…तसं झालं तर मुलायमसिंग आयुष्यात पहिल्यांदाच समाजवादी विरोधात प्रचार करणार !
उत्तर प्रदेशातली विधानसभा निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. ज्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी वेगाने तयारी सुरु केली आहे. पक्षांनी आपापली रणनीती सेट केली आहे. लवकरचं निवडणूक प्रचार रॅलीचा नारळ सुद्धा फुटणार आहे.
मात्र या दरम्यान पक्षांतर्गत वाद, रुसवे- फुगवे वाढत चालले आहेत. निवडणुकीपर्यंत उमेदवारांमध्ये एकी टिकवून ठेवण्यासाठी पक्ष झटपट करत आहेत. अश्यातचं आता समाजवादी पक्षापासून फारकत घेतलेले शिवपाल यादव यांनी एक स्टेटमेंट केलं जारी केलंय. ज्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठा बदल पाहायला मिळणार असल्याचे चित्र उभं राहिलंय.
तर शिवपाल यादव यांनी म्हंटले आहे कि,
अखिलेश यांनी नेताजींचे ऐकले नाही, तर नेताजी स्वतः त्यांना निवडणूक प्रचारात साथ देतील.
प्रगतीशील समाजवादी पार्टी लोहियाचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवपाल यादव यूपी निवडणुकीपूर्वी आपला सामाजिक परिवर्तनाचा प्रवास घेऊन अमरोहा येथे पोहोचले होते. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एका पत्रकाराने समाजवादी पक्षासोबतच्या युतीबाबत विचारले असता त्यांनी म्हंटल कि, “जर अखिलेश यादव यांनी नेताजींचे (मुलायम सिंह यादव) ऐकले नाही तर ते आमच्या प्रगतिशील समाजवादी पार्टीसाठी प्रचार करतील.”
दरम्यान २०२२ मध्ये सत्तापरिवर्तन करण्यासाठी शिवपाल यादव यांचा सामाजिक परिवर्तनाचा प्रवास १२ ऑक्टोबर रोजी मथुरा येथून सुरू केला आहे.
यावेळी शिवपाल यांनी भाजपवर देखील निशाणा साधला. त्यांनी पुढे म्हंटले की, “भाजपने आश्वासने पूर्ण केली नाहीत, जनतेला त्यांना सत्तेवरून हटवायचे आहे. म्हणूनच आम्हाला वाटले की समविचारी पक्ष एकत्र आले तर भाजपला पराभूत करणे सोपे जाईल”.
केंद्र सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की,
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. रेल्वे, विमानतळ, टेलिफोन या सर्वांचे खाजगीकरण करून सरकार भांडवलदारांना फायदा करून देत आहे. तरुण बेरोजगार आहे. डिझेल-पेट्रोलपासून ते विजेचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या सरकारला हटवलेचं पाहिजे.
एवढंच नाही तर, शिवपाल यांनी म्हंटल कि, त्यांचा प्रसपा लोहिया पक्ष युती जरूर करणार. जर त्यांची समाजवादी पक्षाशी युती नाही झाली, तर ते कोणत्याही राष्ट्रीय पक्षासोबत युती करतील.दरम्यान, ते कोणत्या पक्षासोबत युती करतील हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
पण जर पाहिलं तर, शिवपाल यादव यांचा प्रगतीशील समाजवादी पक्ष समाजवादी पार्टीसोबतनाही गेला तर एकतर बसपा सोबत जाईल किंवा काँग्रेस. कारण भाजपशिवाय हेच दोन मोठे पक्ष आहेत. आणि भाजप मध्ये जाण्याचा विषय राहतचं नाही. कारण शिवपाल यांचा पहिल्यापासूनचं भाजप विरोधी अजेंडा राहिलाय.
मेरठ मध्येही पत्रकारांनी त्यांना राष्ट्रीय पक्ष भाजपसोबत युतीविषयी विचारले. तर त्यांनी त्यांच्याशी युतीचा प्रश्न येत नाही, असं म्हणत भाजपचा प्रश्नच टाळला.
आता समाजवादी पार्टीत जायच म्हंटल तर शिवपाल यादव आणि अखिलेश यांची दुष्मनी सगळ्यांनाच माहितेय, अखिलेश यांच्यामुळेच शिवपाल यांनी समाजवादी पक्षातून बाहेर पडत, आपला वेगळा पक्ष तयार केला. तर दुसरीकडे शिवपाल आणि मुलायम सिंह यांचे चांगले संबंध आहेत. पण मुलायम आणि अखिलेश यांचंही पटत नाही.
शिवाय नाही म्हंटल तर शिवपाल यांचं मन अजूनही समाजवादी पक्षातच आहे. ते म्हणतात कि,
“मी समाजवादी पक्षाला उंचीवर नेले आहे. माझ्या प्रयत्नांमुळे नेताजी दोनदा पंतप्रधानपदापर्यंत पोहोचले, पण ते पंतप्रधान होता होता राहिले’.
त्यामुळे शिवपाल यादव यांच्या प्रगतीशील समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र येण्याविषयी अनेक मत – विमत पाहायला मिळत आहेत.
हे ही वाचं भिडू :
- रामजन्मभूमी वादात युपी जिंकायला काँग्रेस आणि आपने बाबांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे?
- काँग्रेसचे अध्यक्ष बदलत राहिले पण तिजोरीच्या चाव्या व्होरांच्या हातातच राहिल्या.
- युपी निवडणूकीच्या तोंडावर बसपा आणि काँग्रेसमुळे अखिलेश यादव अस्वस्थ का आहेत?