मराठा सैन्याने मुघल सुभेदार बहादूरखानचा एप्रिल फुल केला.

अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदाजवळ एक गाव आहे पेडगाव. तिथ भीमा नदीच्या उत्तरतीरावर एक भुईकोट किल्ला आहे ज्याला धर्मवीरगड किंवा बहादूरगड असं ओळखतात. शिवाजी महाराजांचे पूर्वज बाबाजी भोसले हे एके काळी या किल्ल्याचे रक्षणकर्ते होते. पूर्वी पांडे पेडगावचा भुईकोट असे त्याचे नाव होते.

साल होत १६७४.

औरंगजेब बादशहाचा दुध भाऊ दख्खनचा सुभेदार बहादूर खान कोकलताश पेडगावला गडावर डेरा टाकून बसला होता. त्याच्या पराक्रमामुळे त्याला खान-ए-जहान ही पदवी दिली गेली होती. अख्या दक्षिण भारताचा आपण शहेनशहा आहे या गुर्मीत तो होता.

इकड रायगडावर नुकताच महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. बराच खर्च या समारंभावेळी कामी आला होता. स्वराज्याच्या हेरांनी बातमी आणली पेडगावला बहादूर खानान करोड रुपयाचा खजिना आणि दोनशे उत्कृष्ट दर्जाचे अरबी घोडे असा जमानिमा दिल्लीला बादशहाला नजर करण्यासाठी  गोळा केला आहे. पेडगाववर हल्ला करायचं ठरलं.

पावसाळ्याचे दिवस होते. भीमा दुथडी भरून वहात होती. बहादूरगडावर मुघलसैन्य सुस्तावलेल होत. रायगडावरून ९ हजारांच सैन्य निघालं होतं.

रात्रीच्या वेळी बहादूर खानाला वर्दी आली हजारोंच मराठा सैन्य बहादूर गडावर चालून येत आहे. खानाची भीतीने गाळण उडाली.” दरवाजा बंद करो” चे आदेश सुटले. किल्लेदाराने सगळ्या पहारेकर्यांना तयार राहायचा हुकुम दिला.

एवढ्यात दोन सांडणीस्वार हेर दमून भागून आले. त्यांनी बातमी आणली होती चालून आलेल्या सैन्यात फक्त दोन हजार मावळे होते. आता मात्र बहादूर खानाला चेव चढला. फक्त दोन हजार मराठा सैन्य असेल तर निवांत त्यांचा समाचार घेता येईल असा त्याचा होरा होता. त्याने मराठे गडावर येण्याच्या आधी त्यांच्यावरच पूर्ण ताकदीनिशी हल्ला करायचा निर्णय घेतला.

इशारतीचे नौबत वाजू लागले. पेडगावची अख्खी छावणी गोळा झाली. दार उघडले गेले. सर्वच्या सर्व मुघल सैन्य गडावरून बाहेर पडलं.

 “सिवाजी के चुव्वोको सबक सिखाओ”

बहादूर खान आपल्या सैनिकांच्या मध्ये जोश आणण्यासाठी ओरडत होता. पेडगावपासून काहीच अंतर गेल्यावर मराठे दिसले.  दिन दिन करत मुघलीया  सैनिक मराठी मावळ्यांवर चालून गेली. बहादूरखानाच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे मराठी सैन्यात खळबळ उडाली.

मुघलांशी लढण्याऐवजी मराठे माघार घेऊन पळू लागले.

खानाला आश्चर्य वाटलं. ज्यांच्या शौर्याच्या कथा ऐकल्या होत्या ते मराठा वीर पाठ दाखवून पळतायत याचा त्याला राग आला. चवताळलेले मुघल मराठी सैनिकांचा पाठलाग करू लागले. पण तेजतर्रार मावळे त्यांच्या हाती येत नव्हते.

बराच वेळ पाठलाग केल्यावर खानाच्या लक्षात आले की हि माणस आता काही आपल्या हाती लागत नाहीत. पेडगाव पासून बरेच दूर ते आले होते.

“लगता है डर कर भाग गये चुहे”

खानाने आपल्या सैन्याला परत फिरायचा आदेश दिला. शिवाजीच्या मावळ्यांना कस पळवून लावलं या आनंदात मुघल सेना बहादूरगडावर परत आली. आल्यावर बघतात तर काय?

गडावर हाहाकार उडाला होता. जवळपास सात हजारांची मराठा फौज येऊन पेडगावची छावणी लुटून गेली होती. अख्खी मुघल फौज जेव्हा मावळ्यांचा पाठलाग करत होती तेव्हा महाराजांनी राखीव ठेवलेली सेना छावणीवर चालून आली होती. तिथे असलेल्या मुठभर रखवालदाराना कधीच उडवण्यात आलं.

कोटरुपयाचा शाहीखजिना आणि दोनशे अरबी घोडे त्यांच्या हाती लागले होते. सर्वत्र आग लावून छावणीची स्मशान भूमी करण्यात आली.ज्या वेगात आले त्या वेगात मराठे पसार झाले.

खानाचा डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. ही मराठी भुते आली कधी आणि गेली तरी कधी?

गडावर एकही छदाम शिल्लक नव्हता. मराठी गनिमी काव्याचा धडा खान ए जहान बहादूरखानाला शिकायला मिळाला होता. फक्त या कामी एक करोड रुपये खर्च झाले होते. मुघल साम्राज्याचं नाक कापल्याबद्दल औरंगजेब बादशाहच्या शिव्या खाणे एवढेच खानासाठी उरलं होत.

तेव्हा पासून अतिशहाणपणा करणाऱ्याला पेडगावचा शहाणा असं म्हणण्यात येऊ लागले.

हे ही वाच भिडू.