खरंच अदानींनी मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवलं आहे का?
आज सकाळपासून माध्यमांमध्ये एक बातमी चांगलीच चर्चेत आहे. ती माहिती म्हणजे
उद्योगपती गौतम अदानी यांनी मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं.
जवळपास सगळ्याच माध्यमांच्या या बातमीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या पक्षांनी यावर अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिली आहे. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुजरात्यांचा मुंबईवर डोळा असल्याचा आरोप केला आहे. तसंच अदानींविरुद्ध राज्यभर आंदोलनाचा इशाराही देखील त्यांनी दिला आहे.
तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात, “मुंबई विमानतळाचे मुख्यालय मुंबईतून अहमदाबादला हलवणे हा मोदींचा महाराष्ट्राच्या जनतेला संदेश आहे. विमानतळावर झालेलं दांडीया नृत्य बरंच काही सांगून जातं. मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी मागच्या ७ वर्षांत जे प्रयत्न झाले, त्याचा हा एक भाग आहे.
तर शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की ही अत्यंत निषेधार्ह बाब असून मुंबईचे अहमदाबाद करण्याचा हा डाव आहे, विमानतळाचे मुख्यालय मुंबईतच राहील, त्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल.
मात्र खरंच मुंबई विमानतळाच मुख्यालय अहमदाबादला हलवलं आहे का?
तर नाही. अदानी यांनी मुंबई विमानतळ आणि त्याचं मुख्यालय यांच्याबाबत कुठेही बदल केलेला नाही. हे दोन्ही देखील मुंबईमध्येच आहे. विमानतळाचे खाजगीकरण झाले असले तरी त्याला शिफ्ट करण्याचे किंवा नावाबाबतचे अधिकार केंद्र सरकारकडे राखीव आहेत.
गौतम अदानी यांनी केवळ त्यांच्या अदानी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीचं मुख्यालय अहमदाबादला हलवलं आहे.
अदानी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड कंपनीची सुरुवात झाल्यानंतर या कंपनीचे मुख्यालय मुंबईमध्ये होते. याच कंपनी अंतर्गत अदानी यांनी २०१९ मध्येच अहमदाबाद, जयपूर, गुवाहाटी, तिरुवनंतपूरम आणि मंगळूर या ६ विमानतळांचा ताबा घेतला होता.
त्यानंतर अलीकडेच एआयएचएलने मुंबई आणि नव्यानं येऊ घातलेल्या नवी मुंबई विमानतळाचा देखील ताबा ५० वर्षासाठी आपल्याकडे घेतला आहे.
मुंबई विमानतळात अदानी समूहाची ७४ टक्के भागीदारी
मुंबई विमानतळाची भागीदारी याआधी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड अर्थात मिआल या कंपनीकडे होती. याच कंपनीत जीव्हीके समुहाची ५०.५० टक्के भागीदारी, बिडवेस्ट कंपनीची १३.५० टक्के आणि ‘एअरपोर्ट कंपनी ऑफ साऊथ आफ्रिका’यांची १० टक्के भागीदारी होती.
त्यानुसार फेब्रुवारी २०२१ मध्ये अदानी समुहाने यातील २३.५० टक्के हिस्सा १ हजार ६८५ कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर आता जीव्हीके समुहाकडील ५०.५० टक्के हिस्सा देखील अदानी यांनी ताब्यात घेतला आहे. त्यामुळे अदानी समूह मुंबई विमानतळामधील पुढच्या ५० वर्षासाठीचा एकूण ७४ टक्क्यांचा भागीदार बनला आहे.
तर उर्वरित २६ टक्के हिस्सा अजूनही भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे.
मात्र मुंबईचे विमानतळ खरेदी होईपर्यंत एएएचएलचे मुख्यालय मुंबईत होते. पण खरेदी प्रक्रिया होऊन व्यवस्थापन हाती येताच मुंबईतील मुख्यालय अहमदाबादला हलवले आहे. त्यामुळे विमानतळ महाराष्ट्रातील मुंबईत तर त्याचे मुख्यालय हे गुजरातमधील अहमदाबादमध्ये असं काहीसं चित्र निर्माण झालं आहे.
नितीन सरदेसाई यांनी देखील स्पष्ट केलं आहे की, फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलं आहे. विमानतळ मुंबईमध्येच आहे. त्यामुळे आम्हाला डिवचण्यासाठी ‘गरबा’ कराल तर आम्हालाही आमचा ‘झिंगाट’ दाखवावा लागेल.
फक्त व्यवस्थापन अदानींकडे गेलय …
विमानतळ मुंबईमध्येच आहे ….
आम्हाला डीवचण्यासाठी 'गरबा' कराल तर आम्हालाही आमचा 'झिंगाट' दाखवावा लागेल…— Nitin Sardesai (@1nitinsardesai) July 20, 2021
याबाबत गौतम अदानी यांनी काय स्पष्टीकरण दिलं आहे?
अदानी यांनी हे मुख्यालय अहमदाबादला हलवण्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देखील दिली आहे. ते म्हणाले,
अदानी ग्रुप एअरपोर्ट सेक्टरमध्ये गतीने पुढे जात आहे. अशात अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडने आपलं मुख्य कार्यालय मुंबईतून गुजरातमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या कामकाजात सुसूत्रता यावी, ते सुलभ व्हावं यासाठी कंपनीचे मुख्यालय हे मुंबईतून अहमदाबादला शिफ्ट करण्यात येत आहे.
थोडक्यात अदानींच्या कंपनीचे मुख्यालय अहमदाबादला हलवण्यात आलं आहे. विमानतळ आणि त्याचे मुख्यालय हे मुंबईमध्येचं असणार आहे. मात्र यामुळे मुंबईतून गुजरातकडे जाणाऱ्या मोठ्या उद्योगात, आणि मोठ्या कंपनीच्या नावात आणखी एका कंपनीची भर पडली आहे हे मात्र नक्की.
हे हि वाच भिडू.
- गौतम अदानींचा १ लाख कोटींचा बाजार उठणारा NSDL नावाचा मॅटर काय आहे?
- नितीआयोग आणि अर्थमंत्रालयाच्या आक्षेपानंतर देखील ६ विमानतळं अदानी समुहाकडे गेलेत
- अंबानी – अदानी यांची ही १२ उत्पादने आपण रोज वापरतोय…