पोरगीच्या लग्नात पैसै उधळलेल्या बापानं, स्वत:च लग्न कस केलेलं माहिताय का..? 

यंदाच वर्ष भारताच्या इतिहासाच लगीनवर्ष म्हणून घोषीत करायला पाहीजेत. राज्यात दुष्काळ पडलाय. देशात राजकारणाचा राडा चालूय. तिकडे दोन सिंगल लोक पंतप्रधानपदावरुन एकमेकांविरोधात उभा रहायची तयारी करतायत हिकडे पाणी नाय, पोरी शेती किती विचारत्यात? शेतीचं सांगितलं की पुण्यात आहे का म्हणत्यात? पुण्यात हाय म्हणलं की पॅकेज किती विचारत्यात आणि ते सांगितलं की प्लॅट नाय म्हणून कळवतो सांगून पळून जात्यात. 

संपुर्ण राज्यात लग्नाबद्दल दुष्काळी परस्थिती निर्माण होत असताना तिकडं इंडियामध्ये धुमधडाक्यात सगळेजण उरकून घ्यायला लागलेत. अनुष्का-विराट, दिपीका-रनवीर,प्रियांका-निक एकामागून एक विवाहबंधनात अडकायल्यात बर सेलिब्रिटी म्हणून हे ठिक होतच,

इतक्यात वर्षाच्या शेवटचा घाव जोरात हाणायचा म्हणून थेट अंबानीची पोरगीच मांडवात उतरली. 

आत्ता तिचा बाप कोण आहे ते तुम्हा आम्हाला सांगायची गरज नाही. बाप पण दिलदार माणूस. एखादा एकर जावूदे पण धुरळा झाला पाहीजे या टाईपमध्ये अंबानीच्या पोरगीचं लग्न झालं. फेसबुक उघडा नायतर ट्विटर, इन्स्टा, युट्यूब, न्युजचॅनेल, संध्यानंद काहीएक सोडलं नाही. 

सगळी चर्चा एकच अंबानीच्या पोरगीच्या लग्नात असअस झालं. 

आत्ता तुम्हाला माहितच आहे. मिडीयानं कोकलुन कोकलुन स्वत:च्या लग्नात झाल्यासारख्या सगळ्या अपडेट तुमच्यापुढ्यात टाकलेत. पोरगीच्या लग्नात बच्चन बुंदी वाटत होता. अमिर खान भातभात करत होता. ऐश्वर्या रॉय वांग्याची भाजी वाडत होती. ती बियॉन्से का कोण एका रात्रीच १०० एक कोटी फक्त नाचायचं घेवून गेली. सलमान खान साईट डान्सर म्हणून नाचत होता, लता मंगेशकर गायत्री मंत्र म्हणत होत्या, आणि आपले वधुबंधू रिलायन्स ही मेरी पॉवर टाईप भाषण द्यायचं सोडून चक्क नाचत होते, वगैरे वगैरे…. 

आत्ता या अपडेटचा शेवटच झाला तो अंबानी रडल्यानं. इतका मोठ्ठा माणूस रडू शकतो हेच आपल्याला पटलं नाही. अंबानीनं रडायला पण माणसं ठेवल्यात असच आपल्याला वाटायचं पण ते धुळीस मिळालं. 

असो तर या पोरगीच्या लग्नात राडा करणाऱ्या बापानं स्वत:च लग्न कस केलेलं माहिताय का? 

तर आदरणीय मुकेश अंबानी याचं देखील एका लग्नात जमलं होतं. त्याचं झालं अस की अंबानी कुटूंबिय सहपरिवार बिर्ला यांच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलं होतं. आदरणीय कोकिलाबेन, आदरणीय धिरूभाई अंबानी आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमात एक शास्त्रीय डान्स ठेवण्यात आला होता. यात शास्त्रीय डान्स करत होत्या त्या नीता अंबानी. 

Screen Shot 2018 12 17 at 12.07.22 PM
पोराच्या लग्नात पाहूणचार करणारे आदरणीय धीरूभाई अंबानी.

नीता अंबानी यांना पाहून धिरुभाईंना वाटलं की, सुन असावी तर अशी मग त्यांनी चौकशी केली तेव्हा समजलं की नीता अंबानी यांचे वडिल बिर्ला समुहात काम करतात. नीता अंबानी एका प्रायव्हेट स्कुलमध्ये टिचर असून त्यांचा महिन्याला पगार ८०० रुपये आहे. सर्वसामान्य घर अस एकंदरित स्थळ आहे. धिरूभाईंना स्थळ आवडलं. पोराला एका क्षणात पोरगी पसंत पडली. 

त्यानंतर धीरूभाईनी स्वत: (हे स्वत: या ठिकाणी खूप महत्वाचं आहे कारण की, एकतर पोराकडची पार्टी त्यात अंबानी) पण धिरूभाईंनी अज्जीबात ताल न करता फोन लावला. तो उचलला निता अंबानी यांनी. तिकडून आवाज आला,

“मी धिरूभाई अंबानी बोलतोय”

तर हिकडून निता अंबानी म्हणाल्या,

“मी एलिझाबेथ टेलर बोलतेय.”

कोणतर चेष्टा करतय म्हणून त्यांनी फोन ठेवला. धीरूभाईंनी परत फोन केला तेव्हा निता अंबानींच्या वडिलांनी उचलला. त्यानंतर निता अंबानी धिरूभाईंना भेटायला त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्या. 

बोलणं झाल्यानंतर सासऱ्यांना पोरगी पसंत पडली. मुकेशभाय तर कधीचेच रेडी होते. पुढे काय झालं ? तर त्या काळातलं डेट वगैरे हे दोघं करायला लागले. एक दिवस सिग्नलवर गाडी थांबली आणि आपल्या नॉटी (नॉटी शब्दावर ऑब्जेक्शन असणाऱ्यांनी मुकेश अंबानी आणि राजदिप सरदेसाई यांचा व्हिडीओ पहावा) नॉटी मुकेश अंबानी यांनी एका सिग्नलवर गाडी थांबवली. निता जोपर्यन्त होय म्हणतं नाही तोवर एक्सेलेटर वरुन पाय काढणार नाही अस कडक आव्हान दिलं. कमकुवत ह्रदयाच्या निता अंबानी प्रचंड भिल्या आणि त्यांनी त्याच मुंबईच्या सिग्नलवर त्यांना जाहिर होकार कळवला. फक्त मला नोकरी करुन द्यावी अशी अट टाकली. पुढं त्या अटीच काय झालं तुम्हाला माहितच आहे. 

बाकी हे लग्न साधं देखील झालं नाही पण लय मोठ्ठ देखील झालं नाही. त्याची इतकी हवा पण झाली नाही पण तितकी कमी देखील झाली नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर ठिकाय या प्रकारातलं त्यांच लग्न होतं पण स्वत:च्या लग्नाच्या राड्यातली हौस आदरणीय मुकेश अंबानी यांनी पोरगीच्या लग्नात पुर्ण केली याबद्दल कौतुक. आत्ता फक्त पोरगीचा बाप कर्जबाजारी म्हणून मल्या होवू नये म्हणजे मिळवली. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.