फाळणीमुळे रखडलेला मुगल ए आझम पूर्ण व्हायला १४ वर्ष लागली

नंदिता दास यांचा ‘मंटो’ सिनेमा काही वर्षांपूर्वी प्रचंड गाजला होता. नवाझुद्दीन सिद्दीकी ची यात प्रमुख भूमिका. या सिनेमात एक प्रसंग आहे.. एका पार्टीत के. आसिफ मंटो यांना मुघल ए आझम विषयी विचारतात, “तुम्हाला माझ्या नवीन सिनेमाची स्क्रिप्ट कशी वाटली?”. मंटो गमतीने म्हणतात,

“एकदम बकवास!”

के. आसिफ हे मुघल ए आझम सिनेमाचे दिग्दर्शक. या प्रसंगाचा उल्लेख करायचं कारण.. १९४७ दरम्यान के. आसिफ यांची मुघल ए आझम सिनेमाची पटकथा तयार असुनही सिनेमा रिलीज व्हायला १९६० साल उजाडलं.

मुघल ए आझम प्रदर्शित व्हायला १४ वर्ष का लागली? त्याची ही कहाणी.

के. आसिफ यांनी मुघल ए आझम च्या आधी १९४५ साली फुल नावाचा सिनेमा बनवला होता. फुल त्या काळी फ्लॉप झाला होता. अपयश झुगारून के. आसिफ पुढच्या सिनेमाच्या तयारीला लागले. याची सुरुवात होते १९२८ पासून. अर्देशिर इराणी यांनी १९२८ साली ‘अनारकली’ हा मूकपट बनवला होता. हाच सिनेमा पुढे बोलपट म्हणून १९३५ साली प्रदर्शित झाला.

१९४० दरम्यान हा सिनेमा पाहून निर्माते शिराझ अली हकीम आणि के. असिफ प्रचंड प्रभावित झाले. मग पुढे या दोघांनी सिनेमाची जुळवाजुळव करायला सुरुवात केली.

सर्व काही सुरळीत सुरू होतं. परंतु देशाचं सामाजिक आणि राजकीय वातावरण मात्र कमालीचं अस्थिर होतं. या गोष्टीचा मोठा फटका के. आसिफ यांना बसला. सुरुवातीपासून असिफ च्या मागे निर्माते म्हणून भक्कमपणे पाठीशी उभे असलेले शिराज अली हकीम यांना हिंदुस्तान सोडून पाकिस्तानात जावं लागलं. शिराज साब मोहम्मद अली जिना यांचे समर्थक असल्याने त्यांच्यावर विविध आरोप लावले गेले.

त्यामुळे या आरोपांना कंटाळून शिराज यांनी पाकिस्तान मध्ये जाण्याचा निर्णय घेतला.

के. असिफ यांनी सुरुवातीला शेहेनशाह अकबर च्या भूमिकेसाठी चंद्र मोहन यांना कास्ट केलं होतं. परंतु १९४९ साली हृदय विकाराच्या झटक्याने चंद्र मोहन यांचं निधन झालं. तसेच अनारकली ची भूमिका मधुबाला आधी अभिनेत्री सुरैया ला ऑफर झाली होती.

कारण मधुबाला त्या काळात हृदयाच्या आजाराशी सामना करत होती. तिला सेटवर कधीही चक्कर यायची. तसेच दिलीप कुमार सलीम च्या भूमिकेसाठी योग्य नाहीत, असं के. असिफ यांचं मत होतं.

परंतु पुढे याच कलाकारांना घेऊन के. असिफ यांनी मुघल ए आझम बनवायचा निर्णय घेतला.

कलाकार निवड ठरली होती. परंतु निर्माते असल्याशिवाय इतका मोठा डोलारा पेलणं के. असिफ यांना शक्य नव्हतं. अशावेळेस त्याकाळचे मोठे व्यावसायिक शापुरजी पालनजी यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली. पालनजी यांच्याकडे सिनेनिर्मितीचा कोणताही अनुभव नव्हता.

तरीसुद्धा केवळ अकबर राजाचा इतिहास जाणून घेण्याची आवड असल्याने त्यांनी मुघल ए आझम सिनेमाची निर्मिती करायचं ठरवलं.

तरी सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल की १४ वर्ष का लागली?? तर.. ‘मुघल ए आझम’ सिनेमा चा ग्राफ खूप मोठा होता. त्यामुळे सिनेमाचा खर्च हा प्रमाणाबाहेर झाला होता. तरी सुद्धा शापुरजी पालनजी यांनी के. असिफ वर विश्वास ठेवला. जवळपास दीड कोटी रुपयांमध्ये मुघल ए आझम बनवला गेला.

सध्याच्या काळात सुद्धा इतके पैसे जास्त वाटतात, तर १९६० च्या दृष्टीने ही रक्कम फार मोठी होती. सिनेमा शूटिंग करून पूर्ण झाला. त्यानंतर पुढची अनेक वर्ष के. असिफ यांना सिनेमाच्या एडिटिंग मध्ये गेली. असं म्हणतात, की दहा लाख पेक्षा जास्त फुटेज शूट करण्यात आलं होतं. त्यामुळे योग्य ते एडिटिंग करणं आवश्यक होतं. सिनेमासाठी जी गाणी तयार करण्यात आली होती त्यांची लांबी १९७ मिनिटं इतकी झाली होती. त्यामुळे फायनल कट मध्ये अनेक गाणी वगळण्यात आली.

अखेर के. असिफ यांची १४ वर्षांची तपश्चर्या फळाला आली. आणि ५ ऑगस्ट १९६० रोजी मुघल ए आझम संपूर्ण भारतात प्रदर्शित झाला. पुढचा इतिहास आपण सर्व जाणतोच. काळ कितीही बदलला तरीही मुघल ए आझम हा भारतीय सिनेसृष्टीतील एक मानबिंदू म्हणून ओळखला जाईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.