मुलायमसिंग यादवांनी पाकिस्तानला दोन हजार कोटींची नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती

घटना क्रमांक एक – साल होतं, १९७४. तारीख १८ मे. ठिकाण- पोखरण. त्या दिवशी सगळ्या जगात एकाच वाक्याची चर्चा होती, ते वाक्य म्हणजे ‘…आणि बुद्ध हसला.’ भारतानं पहिलीवाहिली अणुचाचणी करत आपल्या पराक्रमाचा झेंडा जगासमोर उंचावला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या या मोहिमेनं भारतानं आपला ठसा उमटवला होता.

घटना क्रमांक दोन- साल होतं, १९९८. तारीख ११ मे. ठिकाण- पोखरण. तोही दिवस बुद्धपौर्णिमेचा होता. देशाचे पंतप्रधान होते अटलबिहारी वाजपेयी. अमेरिकेच्या सॅटेलाईटची करडी नजर चुकवून कित्येक रात्री केलेल्या कामाला अखेर यश आलं होतं. ‘ऑपरेशन शक्ती’ या भारताच्या मोहिमेला यश आलं आणि पोखरण येथे तीन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पत्रकार परिषद घेत सगळ्या देशाला ही बातमी दिली.

पुढे दोनच दिवसांनी भारतानं पोखरणमध्येच आणखी दोन अणुबॉम्बची चाचणी केली. भारत अण्वस्त्रसज्ज झाला आहे, हा संदेश सगळ्या जगात पोहोचला. हादरलेल्या अमेरिकेने भारतावर अनेक निर्बंध घालायचं ठरवलं. चीनच्या साथीने त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये तसा ठरावही मंजूर केला होता.

भारताच्या या अणुचाचणीमुळं हादरलेले चीन आणि अमेरिका हे दोनच देश नव्हते. तर पाकिस्तानच्या नाकालाही मिरच्या झोंबल्या होत्या.

भारतानं केलंय म्हणून आपणही करायचं म्हणून पाकिस्ताननं अणूचाचणी करायचं ठरवलं. तेही भारताच्या अणूचाचण्या झाल्यावर, पंधरा दिवसांनी. पाकिस्ताननं २८ मे १९९८ रोजी चगाईमध्ये अणुचाचणी केली. आता त्या चाचणीमुळं कुठल्या देशाला किती फरक पडला ते माहीत नाही, पण पाकिस्तानला खर्च मात्र मजबूत आला.

आता तुम्ही म्हणाल, हेडिंगमध्ये मुलायम सिंग आणि आतमध्ये अणुचाचणीचं काय सांगतोय? पण कसंय कनेक्शन जुळतंय आणि तेही लय खतरनाक.

अणुचाचणीनंतर राज्यांच्या इलेक्शनचा माहोल सुरू झाला. सगळ्यांच्या प्रचारात वेगवेगळे मुद्दे होते. देशाचे माजी संरक्षणमंत्री मुलायमसिंग यादव प्रचारसभेत बोलत होते. स्टेजवर लालूप्रसाद यादवही होते. त्या सभेतलं मुलायमसिंग यादव यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं.

ते म्हणाले, “भारतानं पोखरणमध्ये अणुचाचण्या केल्यानंतर, पाकिस्तानला जबरदस्ती चाचण्या घ्याव्या लागल्या. यामुळं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आणि अर्थव्यवस्थाही कोसळली. त्यामुळं भारतानं पाकिस्तानची मदत करायला हवी आणि नुकसानभरपाई म्हणून पाकिस्तानला दोन हजार कोटी रुपये द्यावेत.”

मुलायमसिंग यादवांचं हे वक्तव्य ऐकून देशातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं. विरोधकांनी मुलायमसिंग यादवांचा खरपूस समाचार घेतला.

यात आघाडीवर होते, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. त्यांनी शिवसेनेच्या सामना या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत, ‘मुलायमसिंग यादव यांच्या मागण्या प्रक्षोभक आणि अपमानकारक आहेत. अशी मागणी करणं हे देशद्रोही आहे. अशाच मागण्या सुरू राहिल्या, तर देशात दुसरी फाळणी होईल,’ अशी टीका केली.

जवळपास सगळ्याच विरोधकांचे टीकांचे बाण मुलायम यांना झेलावे लागले. मुस्लिम मतं आकर्षित करण्यासाठी, त्यांनी हे वक्तव्य केल्याचंही विरोधक म्हणाले. भारतानं पाकिस्तानला मदत तर केली नाहीच, पण मुलायम यांचं वक्तव्य सगळ्यांच्या चांगलंच लक्षात राहिलं.

हे ही वाच भिडू:

 

English Summary: Mr. Yadav had said at the rally, which was also addressed by the Rashtriya Janata Dal (RJD) chief, Mr. Laloo Prasad Yadav, that Pakistan was forced to conduct nuclear explosions following India’s Pokhran tests, and consequently its economy had collapsed. India should, therefore, give a financial aid of Rs 2000 crore to Pakistan to tide over its economic crisis, the SP supremo had said.

 

Web title: Mulayam Singh Yadav said to give Financial aid of 2000 crore to pakistan

Leave A Reply

Your email address will not be published.