मुलायमसिंह यादव आणि डॉ. अब्दुल कलामांच्या दोस्तीमुळं काँग्रेसचं सरकार वाचलं होतं…

मुलायमसिंह यादव हे देशाच्या राजकारणातलं मोठं नाव. केवळ उत्तर प्रदेशचंच राजकारण नाही, तर देशाच्या राजकारणात मुलायमसिंह यादवांनी आपली छाप सोडलीये. अर्थात ग्रामीण भागात मुलायमसिंह यांचं राजकीय वजन जबरदस्त आहे यात शंकाच नाही. त्यांची साधी राहणी आणि बोलण्याचा लहेजा देशात चांगलाच लोकप्रिय आहे.

मुलायमसिंहाचे राजकीय मित्र अनेकदा बदलत राहतात, राजकीय समीकरणं बदलली, तरी मैत्री कायम ठेवण्यात मुलायमसिंह यांचा हातखंडा आहे. म्हणूनच ते कधी कॉंग्रेस नेत्यांसोबत चर्चा करताना दिसतात, तर कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत एकाच खुर्चीवर.

मैत्री जपण्याच्या त्यांच्या या सवयीचा त्यांना राजकीय जीवनात फायदा होतोच. पण मुलायमसिंह यांच्या एका मैत्रीचा मोठा फायदा एकदा कॉंग्रेसला झाला होता.

ती मैत्री होती, भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर वैज्ञानिक एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी. आता एक ग्रामीण आणि शहरी राजकारणात मुरलेला मुरब्बी नेता आणि दुसरा चाणाक्ष वैज्ञानिक. त्यामुळे या दोघांची मैत्री कशी जुळली असा प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे.

मुलायमसिंह आणि डॉ. कलाम यांच्या मैत्रीचे सुर जुळले ते १९९० मध्ये. तेव्हा देशात युनायडेट फ्रंटचं सरकार होतं. त्यावेळी मुलायमसिंह यांच्या खांद्यांवर संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी होती. त्यावेळी सरकारी सेवेत असणाऱ्या सर्वांत ज्येष्ठ संशोधक डॉ. कलाम यांच्यासोबत मुलायमसिंह यांनी भरपूर काम केलं. त्यानंतर आणखी एका घटनेनं या दोघांची मैत्री अधोरेखित केली. २००२ मध्ये झालेल्या गुजरात दंगलीमुळे देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं. अशातच सत्ताधारी एनडीए नव्या राष्ट्रपतींच्या शोधात होता. तेव्हा मुलायमसिंह यांनी, मुस्लिम राष्ट्रपतींची नियुक्ती केली, तर गोध्रात घडलेल्या घटनांवर तो अमोघ उपाय ठरेल… असा प्रस्ताव एनडीएमधल्या ज्येष्ठ नेत्यांसमोर ठेवला. साहजिकच अब्दुल कलाम यांची या महत्त्वाच्या पदावर नेमणुक झाली.

या दोघांच्या मैत्रीचा फायदा कॉंग्रेसला झाला तो २००८ मध्ये.

२००४ च्या निवडणुकांनंतर देशात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीएचं सरकार स्थापन झालं. स्पष्ट बहुमत नसल्यानं कॉंग्रेसचं सरकार डाव्या पक्षांनी बाहेरुन दिलेल्या पाठिंब्यावर टिकलं होतं. २००८ मध्ये भारत आणि अमेरिकेत अणुकरार होणार होता. त्याच्या विरोधात असणाऱ्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियानं (मार्क्सिस्ट) सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यामुळं मनमोहन सिंग सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जावं लागलं.

यावेळी मुलायमसिंह यांच्या समाजवादी पक्षानं डाव्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळं काँग्रेस हरेल असं चित्र तयार झालं होतं. त्यातच समाजवादी पक्षाचं संख्याबळ चांगलं असल्यानं, त्यांच्या भूमिकेला जबरदस्त महत्त्व प्राप्त झालं होतं. पण याआधी झालेल्या राजकीय घटना पाहता, समाजवादी पक्ष काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत बरीच साशंकता होती.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अमरसिंग व मुलायमसिंह यांच्याशी चर्चा करणं सुरू ठेवलं. त्यांनी जुन्या घटना विसरून नवी सुरुवात करण्याचा आग्रह केला. पण तरीही मुलायमसिंह यांचं मन वळत नव्हतं. तेव्हा मनमोहनसिंग यांना आठवलं की, मुलायमसिंह आणि डॉ. कलाम यांची जुनी मैत्री आहे. त्यामुळे त्यांनी मुलायमसिंह यांना कलामांची भेट घेण्याचा सल्ला दिला. ‘अणुकरारामुळे देशाचे किती आणि कोणते फायदे होणार आहेत, हे तुम्ही डॉक्टर कलामांकडूनच जाणून घ्या,’ असं त्यांनी सांगितलं.

या विषयात तज्ञ असणाऱ्या कलामांनी या जोडीची शाळा घेतली आणि त्यांना अणूकराराचं महत्त्व पटवून दिलं. कलामांच्या निवासस्थानीच त्यांनी आपली भूमिका ठरवली आणि विश्वासदर्शक ठरावात काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळंच मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातलं सरकार तरलं आणि अणूकरारही झाला.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.