३३ वर्षे काश्मीरमध्ये थिएटर्स बंद होते ; पण आता परत फर्स्ट डे-फर्स्ट शो चालू होणार आहे

विकेंडला अनेकांचा एक प्लॅन ठरलेलाच असतो. तो म्हणजे थेटरात नवीन फिल्म बघायला जायचं म्हणजे जायचं. मूव्ही ब्लॉकबस्टर असली की अख्खा हॉल पेक्षकांनी गच्च भरलेला असतो. त्यातही मुव्हीच्या हिट डायलॉगवर लोकांचा आवाज ठरलेलाच असतो. या आवाजामध्ये अगदी कोपऱ्याच्या सीटवर बसलेले जोडपे सुद्धा सामील होतात.

सामान्यपणे कोणत्याही सिनेमा हॉल मध्ये असंच चित्र दिसतं पण जम्मू काश्मिरात हे चित्र आता परतणार आहे.

जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी आज श्रीनगरच्या बदामी बाग छावणीजवळ बांधलेल्या मल्टिप्लेक्सचं उदघाटन केलंय. या मल्टिप्लेक्समध्ये ५२० सिट्सचे तीन मूव्ही हॉल असून पहिल्या शोची सुरुवात करतांना अमीर खानची लाल सिंग चढ्ढा फिल्मी दाखवण्यात आलीय. आजच्या या शोमुळे काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सिनेमा बघायला मिळणार आहे. 

आयएनओएक्स ने बांधलेल्या या मल्टिफ्लेक्सचे मालक काश्मिरी पंडित विकास धर यांनी यांनी माध्यमांशी बोलतांना आनंद व्यक्त केला. 

ते म्हणाले की, “हे आमच्यासाठी एक मोठं स्वप्न होतं आणि ते आता पूर्ण होत आहे. तसेच लवकरच मल्टीफ्लेक्सचं काम पूर्ण करून ३० सप्टेंबरपासून रेग्युलर शो चालू होणार आहेत.”

त्यामुळे या मल्टीफ्लेक्स पासून बाकी सिनेमाहॉल्समध्ये परत एकदा फर्स्ट डे, फर्स्ट शो लागतील याचा आनंद काश्मिरातील लोकांना होत आहे. 

काश्मीरची सुंदर घाटी आपल्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेली आहे पण आधुनिक विचारांनी सुद्धा नटलेली होती. भारत पाकिस्तानची फाळणी होतांना पंजाब जळत होता पण काश्मीरमध्ये शांतता होती. पण १९८९ मध्ये काश्मिरात दहशतवादी कारवाया सुरु झाल्या. त्यातच एअर मार्शल नूर खान याने सुरु केलेल्या अल्लाह टायगर्स या आतंकवादी गटाने काश्मिरात थेअटरला विरोध सुरु केला. 

यासाठी त्यांनी इराणच्या इस्लामी क्रांतीतून “ला शारकेया वाला गरबेया, इस्लामिया.. इस्लामिया..” ही घोषणा घेतली. याचा अर्थ होतो ‘ना ईस्ट बेस्ट आहे ना वेस्ट बेस्ट आहे फक्त इस्लाम बेस्ट आहे.’ या घोषणेमधून ते सिनेमाला गैरइस्लामी आणि इस्लाम विरोधी ठरवत होते. 

त्यांनी स्थानिक वृत्तपत्रातून थिएटर आणि बारवर बंदी घालण्याची धमकी द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्या या धमक्यांना हलक्यावर घेण्यात आलं. मात्र अवघ्या ३-४ महिन्यातच या धमक्यांचा परिणाम दिसून आला. लवकरच त्यांनी काही थिएटर्सना आग लावली. या आगीच्या घटनांमुळे थिएटर मालक घाबरले आणि त्यांनी स्वतःचं नुकसान टाळण्याचा निर्णय घेतला.

अखेर ३१ डिसेंबर १९८९ रोजी काश्मिरातील सगळे सिनेमा हॉल बंद करण्यात आले.

या निर्णयामुळे स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेल्या काश्मिरातल्या सिनेमा थिएटर्सचा काळ इतिहासात जमा झाला. १९३२ मध्ये भाई अनंत सिंग गौरी यांनी श्रीनगरच्या लाल चौकात काश्मिरातील पहिलं थिएटर उभारलं होतं. या थिएटरचं नाव राज्याच्या नावावरूनच काश्मीर टॉकीज ठेवण्यात आलं. पण नंतर त्याचं नाव बदलून पॅलेडियम ठेवण्यात आलं.

जसजसा काळ बदलत गेला त्याचप्रमाणे थिएटर्सची संख्या वाढत होती. मात्र प्रेक्षकवर्ग हा श्रीनगरात केंद्रित असल्यामुळे सगळ्यात जास्त थिएटर तिथेच होते. १९८०च्या दशकात श्रीनगरमध्ये ९ आणि बाकी शहरांमध्ये ६ असे एकूण १५ थिएटर्स काश्मिरात होते. यात  ब्रॉडवे, रीगल, नीलम, नाझ, खयाम आणि शेराझ या थिएटर्सचं नाव प्रसिद्ध होतं. 

पण १९८९ मध्ये यातील काही जाळण्यात आले, काही बंद झाले तर काश्मीर टॉकीजमध्ये सीआरपीएफची चौकी उभारण्यात आली. 

शोले, मुघल ए आझम यांसारखे मोठं मोठे सिनेमे चालवणारे हे थिएटर्स वर्षानुवर्षे बंद त्यांना काटेरी तारांनी बंदिस्त करून ठेवण्यात आलंय. त्यातील काही इमारती या कोसळण्याच्या मार्गावर पोहोचल्यात. 

पण दहशतवादी कारवाया काही प्रमाणात आटोक्यात आल्यानंतर जम्मू काश्मीर सरकारने थिएटर्स सुरु करण्याचा निर्णय घेतला.

१९९९ मध्ये जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रीगल, नीलम आणि ब्रॉडवे या तीन थिएटर्समध्ये फिल्म्स दाखवण्याची परवानगी दिली आणि त्यांना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. मात्र रीगल मध्ये पहिला शो चालू असतांनाच आतंकवादी हल्ला झाला.

त्यात एक जण ठार झाला आणि १२ जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा थिएटर्स बंद करण्यात आले.

त्यानंतर २०१७ मध्ये सौदी अरेबियाने थिएटर्सवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काश्मिरातील थिएटर्सवरील बंदी सुद्धा उठण्यात येणार आहे असं मेहबुबा मुफ्ती यांनी यांनी म्हटलं. मात्र आतंकवाद्यांनी या निर्णयाला सुद्धा विरोध केला. 

परंतु सरकारने या विरोधाला न जुमानता २०१८ मध्ये श्रीनगरच्या कॅन्टोमेंट भागात एक मल्टिप्लेक्स बांधण्यास परवानगी दिली. पण बिल्डरने त्याचं काम वेळेत पूर्ण केलं नाही त्यामुळे परवानगीची मुदत संपली आणि थिएटरचा मुद्दा पुन्हा एकदा बारगळला. पण आता श्रीनगरमध्ये आयएनओएक्सच्या मदतीने विकास धार यांनी मल्टिप्लेक्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी हालचाली सुरु झाल्या. 

पण आता एक प्रश्न पडतो की, काश्मिरात थिएटर्स नव्हते मग लोकं सिनेमा बघण्यासाठी कुठे जायचे?

तर त्याचं उत्तर आहे की १९८९ ते २०२२ या काळात एक अख्खी पिढी सिनेमा न बघताच मोठी झालीय. आयुष्याच्या महत्वाच्या काळात त्यांना सिनेमा बघायला मिळाला नाही. त्यातील काहीच लोकांनी भारताच्या इतर भागात येऊन सिनेमे पाहिलेत.

अलीकडच्या काळात जेव्हा डीव्हीडी, पेन ड्राइव्ह आणि इंटरनेटचा प्रसार झाला तेव्हा त्याच्या माध्यमातून काहींनी फिल्म्स पाहिल्या. मात्र यामुळे फार थोड्या लोकांना फिल्म्सचा आनंद घेता आला. २०१५ मध्ये काश्मिर जागतिक चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे जगातील प्रोड्युसर्सनी यात भाग घ्यायाला सुरुवात केली.

ऑक्टोबर २०२१ मध्ये पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काश्मीरच्या प्रसिद्ध दल सरोवरात एक ओपन-एअर फ्लोटिंग थिएटर सुरु करण्यात आलं. तर यावर्षी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने १५ जून ते २० जून दरम्यान श्रीनगरमध्ये पहिला राष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला होता.

या छोट्या छोट्या पडद्यांमुळे लोकांना फिल्स बघता येत होत्या मात्र थिएटरमध्ये जो आनंद असतो तो घेता येत नव्हता. त्यामुळे श्रीनगरात सुरु झालेल्या मल्टिफ्लेक्सच्या  माध्यमातून आता परत काश्मिरात फर्स्ट डे फर्स्ट शो सुरु होईल.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.