जगिरासारखा व्हिलन साकारुनही मुकेश तिवारी बेरोजगार फिरत होता तेव्हा वसुलीभाईने तारलं…

बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करणाऱ्या एखाद्या ऍक्टरला फक्त एका सुपरहिट अभिनयाची गरज असते आणि त्यानंतर त्याला चिक्कार कामं मिळतात. असं सगळ्याच अभिनेत्यांच्या बाबतीत घडतं असं नाही काही अभिनेत्यांना चांगलं काम करूनही ते दुर्लक्षित राहून जातात. आजचा किस्सा अशाच एका अभिनेत्याचा आहे, तर जाणून घेऊया या अभिनेत्याबद्दल आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल.

मेरे मन को भाया मै कुत्ता काट के खाया

लोमडीका दूध पिके पला हे ए जगिरा, हमसे ना भिडीयो…..

चायना गेट सिनेमातला जगिराचा हा डायलॉग बऱ्याच लोकांच्या चांगलाच लक्षात आहे. जगिरा सारखा अफाट व्हिलन साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव होतं मुकेश तिवारी. मुकेश तिवारीचा हा जगिरा प्रेक्षकांच्या काळजात धडकी भरवणारा होता.

मुकेश तिवारी यांच्या अभिनयाने चायना गेट हा सिनेमा एका वेगळ्या उंचीवर पोहचला आणि समोर इतके सारे दिग्गज अभिनेते असून देखील जगिरा जास्त गाजला. मुकेश तिवारी हे एक थेटर आर्टिस्ट होते. मध्यप्रदेशातून अभिनयाची आवड जोपासून ते राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या केंद्रात गेले. अगोदर उत्तम क्रिकेट खेळणारे मुकेश नॅशनल टीममध्ये खेळून आले होते. 

नाटकांमधून  काम करू लागल्याने मुकेश तिवारीच्या अभिनयाच्या चर्चा होऊ लागल्या. चायना गेट सिनेमासाठी जेव्हा त्यांना बोलावणं आलं तेव्हा त्यांना विश्वास नव्हता आणि ते या गोष्टीकडे गंमत म्हणून पाहत होते.

नंतर त्यांना काही दिवसांनी कळवण्यात आलं कि नसरुद्दीन शहा तुमच्याशी बोलणार आहे. जेव्हा मुकेश यांनी नसरुद्दीन शहा यांना फोन लावला तेव्हा नसरुद्दीन शहा यांनी मुकेशला भरपूर शिव्या दिल्या आणि ओरडले कि मागच्या पाच दिवसांपासून मी तुला शोधतोय, तुझे फोटो पाठवून ठेव. 

पुढे मुकेश तिवारीने फोटो कुरियर केले आणि त्यांना मेसेज मिळाला कि चायना गेटच्या मेन व्हिलनसाठी तुमची निवड झाली आहे. लवकरात लवकर मुंबईत येणे. तेव्हा चौकीदार असलेल्या मित्राकडून ४ हजार उधारीवर पैसे मिळवून मुकेश मुंबईत पोहचले. मुंबईत येऊन ऑडिशन दिल्यावर २० हजार सायनिंग अमाऊंट सह निवडीस झाली.

जगिराच्या रोलची तयारी करताना मुकेश तिवारी यांनी अस्ताव्यस्त केस वाढवले आणि बऱ्याच दिवस अंघोळही केली नाही. १९९८ साली चायना गेट सिनेमा रिलीज झाला आणि तुफ्फान गाजला तो जगिरा व्हिलन. फिल्मफेअरला नॉमिनेशन मिळालं, नवीन सूट घालून मुकेश तिवारी गेले पण त्यांना अवॉर्ड मिळाला नाही म्हणून ते नाराजही झाले.

चायना गेटमध्ये गाजलेली भूमिका करूनही मुकेश तिवारीला बरीच वर्ष कामच मिळालं नाही याचं कारण होतं, कि बऱ्याच लोकांना मुकेश तिवारींचा चेहराच माहिती नव्हता, कारण सगळ्यांनी त्यांना जगिराच्या अवतारातच पाहिलं होतं. तेव्हा मुकेशने १० टॉप दिग्दर्शकांची यादी बनवली आणि सगळ्यांना जाऊन ते भेटले. आणि तब्बल १८ सिनेमे त्यांना मिळाले. व्हिलन म्हणून बऱ्याच सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. 

२००३ साली आलेल्या गंगाजलमधील भूमिका मुकेश तिवारींनी सुपरहिट केली. या सिनेमानंतर अनेक वेगवेगळ्या भूमिका असलेले सिनेमे त्यांना मिळू लागले. गंगाजल सिनेमाच्या वेळी अजय देवगणसोबत मुकेशची चांगली ओळख झाली होती आणि यातूनच मिळाला वसुली भाई.

गोलमाल सिरीजमध्ये मुकेश तिवारींची एन्ट्री झाली आणि वसुली भाई सुपरहिट झाला.

अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल भी निकलना है…

वसुलीभाईचा हा डायलॉग अजरामर झाला. आजही हे पात्र मुकेश तिवारीच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाचं प्रतीक आहे. गोलमाल, द लिजेंड ऑफ भगतसिंग, अपहरण, तिसरी आंख, टारझन, हल्ला बोल अशा अनेक सिनेमांमध्ये मुकेश तिवारीने जबरदस्त अभिनय केला.

केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू आणि पंजाबी भाषेतही मुकेश तिवारींनी भरपूर काम केलं. जगिरा आणि वसुली भाई हि पात्र लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.