सासऱ्याने कारसेवकांवर गोळीबार केला, आता सुनेनं राममंदिराला ११ लाखांची देणगी दिली आहे.

आयोध्येच्या इतिहासात स्वातंत्र्यानंतर १९९२ पर्यंतचे ३ महत्वाचे टप्पे सांगितले जातात. पहिला तर जेव्हा १९४९ साली वादग्रस्त जागेवर मूर्ती ठेवली, दुसरा टप्पा म्हणजे १९८६ साली वादग्रस्त जागेच कुलूप काढलं गेलं, आणि तिसरा म्हणजे १९९२ ला बाबरी मस्जिद पडली जाणं. त्यानंतर घडलेल्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत.

पण या दरम्यान आणखी एक महत्वाची गोष्ट घडली होती, त्याची माहिती आपल्याला असायलाच हवी. 

वादग्रस्त जागेच कुलूप काढल्यानंतर आंदोलनाने आणखी जोर पकडला होता. याच दरम्यान तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पाठिंब्याने मंदिराचे भूमिपूजन पार पडले. हे भूमिपूजन निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी केलं असल्याचे आरोप त्यावेळी झाले, पण राजीव गांधी यांना निवडणुकीत त्याचा फायदा झाला नाही.

याच राम मंदिर मुद्दयाला धरून २ वरून ८५ पर्यंत पोहचलेला भाजप पक्ष आणि तत्कालीन अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी यांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर उचलून धरलं. आडवाणी यांनी या मुद्द्यावर रथयात्रेला देखील सुरुवात केली. मंदिर आता अगदी अधिकृत रित्या निवडणूक आणि राजकारणाचा मुद्दा झाला होता.

दुसऱ्या बाजूला संत देखील हे आंदोलन सोडू इच्छित नव्हते. त्यांनी अयोध्येत कारसेवेसाठी ३० ऑक्टोबर १९९० तारीख अंतिम केली. 

इकडे १९८९ मध्ये जनता पक्षाचं सरकार भाजपच्या मदतीनं बनलं होतं, पण दुसऱ्या बाजूला जनता पक्ष आणि पक्षातील २ मोठे नेते असलेलं आणि सोबतच उत्तर प्रदेश – बिहार या राज्यांमध्ये सत्तेत असलेले लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादव हे भाजपच्या या रथयात्रामुळे प्रचंड नाराज होते. त्यांनी या रथयात्रेविरोधात उघड नाराजी बोलून दाखवायला सुरुवात केली.

देशात आणि राज्यात आपलं सरकार असताना आपल्या काळात देशात अशा प्रकारचं राजकारण लालू प्रसाद यादव आणि मुलायमसिंग यादव यांना मान्य होणार नव्हतं.

अखेरीस राम मंदिर आंदोलनात होतं असलेलं ध्रुवीकरण पाहून दोन्ही नेते आपल्या निर्णयापर्यंत येऊ पोहचले. लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये रथयात्रा थांबवून लालकृष्ण अडवाणींना अटक केली. 

त्याचवेळी उत्तरप्रदेचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी कारसेवकांना इशारा देताना म्हणाले, त्यांना अयोध्येमध्ये येउ तर दे, कायदा आणि सुव्यवस्था काय असते हे दाखवून देऊ. वादग्रस्त जागेवर ‘पंरिदा भी पर नहीं मार सकेगा’. 

तिकडे ३० ऑक्टोबर १९९० रोजी लाखोंच्या संख्येनं कारसेवक अयोध्येत पोहचले. पोलिसांनी १.५ किलोमीटर अलीकडेच बॅरिकेट्स लावले. अयोध्येला लष्करी छावणीचे स्वरूप आले. कर्फ्यू जाहीर झाला. मात्र तारिही कारसेवक ठाम होते.

दुपारपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून कारसेवकांना थांबवण्यासाठी मुख्यमंत्री मुलायमसिंग यांनी स्वतः पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले. यात अनेक जण मारले गेले असल्याचं  सांगण्यात येतं, मात्र सरकारी नोंदीनुसार १७ जण मारले गेले होते. 

बाबरी मस्जिदच्या वर भगवा झेंडा घेऊन उभे असलेले कोलकात्याच्या राम कोठारी आणि शरद कोठारी हे दोघे भाऊ देखील या गोळीबारात मारले गेले. या सगळ्या दंग्यांनंतर २ नोव्हेंबर रोजी कारसेवकांनी कारसेवा थांबवत असल्याचं जाहीर केलं.

कट टू २० फेब्रुवारी २०२१. 

आज सकाळी मुलायम सिंग यादव यांची सून अपर्णा यादव यांनी राम मंदिरासाठी ११ लाख रुपयांची देणगी दिली. यावेळी त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या,

‘राम हा देशाचं चरित्र, संस्कार आणि सर्व प्रकारच्या आस्थेचं केंद्र आहे. हे देशाचं मंदिर आहे. प्रत्येकानं या मंदिरासाठी दान द्यायला हवं, मी देखील याच भावनेतून दान दिले आहे.’

त्या सोबतच त्यांनी गोळीबावर देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. यापूर्वी जे झालं, ते ज्या परिस्थितीमध्ये झाले ते अत्यंत दु:खद होते. मला त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. मात्र ते आता घडून गेलं आहे. जे आज बदललं जाऊ शकत नाही. आपण आजचा विचार केला पाहिजे. आज आम्ही या पैशांचं समर्पण केलं आहे. येणारी पिढी देखील रामाची अनुयायी म्हणून काम करेल.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.