे सगळं मुच्छड पानवाला चर्चेत राहण्यासाठी करतो असं नाहीये, पण वर म्हटलं तसं ‘There is nothing called Good Publicity or Bad Publicity. Publicity is just Publicity’. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे चविष्ट पान विकण्यासाठी प्रसिद्ध असलेला मुच्छड पानवाला जीभेवरची चव आणि ओठांवरची चर्चा दोन्हीकडे रेंगाळत राहतो.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.