सावित्रीबाईंची पहिली विद्यार्थिनीसुद्धा क्रांतिकारकच होती…..

आज घडीला महाराष्ट्रातल्या आणि भारतभरातल्या लेकीबाळी शिकू शकतात ते फक्त आणि फक्त क्रांतीजोती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिसूर्य जोतीराव फुले या दाम्पत्यामुळे. चूल आणि मूल हि बायकांची काम आहेत या प्रथेच्या पल्याड जाऊन फुले दाम्पत्यांनी मुलींना शिक्षणाचा राजमार्ग दाखवला. आज घडीला मुली आपापल्या क्षेत्रात टॉपला आहे त्याच सगळं क्रेडिट हे सावित्रीमाई आणि ज्योतिबा फुले यांना जातं.

ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना सगळ्यात आधी साक्षर केलं आणि पुढे सावित्रीबाईंनी अथक परिश्रम घेऊन प्रसंगी शेणचिखलाचे गोळे अंगावर घेऊन आपलं काम सुरूच ठेवलं. मुलींना साक्षर करायचा विडाच त्यांनी उचलला होता. सावित्रीबाई जितक्या क्रांतिकारी होत्या तितक्याच क्रांतिकारी त्यांच्या विद्यार्थिनी सुद्धा होत्या. त्यांनी पहिली विद्यार्थिनी म्हणजे मुक्ता साळवे. चांगल्या उच्चभ्रू अधिकाऱ्यांना बेधडकपणे बोलणाऱ्या मुक्ता साळवेंबद्दल आपण जाणून घेऊया. 

स्त्रीच्या वाट्याला आलेलं दुःख शिक्षणामुळे बाजूला सारता येऊ शकत हे लक्षात घेऊन पुण्याच्या भिडे वाड्यामध्ये फुले दाम्पत्यांनी शाळा सुरु केली. त्यांची पहिली विद्यार्थिनी असण्याचा मान जातो तो मुक्ता साळवे यांना. १८४० साली पुण्यामध्ये मुक्ता साळवेंचा जन्म झाला. आद्य क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या त्या पुतणी होत्या. लहुजी साळवे हे महात्मा जोतिबा फुले यांचे सहकारी आणि सोबतच अंगरक्षकसुद्धा होते.

अस्पृश्यांच्या मुलींना महात्मा जोतीराव फुले यांच्या शाळेत आणुन बसवण्याचं सगळं श्रेय जातं ते लहुजी साळवे यांना. मुक्ता साळवे यांनी तिसऱ्या इयत्तेत असताना वयाच्या १४ व्या वर्षी निबंध लिहिला. या निबंधात अस्पृश्यांच्या वेदना मांडून मुक्ता साळवेंनी सगळ्यांनाच चकित आणि हेलावून टाकलं होतं. या निबंधासाठी मुक्ताचा पुण्यामध्ये विश्रामबागवाड्यात तत्कालीन कलेक्टरच्या पत्नी मिसेस जोन्स ह्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर कॅन्डी यांनी मुक्ताला बक्षीस म्हणून लेखणी आणि चॉकलेट दिले, तेव्हा सत्काराला उत्तर देताना मुक्ता म्हणाली, सर, बक्षीस म्हणून मला खाऊ खेळणी नकोत, मला ग्रंथालय हवे.

मुक्ता साळवे यांनी लिहिलेला मांग महारांच्या दुःखाविषयीचा निबंध ज्ञानोदय मासिकात १ मार्च १८५५ रोजी प्रकाशित झाला. ब्राम्हणांच्या धार्मिक लबाडीबद्दल बोलताना मुक्ता साळवे लिहितात , ब्राम्हण लोक म्हणतात की, इतर जातींनी वेद वाचू नयेत. याचा अर्थ आम्हास धर्म-पुस्तक नाही. मग आम्ही धर्मरहित आहोत का ? तर हे भगवान आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग !

मुक्ता साळवेंनी जातीय विषमतेवरही कडाडून टीका केली. त्या म्हणतात की

आम्हां महार- मांगाना लुबाडून उच्च जातीतल्या लोकांनी आमच्या जमिनी बळकावल्या व त्यावर त्यांच्या इमारती बांधल्या. आम्हांला गाई-म्हशींपेक्षाही नीच मानलं गेलं. ज्या वेळी बाजीरावाचं राज्य होतं तेव्हा मांग किंवा महार तालीमखान्यासमोरून गेला तर त्याच्या शिराचा चेंडू आणि तलवारीचा दांडू करून मैदानात खेळत होते.

गाढवाला मारल्यावर तरी त्याचा मालक गाढवाची फटफजिती का केली? याचा जाब विचारतो. पण महार- मांगांना मारल्यावर असं विचारणारं कुणी आहे का?’ असा प्रश्‍न विचारून मुक्ता साळवे दांभिकांना हलवून सोडतात.

मुक्ता साळवेंनी जातीवादावर प्रचंड भाष्य केलं. दलित लोकांवरील लागलेल्या गुन्हेगारीच्या शिक्क्यावर प्रखरपणे बोलणाऱ्या मुक्ता साळवे या पहिल्या लेखिका होत्या. मांगमहार स्त्रियांच्या दुःखाबद्दल लिहिताना मुक्ता साळवे सांगतात मांग-महार स्त्रिंयाच्या वाटयाला येणारे दुःख किती भयंकर असते याच्या विदारक वास्तवाचे वर्णन करताना ‘त्या स्त्रियांना कसे उघडयावर बाळंत व्हावे लागते.

मुक्ता साळवे या फक्त समाजव्यवस्थेची मीमांसा करून थांबत नाही, तर त्या या शोषणाधारित सामाजिक गुंतागुंतीचं निवारण आपण कसं करू शकतो यावरही लिहितात कि

Oh, the mahars & mangs, you are poor and sick. Only the medicine of knowledge will cure and heal you.

सावित्रीबाई जितक्या प्रतिभावान शिक्षिका होत्या तितक्याच त्यांच्या विद्यार्थिनी असलेल्या मुक्ता साळवे क्रांतिकारी होत्या. आपल्या लेखणीच्या जोरावर त्यांनी जातिव्यवस्थेवर प्रखर भाष्य केलं होतं. आजही मुक्ता साळवे यांच्या लिखाणातील सत्यता गंभीर विचार करायला लावणारी आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.