राष्ट्रवादी-सेनेत ज्या मुक्ताईनगरवरून वाद सुरु आहे त्याचं नेतृत्व माजी राष्ट्रपतींनी केलंय
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आहे. पण हे सरकार स्थापन होण्याच्या सुरुवाती पासूनचं अनेक वाद – विवाद पाहायला मिळतायेत. त्यात मेन गोंधळ होतो तो कोणत्याही निवडणुकीच्या जागावाटपावरून. म्हणजे कोणत्याही निवडणुकीच्या वेळी एखाद्या मतदार संघातून कोणत्या उमेदवार उभा राहणार यावरून वाद सुरु होतात.
त्यात एकाच मतदार संघात तिन्ही पक्षांची चांगली हवा असेल तर जाम गोची होते, मग सुरु झालेला वाद पार सत्ताधारी आणि विरोधी पक्षाप्रमाणं सुरु होतो. मग जस कि आपण पाहिलंय अनेक ठिकाणी हे तिन्ही पक्ष आपले वेगवेगळे उमेदवार उभे करतात. पण महाविकास आघाडीच्या याच अंतर्गत वादाचा फायदा विरोधी पक्ष घेतात.
असो.. तर या सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधल्या वादाचं ताज उदाहरण म्हणजे जळगावातलं मुक्ताईनगर. काही दिवसापूर्वी मुक्ताईनगरच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वाद पाहायला मिळालेला. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि रोहिणी खडसे यांच्यातला हा वाद होता मुक्ताईनगरच्या दाव्यावरून.
चंद्रकांत पाटील म्हणतायेत तिथं आपला राजकीय दबदबा आहे, तर खडसे कुटुंबीय म्हणतायेत हा आमचा राजकीय वारसा आहे. पण भिडू बऱ्याच जणांना माहित नसेल या मुक्ताईनगरचं नेतृत्व कधीकाळी माजी आणि पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी केलंय.
म्हणजे १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, तेव्हापासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघावर काँग्रेसचाचं बोलबाला होता. म्हणजे जवळजवळ १९९० पर्यंत काँग्रेस पक्षाचीचं इथं पकड होती. त्यात राज्याच्या निर्मितीपासून झालेल्या दहा विधानसभा निवडणुकांत मराठा आमदारांची संख्या सगळ्यात जास्त होती. म्हणजे आकडेवारीवरुन सांगायचं झालं तर एकूण २८८ आमदारांच्या संख्येपैकी ४५ टक्के इतकी.
यातलाचं एक मतदारसंघ म्हणजे मुक्ताईनगर जिथं काँग्रेसच्या तिकिटावर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून निर्वाचित झालेल्या प्रतिभा देविसिंह शेखावत- पाटील निवडून यायच्या. १९६७ ते पार १९८५ पर्यंत प्रतिभाताई मुक्ताईनगर मतदारसंघातुन आमदार म्हणून निवडणूक यायच्या. मुक्ताईनगर त्यावेळी एदलाबाद म्हणून ओळखलं जायचं असं म्हणतात. याच मतदार संघाचं नेतृत्व त्यांनी विधानसभेत केलेलं.
तसा विदर्भात प्रतिभाताईंचा बोलबाला होताचं, म्हणजे त्यांचं सासर विदर्भाचं. अमरावती त्यांची कर्मभूमी होती तर माहेर असणाऱ्या खानदेशातल्या जळगावातून सुद्धा त्यांनी बऱ्याच निवडणूका लढवल्या.
या दरम्यान त्यांनी आरोग्य, पर्यटन, समाजकल्याण, गृहनिर्माण, शिक्षण सांस्कृतिक अनेक अशी मंत्रिपद सुद्धा सांभाळली. पुढे अमरावतीमधून त्या खासदार म्ह्णून निवडून आल्या. पण मुक्ताईनगरच्या विकासात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. विधानसभेत त्या मुक्ताईनगरच्या बाजू ठामपणे मांडायच्या. आपल्या मतदारसंघात अनेक कल्याणकारी योजना त्यांनी आणल्या.
पुढे २००७ मध्ये जेव्हा प्रतिभाताई राष्ट्रपती बनल्या होत्या. तेव्हा या मुक्ताईनगरच्या लोकांना झालेला आनंद पाहण्यासारखा होता. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान या मुक्ताईनगर वाल्यांनी ‘प्रतिभाताई तुम आज बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिलेल्या.
पण नंतर मात्र १९८५ मध्ये पुलोद आघाडीचे हरिभाऊ दगडू जवरे हे मुक्ताईनगर मतदारसंघातून निवडून यायला लागले. १९९० पर्यंत काँग्रेसची एकतर्फी पकड़ या मतदारसंघावर दिसून येते. मात्र, १९९० नंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांची विचारसरणी सगळ्या महाराष्ट्रात पसरायला लागली. ज्याचा परिणाम मुक्ताईनगर मध्ये पाहायला मिळाला. आणि तिथं एकनाथ खडसे यांचा बोलबाला सुरु झाला.
हे ही वाच भिडू :
- आणि प्रतिभाताई पाटील यांची महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली..
- कार्यकर्ते घोषणा देऊ लागले, प्रतिभाताई तुम आगे बढो पण
- प्रतिभाताई पाटील इंदिरा गांधीच्या घरी धुणीभांडी करायच्या, खरे आहे का?