काहीही असलं तरी मुघलांना टाळून भारताचा इतिहास लिहला जावू शकत नाही..

अभिनेता अक्षय कुमारच्या मागील ट्रोलिंग सत्र काही सामील असं दिसत नाहीये. गेल्या काही दिवसांपूर्वी विमल पानमसालाची जाहिरात केली म्हणून अक्षय कुमार ट्रोल झाला होता तर आता परत त्याच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनवरून तो ट्रोल झालाय.

अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट उद्या रिलीज होतोय. त्याच्याच प्रमोशनसाठीच अक्षय कुमार एका शोमध्ये गेला आणि तेव्हा त्याने पृथ्वीराज चौहान यांच्या इतिहासा बद्दल वक्तव्य केलं..

“शाळेत शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये भारताच्या सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत एकही धडा नाहीये. दोन किंवा तीन पुस्तकांमध्ये एखादा पॅरेग्राफ तुम्हाला दिसेल. इतिहासामध्ये मुघलांबाबतचा उल्लेख जास्त केला जातो. त्याच पुस्तकांमध्ये पृथ्वीराज यांच्याबाबत फक्त एक ते दोन परिच्छेद माहिती असते. पण मुघलांचं वर्णन हे शंभर परिच्छेदांमध्ये केलं जातं.”

अक्षयच्या या संवादाचा ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप ट्रेंड होत असून अक्षय कुमारला ट्रोल केलं जातंय. 

सातवीच्या इतिहासाच्या एनसीआरटी या पुस्तकामध्ये पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत दोन धडे आहेत. कॅनडा कुमार यांना प्रमोशनमधून वेळ मिळेल तेव्हा त्यांनी हे वाचायला पाहिजे”

“मुघल हे 156 AD मध्ये भारतात आले होते. तर पृथ्वीराज चौहान हे 1192 AD या युगातील होते”

“अक्षय कुमारने मार्शल आर्टच्या प्रशिक्षणाऐवजी शालेय वर्गात हजेरी लावली असती, तर फेज ऑफ हिस्ट्रीपासून ते हडप्पापर्यंतच्या इतिहासाच्या प्रत्येक टप्प्याबद्दल त्याला माहिती मिळाली असती. मध्ययुगीन ते आधुनिक भारतीय इतिहासापर्यंत सर्व काही त्याला माहीत झालं असतं”

असं बरंच काही काही म्हणत युसर्सने सध्या अक्षयला निशाण्यावर धरलंय. अगदी एनसीआरटी पुस्तकाचे फोटो शेअर केले जातायेत. 

आता मुघलांचा इतिहास किती, भारतीय राजांचा इतिहास किती या तुलनेचा पलीकडे जाऊन एका महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तो म्हणजे – भारताचा इतिहास मुघलांना टाळून लिहिताच येत नाही.

युद्ध, साम्राज्यावर कब्जा करणं, हे सोडून एक तथ्य हे आहे की, भारताच्या जडणघडणीत जितका वाटा भारतीय राज्यकर्त्यांचा होता तितकाच वाटा मुघल शासकांचा देखील आहे. त्यांनीही भारतात अनेक विकासाची कामं केली आहेत.

कसं ?

भारतात मुघलांचा कालखंड १६ व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत राहिला आहे. मुघल बादशाह बाबर ते बहादूर शहा जफ्फर असा त्यांच्या सत्तेचा इतिहास आहे. 

१) बाबर

बाबरने १५२६ मध्ये दिल्ली व आग्रा या प्रदेशांवर ताबा मिळविला आणि मुघल राजवंशाची भारतात स्थापना केली. हिंदुस्थानावर राज्य करण्याचं स्वप्न बाळगून बाबर आला होता, त्यानुसार सत्ताविस्ताराला त्याने सुरुवात केली होती, मात्र दरम्यान ज्या ज्या प्रदेशावर त्याने हुकूमत स्थापन केली तिथे विकासाची कामं देखील केली. त्याने आपल्या साम्राज्यात शाळा आणि महाविद्यालये बांधण्याची जबाबदारी स्वीकारली होती.

बाबरला बागांबद्दल विशेष प्रेम होतं. म्हणून त्याने आग्रा आणि लाहोरच्या परिसरात अनेक बागा उभारल्या. बाबराच्या राजवटीत विकसित झालेल्या मुघल गार्डनची काही उदाहरणं म्हणजे काश्मीरमधील निशाल बाग, लाहोर इथली शालिमार, पंजाबमधील पिंजौर बाग, ज्या बागा आजही टिकून आहेत. 

२) हुमायूँ 

१५३० पर्यंत राज्य केल्यानंतर जेव्हा बाबतचा मृत्यू झाला तेव्हा बाबरनंतर त्याचा मुलगा हुमायूँ गादीवर आला. त्याला पुस्तकांविषयी विशेष आकर्षण होतं. ताऱ्यांशी आणि नैसर्गिक वैशिष्ट्यांशी संबंधित विषयाबद्दल प्रचंड प्रेम होते. त्यानुसार त्यांनी मोठी लायब्ररी तयार केली होती. त्यांनी दिल्लीच्या शेजारी अनेक मदरसा देखील बांधले, जेणेकरून लोकांना तिथे जाऊन शिकता येईल.

हुमायूँ त्याच्या लायब्ररीच्या जिन्यावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी बांधलेली दिल्लीतील त्यांची समाधी ही मोगल स्थापत्यकलेतील महान कलाकृतींपैकी पहिली वास्तू आहे, ज्याला १९९३ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केलंय.

३) अकबर

हुमायूँचा मृत्यू १५४० मध्ये झाला. त्याच्या मृत्यूनंतर काही महिन्यांतच त्याच्या गव्हर्नरांनी दिल्लीसह अनेक महत्त्वाची शहरे व प्रदेश गमावले. त्यानंतर १५५६ मध्ये बेराम खान याच्या मार्गदर्शनाखाली अकबराने परत दिल्लीवर कब्जा मिळवला. अकबरच्या काळात मुघल काळातील सर्वात जास्त विकास भारतात झाला.

अकबराने उच्च शिक्षणासाठी आग्रा आणि फतेहपूर सिक्री इथे मोठ्या संख्येने महाविद्यालये आणि शाळा बांधल्या, कारण आपल्या साम्राज्यातील प्रत्येक व्यक्तीला शिक्षण मिळावं, अशी त्याची इच्छा होती. अकबराने पर्शियन भाषेला राज्यभाषेच्या दर्जा दिला होता, ज्यामुळे साहित्याची वाढ झाली. मोगल राजवटीत अकबराने विकसित केलेली शाळा कलेच्या उत्पत्तीचं केंद्र म्हणून काम करत होत्या.

अकबराला हुमायूँच्या ग्रंथालयाचा व दरबारी चित्रकारांचा वारसा मिळाला. ज्यामुळे त्याने बारकाईने वैयक्तिक लक्ष देऊन कलेचा विस्तार केला. त्या काळातील प्रमुख कलाकृतींमध्ये तुतिनामा, गुलिस्तान, निजामीचा खमसा, दाराब नामा आणि रामायण आणि महाभारतातील हिंदू महाकाव्ये यांचा समावेश होता.

अकबराने हिंदू कवितेलाही मनापासून संरक्षण दिल्यामुळे मोगल काळात हिंदू कवितेचाही लक्षणीय विस्तार झाला. सूर दास यांचे सूरसागर, तुलसीदास यांचे रामचरितमानस आणि ‘पारशी प्रकाश’ या फारसी-संस्कृत शब्दकोशाचे दस्तावेजीकरण या काळात झाले.

संगीत हे तर मुघल राजवटीच्या काळात हिंदू-मुस्लीम ऐक्याचा एकमेव मध्यान्न असल्याचे सिद्ध झाले. अकबराने ग्वाल्हेरच्या तानसेनला आपल्या दरबारात आश्रय दिला. तानसेन ही एक अशी व्यक्ती होती ज्याला अनेक नवीन मेलोडी आणि रागांच्या रचनांचे श्रेय दिले जातं.

अकबर हा पहिला मोगल शासक होता, ज्याच्या शासनकाळात बांधकाम मोठ्या प्रमाणात झाले. या बांधकामांमध्ये आग्रा इथला सर्वात प्रसिद्ध किल्ला आणि अनेक भव्य दरवाजे असलेला लाल किल्ला या मालिकेचा समावेश आहे.

इ.स. १५७० ते इ.स. १५८५ या काळात मोगल शैलीतील चित्राचा विकास व प्रसार करण्यासाठी अकबराने अनेक चित्रकारांची नेमणूक केली.

अकबराने सुरू केलेली मोगलांची एक मोठी सुधारणा म्हणजे झाब्ट. ही एक नवीन जमीन महसूल प्रणाली होती. या प्रणाली अंतर्गत, मोगलांनी नांगराच्या लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्राचे मूल्यांकन करण्यासाठी विस्तृत कॅडेस्ट्रल सर्वेक्षण देखील केले आणि मुघल राज्याने नवीन जमीन लागवडीखाली आणणाऱ्यांना करमुक्त कालावधी देऊन अधिक जमीन लागवडीस प्रोत्साहित केले.

४) जहाँगीर

अकबरनंतर जहाँगीर मुघल सम्राट म्हणून समोर आला. जहाँगीर हा तुर्की, पर्शियन अशा भाषांचा थोर संशोधक होता आणि त्याने आपल्या सर्व आठवणी व्यक्त करत तुझुक-इ- जहांगिरी हा ग्रंथही लिहिला होता.

त्याच्या राजवटीत मुघल स्थापत्यकलेने खूप प्रगती केली. संपूर्ण इमारतीत संगमरवरी वस्तू लावणे आणि भिंती अर्ध-मौल्यवान दगडांनी फुलांच्या डिजाईन करत सजविण्याची प्रथा प्रसिद्ध झाली. या प्रकारच्या सजावटीच्या प्रकाराला पिएत्रा ड्यूरा असं म्हणतात. ताज महाल बनवताना याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला.

जहाँगीरच्या कलात्मक प्रवृत्तीमुळे मुघल पेंटिंग्जचा आणखी विकास झाला आणि तैलरंगांचा म्हणजे ऑइल पेंट्सचा वापर होऊ लागला. त्यांनी युरोपियन कलाकारांच्या एकेरी दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिले आणि चित्रे वास्तविक जीवनातील घटनांवर केंद्रित झाली. जहांगीरनामा, या त्याच्या आत्मचरित्रात अशी अनेक चित्र होती.

निसर्गाबद्दलची संवेदनशीलता, मानवी चारित्र्याबद्दलची तीव्र जाणीव आणि चित्रकलेच्या अतुलनीय आश्रयात स्वत:ला व्यक्त करणारी कलात्मक संवेदनशीलता त्याच्यापाशी होती. त्यामुळेच  मोगल चित्रशैलीने त्याच्या कारकीर्दीत अभिजातता आणि समृद्धीची उच्च पातळी गाठली.

५) शाहजहाँ

अकबराचा मुलगा जहाँगीर याने १६०५ ते १६२७ पर्यंत मोगल साम्राज्यावर शांततेने व समृद्धीने राज्य केले. नंतर त्यांचा मुलगा शाहजहाँ आला.

३६ वर्षीय शाहजहाँला १६२७ मध्ये एक अविश्वसनीय साम्राज्य वारसाहक्काने मिळाले, पण त्याला जो काही आनंद झाला तो अल्पायुषी ठरेल. गादीवर आल्याच्या अवघ्या चारच वर्षांनी त्याची लाडकी पत्नी मुमताज महल हिचा मृत्यू त्यांच्या १४ व्या मुलाच्या जन्मादरम्यान झाला.

आपल्या प्रेमाची अभिव्यक्ती म्हणून, शाहजहानने पत्नीसाठी ताज महाल बांधला. पर्शियन वास्तुविशारद उस्ताद अहमद लहौरी यांनी रचलेला आणि पांढऱ्या संगमरवराने बांधलेला ताजमहाल हा मुघल स्थापत्यकलेचा मुकुट समजला जातो.

शाहजहाँच्या राजवटीत मोगल चित्रे विकसित झाली. प्रेमींच्या इंटिमेट पोजिशन आणि संगीत पार्ट्या त्याकाळापासून चित्रकलेतून दाखवल्या जाऊ लागल्या. दिल्लीत शाहजहाँने लाल किल्ला तसेच आणखी एक जिमी मशीद बांधली, जी भारतातील सर्वोत्तम मशिदींपैकी एक आहे. शाहजहाँची राजवट हाही महान वाङ्मयीन कार्याचा काळ होता.

शाहजहाँनंतर औरंगजेबपासून ते बहादूर शहा जफ्फरपर्यंत अनेक मुघल राजांनी भारतावर राज्य केलं. यात खूप सुविधा आणि विकास भारतात झाला. 

शिक्षण क्षेत्रात त्यांनी जसं मुघल शिक्षणाला महत्व दिलं तसाच हिंदू शिक्षणालाही प्रोत्साहन दिलं. मुलात शिक्षित व्हावं याचा अनेक राजांनी अट्टाहास केला. त्याकाळात प्राथमिक इयत्तेच्या पलीकडे शिक्षण घेण्याचा अधिकार स्त्रियांना नसल्याने मुलींच्या शिक्षणासाठी खासगी शिक्षकांची व्यवस्था घरच्या घरी उच्चभ्रू लोकांकडून केली जात होती.

पर्शियन आणि संस्कृत साहित्याचा मोठा वितर मुघलांच्या काळात झाला. भारतात चित्रकलेच्या विकासासाठी सुवर्णकाळ हा मोगलकाळ मानला जातो. कला शिकवण्यासाठी विविध प्रकारच्या शाळा त्यांनी उभारल्या होत्या. स्कूल ऑफ ओल्ड ट्रॅडिशन, मुघल चित्रकला, युरोपियन चित्रकला, राजस्थान चित्रकला, जैन  चित्रकलापहाडी  चित्रकला अशा अनेक प्रकारांचा त्यांनी विस्तार केला. 

स्थापत्यशास्त्राचे तर अनेक पुरावे आज मिळतात. मुघल घराण्यांची गायकी देखील याकाळात उदयास आली जिने भारताच्या संगीतात मोठं योगदान दिलंय.

मुघल साम्राज्यात भारतीय शेती उत्पादन वाढले. गहू, तांदूळ आणि बार्ली यासारखी अन्नपिके आणि कापूस, अफू सारख्या अन्नेतर नगदी पिकांसह विविध प्रकारची पिके घेतली गेली. १७ व्या शतकाच्या मध्यापर्यंत, भारतीय शेतकऱ्यांनी अमेरिकेतून मका आणि तंबाखू या दोन नवीन पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यास सुरवात केली होती. 

इ.स.१७५० पर्यंत भारताने जगातील औद्योगिक उत्पादनापैकी सुमारे २५% उत्पादन केलं होतं.

मुघल साम्राज्यातून तयार केलेल्या वस्तू आणि नगदी पिके जगभर विकली गेली होती. ज्यात वस्त्रोद्योग, जहाजबांधणी आणि पोलाद या प्रमुख उद्योगांचा समावेश होता. प्रक्रिया केलेल्या उत्पादनांमध्ये सूती कापड, सूत, धागा, रेशीम, जूट उत्पादने, धातूची भांडी आणि साखर, तेल आणि लोणी यासारख्या पदार्थांचा समावेश होता.

मोगल साम्राज्यातील सर्वात मोठा उद्योग म्हणजे कापड निर्मिती.

विशेषत: सुती कापड निर्मिती या काळात झाली. ज्यात न विरघळलेल्या आणि विविध रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या तुकड्यांच्या वस्तू, कॅलिकोस आणि मलमल यांच्या उत्पादनाचा समावेश होता. मुघल साम्राज्याच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा मोठा भाग कापड उद्योगावर होता.

१८ व्या शतकाच्या सुरुवातीस जागतिक वस्त्रोद्योग व्यापारात भारताचा २५% वाटा होता. 

मुघल भारतात जहाजबांधणीचा मोठा उद्योग होता, जो बंगाल प्रांतात मोठ्या प्रमाणात केंद्रित होता. आर्थिक इतिहासकार इंद्रजित रे यांनी सोळाव्या आणि सतराव्या शतकात बंगालचे जहाजबांधणीचे उत्पादन वार्षिक २,२३,२५० टन असल्याचा अंदाज वर्तवला आहे, तर १७६९ ते १७७१ या काळात उत्तर अमेरिकेतील एकोणीस वसाहतींमध्ये २३,०६१ टन उत्पादन झालं होतं.

अशाप्रकारे भारताचं कला क्षेत्र, शेत क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, भारतीय व्यापार यासर्वांवर मुघल साम्राज्याची छाप आहे. ज्याची साक्ष आजही अनेक गोष्टी देतात. ज्यातून सिद्ध होतं की, भारताचा इतिहास मुघलांना टाळून लिहिलाच जाऊ शकत नाही.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.