१० हजारांच्या उधारीतून सुरु झालेला ‘मुफ्ती’ शेकडो कोटींचा ब्रँड कसा बनला माहितेय ?

पोटाच्या भुकेची खळगी भरण्यासाठी कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो. कष्टात संघर्ष खूप असतो; पण फळ मात्र प्रामाणिक असतं. कष्टाला आलेलं फळ म्हणजेच कामाप्रती मिळालेलं यश. अश्यात यश मिळालं तर ते अभिमानाने मिरवता आलं पाहिजे आणि अपयश आलं तर स्वाभिमान दुखल्याचं सोंग न आणता ते पचवताही आलं पाहिजे. या मार्गात जो असंख्य अडचणींवर मागे न हटता मात करतो, तोच यशस्वी होतो.

भारतीय कापडांच्या बाजारपेठेत सगळ्यात जास्त लोकप्रिय झालेल्या ‘ मुफ्ती ’ या ब्रँडची स्थापना करून आज व्यवसायिकदृष्ट्या यशाच्या शिखरावर असणाऱ्या ‘ कमल खुशलानी ’ यांच्या संघर्षाची कथा ही खूप प्रेरणादायी आहे.

नातेवाईकांकडून फक्त १० हजार रुपये उसने घेऊन कपड्यांचा व्यापार सुरु करून, आज १० हजारांचे वर्षाला ३९५ करोड करून दाखवणं हे सोपं काम नाही. पण ‘ कमल खुशलानी ’ यांनी ते करून दाखवलं.

काळ होता १९९२ नंतरचा. भारतीय कपड्यांच्या फॅशनचा एक नवा ट्रेंड उदयास आला होता. कपड्यांच्या बाबत लोकं स्टाईलचा विचार करू लागले होते. त्याचं काळात ‘ कमल खुशलानी ’ यांनी राहणीमानाच्या बाबत लोकांमध्ये होणारा बदल ओळखला.

मेन्सवियर बाबत लोकांचा वाढता कल हेरून त्यांनी कपड्यांच्या व्यवसायात उडी घेतली.

कमल खुशलानी यांना फॅशन रिटेल मध्ये व्यवसाय करण्याची कमालीची उत्सुकता होती. परंतु परिस्थिती मध्यमवर्गीय असल्याने जीवनात संघर्ष कुटून कुटून भरला होता. १९ व्या वर्षी वडिलांना गमावल्यामुळे त्यांचा खूप मोठा आधार नाहीसा झाला. कारण वडिलांकडून तरी ते बापाच्या नात्याने हक्काने पैसे घेऊन व्यवसाय सुरु करू शकत होते. गरिबी कितीही असली तरी पोराच्या आयुष्यासाठी बापाने कुठूनही कामाचा घाम गाळून पैसे उभे केले असते.

या हुरहूरीचे चटके किती बसतात, हे कमल खुशलानी यांच्या चांगलचं अनुभवास आलं होतं.

व्यवसाय तर दूर ची गोष्ट; पण घरातल्या उपजिविकेच्या साध्या गरजा भागवणं सुद्धा अवघड होऊन बसलं होतं. त्यामुळे त्यांना बाप जगातून सोडून गेल्यानंतरच्या काळात व्हिडीओ कॅसेटच्या कंपनीत काम करावं लागलं, ज्यातुन ते घर चालवायचे.

पण जिवंतपणी स्वप्न पाहून निश्चित करणाऱ्याच्या स्वप्नाला कधीच मरण नसतं. वेळोवेळी ते स्वप्नं जागं करून उभारी घेण्याची ताकत देत असतं. व्हिडीओ क्यासेट कंपनीत काम करत असताना, ‘ कमल खुशलानी ’ यांच्या बाबतीतही अगदी तसचं घडलं.

पाहिलेलं स्वप्न पुर्ण करायची हीच ती वेळ आहे असं त्यांच्या लक्षात आलं. पण पैसे कसे उपलब्ध करायचे ?

जगात कश्याचंही सोंग आणता येतं; पण पैश्याचं नाही.

शेवटी स्वतःच्या मनाला सकारात्मकतेनं धाडस दाखवून, त्यांनी मावशीकडून १० हजार व्यवसायासाठी उसने घेतले. कपड्यांच्या व्यवसायाचं गणित सोडवताना त्यांच्या हे लक्षात आलं होतं की ‘ जीन्स मध्ये अनेक प्रकारच्या स्टाईल आहेत. ज्या बुटकट पासून ते बेलबॉटम पर्यंत आहेत.

त्यात प्रत्येक ब्रँड एकाच क्वालिटीच्या एक सामान पद्धतीच्या जीन्स बनवत आहे. परंतु मी जर या व्यवसायात उतरलो, तर अश्या प्रॉडक्ट्सला बाजारात घेऊन येईल, जो भारताच्या पुरुषांसाठी प्रोग्रेसिव्ह फॅशन प्रॉडक्ट्स असेल. इतरांच्या तुलनेत त्या जीन्स आधुनिकतेनं भरलेल्या असतील.

या ठाम विचाराने ‘ कमल खुशलानी ’ यांनी ‘ Mr & Mr ’ या नावाची पुरुषांसाठी शर्टची कंपनी सुरु केली.

व्यवसाय व्यवस्थितपणे चालला होता; पण आपण व्यापारी कौशल्याचा शर्ट कंपनीच्या व्यवसायात सर्वोत्तम वापर नाहीत, असं निदर्शनास आलं. कमल खुशलानी हे स्वतःच अनुभवाने फॅशन डिझाईन शिकले आणि भविष्याच्या व्यापारिकदृष्टीने योग्य निर्णय घेऊन १९९८ साली ‘ मुफ्ती ’ या नव्या आधुनिक प्रोग्रेसिव्ह जीन्सचा ब्रँड बाजारात आणला.

मुफ्ती हा हिंदी भाषेतील शब्द आहे. ज्याचा अर्थ ‘ कॅज्यूअल ड्रेसिंग ’ असा होतो, जो इतर ठराविक अश्या वर्दीच्या विरुद्ध आहे.

मुफ्ती ची निर्मिती कमल यांनी शून्यातून केली होती. कोणत्याही प्रकराचं ऑफिस त्यांच्याकडे नव्हतं. तेच त्यांच्या व्यवसायाचे कर्मचारी आणि मालक होते. त्यांच्याकडे असलेल्या एका बाईक वर ते ६० पेक्षा जास्त शर्ट ची बॅग घेऊन इकडून तिकडं व्यवसाय करायचे.

दरम्यानच्या काळात त्यांनी खूप संघर्ष आणि हालअपेष्टांना तोंड दिलं. असं म्हणतात की ‘ संघर्षाच्या काळानंतर येतो तो यशाचा सुवर्णकाळ.

त्याचं प्रमाणे २००२ साली ‘ मुफ्ती ’ च्या व्यवसायात प्रचंड सुधारणा झाली. हळूहळू मुफ्ती साऱ्या भारतभर पोहचू लागला. त्याने निर्मिती केलेल्या ‘ शर्ट आणि जीन्स ’ तरुण मुलांच्या तर खूप पसंतीस पडू लागल्या. देशात अनेक मोठमोठ्या दुकानात ‘ मुफ्ती ’ ची निर्मिती असलेली प्रोडक्शन विक्रीसाठी जाऊ लागली. कमल खुशलानी म्हणतात की

‘ आपली आवड कधीच ग्राहकांवर लादायची नसते. तर त्यांना त्यांच्या आवडीनुसार द्यायचं. जे की त्यांना खूप आवडतं..’

इतकी भविष्याची दूरदृष्टी त्यांनी कमावली होती.

मुफ्ती ने अरविंद मिल्स, केजी डेनियम, एनएसएल आणि मफतलाल यांच्यासह अनेक गिरण्यांकडून फॅब्रीकसह कच्चा माल म्हणजेच बटण आणि इतर गरजेच्या वस्तूंची निर्मिती करून घेत आहे. लुधियाना, बँगलोर, तिरुपूर, या ठिकाणी मुफ्ती च्या कंपनी आहेत. जिथं ब्रँडची निर्मित केली जाते.

कंपनीत आज ३००० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत.

जीन्स, ट्राउजर्स, जॅकेट, आणि टी शर्ट यांसारखे ५०० पेक्षा जास्त अनेक ब्रँड आज ‘ मुफ्ती ’ प्रत्येक हंगामात बाजारात आणत आहे. आज मुफ्ती ला या व्यवसायाच्या क्षेत्रात २० वर्षं होत आहेत.

‘ आम्ही ग्राहकांच्या पसंतीस खरं उतरतोयत. कारण आम्ही त्यांना सदा फिट आणि हिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. इथून पुढेही ग्राहकांचं आमच्याप्रती असणाऱ्या प्रेमाला कुठेही खंड पडुन देणार नाही,

असं मुफ्तीचे मालक कमल खुशलानी यांचं मत आहे. प्रत्येक व्यवसायात चढ उतार, संघर्ष हा पाचवीलाच पुजलेला असतो. पण जे पाचवीला पुजलेल्या संघर्षावर मात करतात, ते या क्षेत्रात ठामपणे टिकतात.

मुफ्ती आज लोकप्रियतेच्या शिखरावर विश्वासू ब्रँड म्हणून स्थित आहे.

मुफ्ती स्थापनेनंतर डेनिम कॅज्यूअल ब्रँड च्या रुपात आज साऱ्या भारतभर १५०० पेक्षा जास्त लहान मोठया दुकानात उपलब्ध आहे. मुफ्तीची स्वतःची एक वेबसाईट आहे. स्वतःची वेबसाइट असण्याशिवाय, सर्व प्रमुख ईकॉमर्स पोर्टलवर देखील हा ब्रँड उपलब्ध आहे.

एवढंचं नाहीतर २०१७ मध्ये मुफ्तीने फुटवेयर बाजरात सुद्धा प्रवेश केला आहे. भारतात १०० पेक्षा जास्त दुकानात पुरुषांसाठी स्टाईलिश बूट विक्रीस आणले आहेत. २०१८ – १९ मध्ये मुफ्तीची ३९५ करोड पेक्षा जास्त व्यवसाय कमाई झालेली होती.

भारतात सर्वदूर पोहचलेल्या ‘ मुफ्ती ’ ची आता विदेशात पोहचायची तयारी सुरु झालेली आहे.

  • कृष्णा वाळके

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.