मराठा संस्थांनचा वारसा असणारे ‘मुधोळ हाऊंड’ भारतीय लष्करात पराक्रम गाजवत आहेत.

कुत्रे पाळणे एकेकाळची गरज होती, मळ्यात, शेतात किंवा घराची राखण करण्यासाठी कुत्रे पाळले जायचे. पण आता ती हौस झाली आहे.

पूर्वी ही हौस फक्त राजे महाराजांना परवडायची. शिकारी साठी किंवा अनेकदा फक्त छंद म्हणून परदेशातुन महागडी कुत्री मागवली जायची. त्यांचा थाटच और असायचा. या श्वानाच्या दिमतीला खास सेवक असायचे.

असच एक संस्थान म्हणजे उत्तर कर्नाटकातील मुधोळ.

हे संस्थान आज जरी कर्नाटकात येत असले तरी येथे मराठ्यांचे राज्य आहे. चौदाव्या शतकापासून ही घोरपडे घराण्याची जहागीर आहे.

१८१८ साली या घराण्यातील गोविंदराव घोरपडे आष्टीच्या युद्धात मारले गेले आणि इंग्रजांनी त्यांच्या धाकट्या भावाला गादीवर बसवून संस्थान मांडलिक बनवून घेतले.

याच पराक्रमी घराण्याचे वारसदार होते मालोजीराव घोरपडे.

१८८४ साली त्यांचा जन्म झाला तर १९०० साली ते मुधोळ संस्थानच्या राजेपदी आले.

त्यांच्याच काळात मुधोळ संस्थानात आरोग्य, शिक्षण, नगरपालिका, पक्क्या सडका, डाक-तार इ. क्षेत्रांत सुधारणा झाल्या. संस्थानचे चार पलटणींचे सैन्य असून पहिल्या महायुद्धावेळी त्यांनी इजिप्तमध्ये ब्रिटिश सैन्याकडून लढाईमध्ये जातीने सहभाग घेतला होता.

मालोजीराजे यांना सुद्धा कुत्र्यांचा शौक होता. एकदा इराणच्या राजाकडून मालोजीराजांना हाऊंड जातीची कुत्री भेट देण्यात आली.

मुधोळचे राजे घोरपडे सरकार यांनी आपल्याकडील कारवानी शिकारी कुत्रा आणि या जातीचा संकर केला.

पुढे जेव्हा इंग्लंडचे पाचवे किंग जॉर्ज भारतात राज्यरोहनाच्यासाठी आले तेव्हा त्यांच्या दिल्ली दरबारात मुधोळचे राजे घोरपडे यांनी या जातीची चार श्‍वान भेट दिले. त्यांना पाहून जॉर्ज यांच्या तोंडून सहज उद्‌गार बाहेर पडले.

“हाऊ ब्युटीफुल हाऊंडस ऑफ मुधोळ”

तेव्हापासूनच या श्वानानां “मुधोळ हाऊंड’ हे नाव पडले.

याची वैशिष्ट्ये म्हणजे हे कुत्रे उंच व काटक असते. लांबून दिसायला हरणासारखे दिसते. लांब कान, निमुळता चेहरा, जमिनीला स्पर्श करणारी शेपूट.

ही जात प्रचंड वेगवान पण तितकीच रागीट समजली जाते. कोणीही स्पर्श केलेले त्यांना खपत नाही पण जर काळजीपूर्वक सांभाळ केला तर हे श्वान आपल्या मालकाच्या प्रती प्रामाणिक  राहते आणि जीवापाड प्रेम करते.

इंग्लिश ग्रे हाउंड ला तोडीस तोड म्हणून मुधोळ हाऊंड फेमस झाला.

जागतिक स्तरावर जातिवंत कुत्र्यांमध्ये भारतीय मुधोळ हाऊंडचा समावेश केला जातो. फक्त दर्दी लोकांकडे हे श्वान आढळते.

गेल्या काही वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात पहिल्यांदाच एका देशी श्वानाचा म्हणजे मुधोळ हाऊंडचा समावेश करण्यात आला.

स्फोटके हुंगण्याची त्यांची क्षमता इतर कुत्र्यांपेक्षा किती तरी पटीने जास्त आहे हे अभ्यासाअंती सिद्ध झाले. शिवाय कोणत्याही वातावरणात सहज जुळवून घेण्याची क्षमता या श्वानात आहे. सहजासहजी ते आजारी पडत नाही.

डिसेंबर 2017 पासून या श्वानांना प्रशिक्षण देऊन लष्करात सामील करण्यात आलं.

मराठा पराक्रमाचा वारसा मुधोळ हाऊंडच्या रूपाने भारतीय लष्करात जपला जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी एनएसजी कमांडोनी सुद्धा या श्वानांची दलात समावेश करण्याची मागणी केली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.