एकाच गाण्यावर सुपरस्टार झालेली ती अचानक कुठे गायब झाली हा प्रश्न आजही पडतो.

दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे… जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे !

एक लाईन वाचली तरी डोक्यात हे गाण गुणगुण्यास सुरवात होते. माणसाचं वय काहीही असो पण हे गाणं माहित नसणारा माणूस दूर्मिळ. संसाराची स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकाने हे गाणं कधी ना कधी गुणगुणले असणारच. माझं घर माझा संसार या पिक्चरमधलं हे गाणं.

अजिंक्य देव आणि एक हिरोईन असणारं हे गाणं.

अजिंक्य देव तर आपणाला माहितीच असतो. पण ती हिरोईन कोण हे लक्षात येत नाही. तिचे अजून कोणते पिक्चर शोधावे म्हणलं तरी हातात फक्त शून्य राहतो. फक्त एका गाण्यातून आजही लक्षात राहणाऱ्या या हिरोईनचं नाव सहसा माहिती नसतं. माहिती असलच तर फक्त मुग्धा चिटणीस इतकच माहिती असतं.

मुग्धा चिटणीस अजिंक्य देव याच्यासोबत या गाण्यात झळकली होती.

वयाच्या २१ व्या वर्षी तिने हा सिनेमा केलेला. तिच्या आयुष्यातला एकमेव मराठी सिनेमा होता हा. मुग्धा चिटणीस ही अगदीच माहिती नव्हती अस कधीच नव्हतं. ती नावाजलेली कथा कथनकार होती. भारतासोबत अमेरिकेत तिने ५०० हून अधिक कार्यक्रम सादर केले होते. ऑल इंडिया रेडिओवरून तिचे कार्यक्रम प्रक्षेपित झाले होते. १८ फेब्रुवारी १९६५ साली जन्मलेल्या मुग्धा चिटणीसने वयाच्या २१ व्या वर्षी अजिंक्य देव सोबत माझा घर माझा संसार हा सिनेमा केला होता. त्या काळात देखील सुपरहीट असणार गाणं कायमस्वरूपी हिटच राहिलं. तिचे लग्न उमेश घोडके यांच्यासोबत झालं.

पण प्रश्न उरतो एकच सिनेमा करुन मुग्धा चिटणीस कुठे गायब झाली. 

मुग्धा चिटणीस  यांनी वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अकाली मृत्यू झाल्याने ती पुन्हा कधीच दिसली नाही. कॅन्सरसारख्या आजाराने तिचा अकाली मृत्यू झाला. ५ डिसेंबर १९९४ रोजी कॅन्सरचे निदान झाले आणि अवघ्या दोन वर्षातच म्हणजे १० एप्रिल १९९६ साली तिने जगाचा निरोप घेतला. तीने जगाचा निरोप घेतला तेव्हा तिला पाच वर्षांची एक मुलगी होती. मुग्धाच्या मृत्यूनंतर तिची पाच वर्षाची मुलगी ईशा आपल्या आज्जी आजोबांसोबत मुंबईत राहू लागली. पुढे ती वडिलांसोबत अमेरिकेत गेली.

न्यूयार्क युनिव्हर्सिटीतून तिने कायदाचं शिक्षण घेतलं. जगभरातील बुद्धीवंतासाठी महत्वाची समजली जाणाऱ्या फुलब्राईट स्कॉलरशीप तिने मेरिटवर मिळवली. तिला अमेरिकेच्या कायदे विभागात लॉ एन्ड सायन्स विभागात काम करण्याची संधी मिळाली. आज ईशा चिटणीस अमेरिकेत आपल्या कर्तत्वाने नाव साकारत आहे.

तिच्या यशस्वी होण्याच्या बातम्या जेव्हा माध्यमांमध्ये लागतात तेव्हा मात्र मुग्धा चिटणीस यांचा उल्लेख आवर्जून होत असतो. 

हे ही वाच भिडू.