अनिल अंबानी आज एकच गाणं ऐकत आहेत, “अपने तो अपने होते है !!”

तर मित्रहो भिडूनों आजची महत्वाची बातमी वाचली की नाही ? भाऊ आला भावाच्या मदतीला !! अनिल अंबानीनां तुरुंगात जाण्यापासून मुकेश अंबानीने वाचवलं. असं म्हणतात भावाला वाचवण्यासाठी मुकेश अंबानींनी भरले ४५० कोटी. 

आपल्या पैकी अनेकांनी बातमी वाचली आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्या भावांना, आपल्या भावकीला शंभर शिव्या घातल्या . असे भाव पाहिजेत नाहीत तर आपले पण आहेत.(असच सेम आपल्या भावाने बातमी वाचल्यावर पण म्हटल असणार)

अनिल अंबानी आजच्या घडीच सगळ्यात गंडलेलं कॅरेक्टर. एकेकाळी धीरूभाईचा खरा वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, बॉलीवूडची स्वप्नसुंदरी टीना मुनीम बरोबर लव्ह मॅरेज करणारा डॅशिंग अनिल अंबानी ची अवस्था आज ही झालीय की राहुल गांधी ते राहुल गांधी त्याला खुलेआम सोलून काढतोय.

सगळ जग उलट झालंय, सगळ्या कंपन्या तोट्यात गेल्या आहेत, डोक्यावर कर्जाचा बोजा वाढलाय, कसबस करून राफेलचं डील पदरात पाडलेल ते पण राहुल गांधीच्या कृपेन जातय की काय अशी कथा झालीय.

काय झालं नेमक? कुठ अनिल अंबानी गंडले?

धीरूभाई अंबानी ला आधुनिक काळातला कुबेर म्हणून ओळखलं जायचं. त्याची ही दोन पोरं. मोठा मुकेश, धाकटा अनिल. एक काळ होता मुंबई शहरातल्या भुलेश्वरमधल्या एका कोंदट चाळीत हे कुटुंब राहायचं.  मुकेश अंबानी शाळेत असल्यापासून लाजाळू, कमी बोलणारा. तर बडबड्या अनिलचा मित्रपरिवार मोठा. मुकेशने प्रतिष्ठीत अशा युडीसिटी कॉलेजमधून केमिकल इंजिनियरिंग केलं तर अनिलन बीएस्सी केली. दोघेही एमबीए शिकायला अमेरिकेला गेले.

anniv t n ninan 1 647 121115082517

मुकेश अंबानीना स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीमधलं आपलं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. त्याच्या आधीच त्यांना धीरूभाईनी आपल्या मदतीसाठी भारतात बोलावून घेतलं. अनिलला मात्र शिक्षण पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली. ऐंशीच्या दशकात आधी मुकेश आणि मग अनिल वडिलांच्या मदतीला रिलायन्सच्या कारभारात शिरले. याच काळात धीरूभाई अंबानीना पहिला हृद्यविकाराचा झटका आला. तेव्हा पासून त्यांच्या वरचा धंद्यातला बराचसा भार या दोन्ही भावांनी उचलला. 

या दोघांनी धंद्याच्या सोयीसाठी आपापले डिपार्टमेंट वाटून घेतले होते. अनिल अंबानी रिलायन्सचा चीफ फायनान्शीयल ऑफिसर होता. त्याचं मुख्य काम मोठमोठ्या डील्स घडवून आणणं, मिडियाशी रिलेशन मेंटेन करण हे होत. तर मुकेश अंबानी रिलायन्समधलं मन्युफक्चरिंगचं काम पहायचे. रिलायन्सचा कणा असलेल्या पेट्रोकेमिकल्स, विमल टेक्स्टाईल या सगळ्याच कामकाज मुकेश अंबानी सांभाळत होते.

 म्हणजेच खऱ्या अर्थाने अनिल अंबानी रिलायन्सचे पोस्टर बॉय होते आणि मुकेश अंबानी पडद्यामागचे कलाकार.

दोन हजार साल जसं जवळ आलं तस हा पुढचा काळ मोबाईल इंटरनेट या संवादक्रांतीचा असणार आहे हे संपूर्ण जगान ओळखलं होत. अनिल अंबानी यांनी आपल्या वडिलाना या क्षेत्रात उतरण्याची परवानगी मागितली. धीरूभाई अंबानीनी त्यांना सक्सेस साठी सिक्रेट कानमंत्र दिला. मोबाईल वर बोलण सध्या चार आणेच्या पोस्टकार्ड पेक्षा स्वस्त झालं पाहिजे. तरच ते चालेल

“कर लो दुनिया मुठ्ठी मै !!”

वाजत गाजत रिलायन्स कम्युनिकेशनची सुरवात झाली. आल्या आल्या त्यांनी भारतीय मोबाईल इंडस्ट्रीचं रूपड पालटून टाकलं. एकेकाळी इनकमिंगला पैसे भरायला लागत होते त्याच्यापासून मिनिटाला एक रुपया हा बदल रिलायन्स मोबाईलने घडवले. सरकारमध्ये असलेल्या प्रमोद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली रिलायन्सने भारतातल्या गरीबातल्या गरीब माणसाच्या हातात  मोबाईल पोहचवला. 

याच्या अगोदरच एक त्सुनामी रीयांस परिवारामध्ये आली होती. ६ जुलै २००२ रोजी धीरूभाई अंबानी यांचा हार्टअटकने मृत्यू आला. त्यांनी जाताना आपले कोणतेही मृत्युपत्र बनवले नव्हते. संघर्ष अटळ होता. छोट्या छोट्या कुरबुरीतून सुरु झालेली भांडण न थांबवता येईल या पातळीवर जाऊन पोहचली.

कहाणी घर घर की

 कोकिलाबेन अंबानीनी आपल्या दोन्ही पोरांची समजूत काढण्याचा घर तुटण्यापासून वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. कोर्टापर्यंत वाद जाऊन पोहचले. अखेर दोघांच्यात वाटणी झाली. मुख्य रिलायन्स मुकेश अंबानी यांच्या हातात राहिले, इन्फ्रास्ट्रक्चर, पेट्रोलियम या गोष्टी मुकेश यांच्याकडे तर कम्युनिकेशन , रिलायन्स एनर्जी, रिलायन्स कॅपीटल या कंपन्या होत्या.

दोघांकडे जवळपास समान संपत्ती आली होती. अनिल अंबानीकडे २००७ साली २,९७,००० करोड रुपये संपत्ती होती तर मुकेश अंबानीकडे ३,२३,००० करोड रुपये होते. पण आजची कंडिशन बघितली तर अनिल अंबानी कर्जाच्या घेऱ्यात आहेत तर मुकेश अंबानी जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

क्या हुआ? कैसे हुआ? क्यू हुआ?

मुकेश अंबानी यांनी वडिलांच्या हाताखाली राहून धंद्याची सगळी गणिते शिकली होती. अनिल अंबानी मात्र यात कमी पडले. त्यांनी अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट हाती घेतले पण त्यात काही ते यशस्वी झाले नाहीत.२००४ साली सरकार बदलल्यापासून रिलायन्स मोबाईलचा आधार निघून गेला. हळूहळू त्या धंद्यात तोटा आला. सिनेमाक्षेत्रात पावले टाकली तेथे मोठे नुकसान सहन करावे लागले. अनिल अंबानीयांच्यासाठी कोणतीच गोष्ट त्यांच्या बाजूने होत नव्हती.

२०१० साली ३जी स्पेक्ट्रम डील मिळवले पण त्यातही म्हणावे ते यश मिळाले नाही. आपले वेगवेगळे उद्योग विकण्यावाचून त्यांना पर्याय उरला नाही. इकडे मुकेश अंबानी हे मिडास टच प्रमाणे ज्याला हात लावतील त्याचे सोने बनवत सुटले होते. रिलायन्स चा डोलारा पूर्वी होता त्याच्या तिप्पट चौपट नेऊन पोहचवला. आयपीएलची टीम खरेदी केली. गेल्या चार पाच वर्षात तर यशाची कमान ते चढत गेले.

जिओ और जिने दो.

२०१० साला पासून मुकेश अंबानी कम्युनिकेशन क्षेत्रात येण्याची तयारी करत होते. २०१४साली त्यांच्या विचारांशी  मेळ खाणारे सरकार केंद्रात आले आणि या या कल्पनांना उंच भरारी मिळाली. २७ डिसेंबर २०१५ रोजी एका मोठ्या फंक्शन मध्ये जिओ चं लॉंंचिंग करण्यात आलं. धीरूभाई अंबानी यांचं स्वप्न पोस्टकार्डपेक्षा कमी खर्चात कम्युनिकेशन हे प्रत्यक्षात अवतरल. पुढच्या काहीच महिन्यात स्पर्धेतल्या इतर सर्व कंपन्यांना खाऊन टाकून मुकेश अंबानी यांच्या जिओने खरोखर  दुनिया मुठ्ठी मै केली.

जिओ च्या तडाख्यात उडून पडणाऱ्या कंपन्यामध्ये अनिल अंबानी यांची रिलायन्स इन्फोकॉमदेखील होती. ते आधीच सरकारकडून घेतलेल्या स्पेक्ट्रमच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले होते. २०१३साली अनिल अंबानी यांनी स्वीडनच्या एरिक्सन कंपनीशी मोबाइल फोन टावर, फिक्स्ड टेलीफोन लाइन, ब्रॉडबँड, वायरलेस वॉईस आणि डेटा सांभाळण्याचे कॉट्रक्ट दिले होते. मात्र गेल्या सात वर्षात तोट्यात गेलेल्या अनिल यांनी आपली कंपनीच बंद करून टाकली. एरिक्सन ने त्यांना कराराप्रमाणे ११०० कोटी रुपये देण्याची मागणी केली. वाद नॅशनल लॉ ट्रीब्युनल मध्ये गेला.

अखेर तिथे सेटलमेंट झाली की अनिल अंबानी एरिक्सनला ५५० कोटी देतील. पण तेव्हडे पैसे देण्याची ऐपतसुद्धा अनिल अंबानी यांच्या कडे उरली नव्हती. १९ मार्च पर्यंत हे पैसे जर दिले नाहीत तर त्यांना ३ महिने कारावास भोगावा लागणार होता. शेवटच्या दिवसापर्यंत पैशांची काही जुळवाजुळव शक्य झाली नव्हती.

 अपने तो अपने होते है.

गुजराती मारवाडी या व्यापारी कुटुंबात एक गोष्ट कॉमन आहे. कितीही झाले तरी आपल्या भाईबन्दाना ते कधी अंतर देत नाहीत. घरात कितीही मोठी भांडणे होऊ देत पण संकटात सगळे एकत्र येतात. आणि कर्ज दिवाळखोरी अशा वेळी तर घरातल्या बायका सुद्धा अंगावरच सोन काढून फॅमिलीचा बिझनेस सांभाळतात. 

मुकेश अंबानी यांनी ही परंपरा सांभाळली. कर्जापायी तुरंगात जाणाऱ्या भावाला तब्बल ४५० कोटी रुपये देऊन वाचवल अशी चर्चा आहे. कठीण प्रसंगी आपल्या भावाला एक चहा देखील न पाजणाऱ्या आजच्या जमान्यात नुकेश अंबानी यांनी मोठेपणा दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे हे खरेच!

जाता जाता विशेष सूचना: – राम लक्ष्मण भरत यांच्यानंतर झालेला बंधुप्रेमाचा हा न भूतो न भविष्यती असा हा चमत्कार सांगायला आपल्या भावाला टॅग करणार असल्यासं खुशाल करा. पण भावाने हा लेख वाचून तुमच्याकडे पैशांची मागणी केली तर याची जबाबदारी संपादक मंडळ उचलणार नाही .

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.