एकेकाळी बैलगाड्यांच शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईला ‘बेस्ट’ने वेगवान बनवलं.

मुंबई म्हणजे धावत शहर. प्रत्येकक्षणाला कोणाला कुठे ना कुठे पोहचायची घाई असते. या वेगवान शहरात लोकांना आपल्या इच्छित ठिकाणी नेणारी वाहतूक व्यवस्था सुद्धा तितकीच वेगवान व तत्पर हवी. आज मेट्रोसारखा अत्याधुनिक पर्याय उपलब्ध होत आहे. पण गेली अनेक वर्षे मुंबईचा भार लोकल आणि बेस्टने उचललाय.

तो काळ जेव्हा मुंबई ब्रिटीशांची बॉम्बे होती.

मुंबई हे बंदर सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे हे ब्रिटीशांनी खूप आधीच ओळखल होतं. इंग्लंड व युरोपला भारतातून पाठवला जाणारा बराच माल याच बंदरातून निघायचा.इथे अनेक उद्योगधंदे उभे राहत होते. रोजगाराची संधी शोधत हजारो लोक तेव्हाही मुंबईची वाट धरत होते.

पोर्तुगीजांकडून आंदण मिळालेलं हे छोटसं गाव आता महानगर बनत होत.

कोणे एकेकाळी मुंबईत बैलगाड्या फिरत, ब्रिटीश लोक घोड्यावरून किंवा बग्गीतून संचार करत. पण सर्वसामान्यांना पायीच फिरावे लागे. इथे राहणाऱ्या लाखो लोकांच्या वाहतुकीची सोय व्हावी यासाठी ब्रिटीशांवर स्थानिक पुढाऱ्यांनी दबाव आणण्यास सुरुवात केली.

जगन्नाथ शंकरशेठ यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईत एप्रिल १८५३ साली पहिली रेल्वे धावली.

या रेल्वेमुळे सर्वसामान्यांच जगण थोडं सुसह्य झाल. मुंबईची लोकसंख्या भरमसाठ वाढतच होती. अखेर १८७४ साली मुंबईत ट्राम सुरु झाली. ही ट्राम रस्त्यावरून धावायची मात्र त्यालाही रूळ असत.

गंमत म्हणजे ही ट्राम सुद्धा घोड्यांनी ओढावी लागे. स्टर्नस अँड किट्रेज नावाची कंपनी या ट्राम्स कंत्राटी पद्धतीने चालवायची. त्यांच्याकडे ट्राम्स ओढण्यासाठी जवळपास ९०० घोडे होते. १८७४ ते १८९७ ही २३ वर्षे मुंबईच्या रस्त्यावरून बैलगाडी व घोड्यांची ट्राम चालली.

horse tram

सुरवातीला जशी रेल्वेबद्दल लोकांच्यात भीती होती तसेच काहीस ट्राम बद्दल देखील होत. लोकांनी ट्रामने फिरावं ते सुरक्षित आहे, सोयीचं आहे हे समजावून सांगावं लागलं, तश्या जाहिराती करून प्रचार करावा लागला. त्याकाळी ट्रामच तिकीट १० पैसे होत.

हळूहळू लोक ट्राममध्ये गर्दी करू लागले.

१९०४ साली इंग्लंडची एक कंपनी मुंबईत वीजपुरवठा करण्यासाठी पुढे सरसावली. त्या कंपनीच नाव बॉम्बे इलेक्ट्रिक ट्रॅक्शन कंपनी(इंग्लंड). या कंपनीला १९०५ साली वीजपुरवठ्याचा परवाना मिळाला. मात्र त्यासाठी ट्रामची सेवा देणारी बॉम्बे ट्रामवेज कंपनी आणि वीजपुरवठा करणारी  बॉम्बे इलेक्ट्रिक ट्रॅक्शन कंपनी एकत्र येऊन नव्या कंपनीची स्थापना झाली.

तीच नाव बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रामवेज कंपनी उर्फ “बेस्ट”

कंपनीच्या आद्याक्षरावरून बेस्ट हाच शब्द लोकांच्या तोंडी बसला. वीजपुरवठा करणारी व ट्राम चालवणारी कंपनी एकच असल्यामुळे व्यवहार सुलभ झाला. १९०७ पासून घोडागाडीची ट्राम बंद होऊन इलेक्ट्रिक ट्राम सुरु झाली. तोर्यंत मुंबईत फक्त बैलगाड्या, घोडागाड्या आणि ट्राम एवढीच वाहतूक व्यवस्था होती.

ब्रिटीश अधिकारी मुंबईला गंमतीने बैलगाड्यांचे शहर म्हणायचे.

विसाव्या शतकाच्या सुरवातीला मुंबईत देखील मोटार गाड्यांच आगमन झालं. पण इंग्रज अधिकारी व टाटांसारखे उच्चभ्रू भारतीय यांच्या कडेच या गाड्या दिसायच्या. इंग्लंडमधून मागवावे लागत असल्यामुळे कोणालाही ही गाडी घेणे परवडत नव्हतं.

पण १९११ साली मुंबईत टॅक्सी सुरु झाली.

पण टॅक्सीप्रवास देखील प्रचंड महागडा होता. ट्राम आणि रेल्वेची विशिष्ट लाईन सोडली तर इतरत्र प्रवासासासाठी टॅक्सीच उपयोगी पडत होती. म्हणून किती खर्चिक असूनही लोकांना टॅक्सीचा वापर करावा लागत होता.

१९१३ साली ट्राम वाहतुकीच्या पाहणीत रिमिंग्टन या अधिकाऱ्याने मुंबईत ट्राॅली बस आणायची सूचना केली होती. पण १९२६ पर्यंत याबाबत काहीही हालचाल झाली नाही. अखेर डारडिंपल नावाच्या साहेबाने मात्र जोर लावल्यामुळे मुंबईत ट्राॅली बस आणावी की मोटारबस यावर पुन्हा एकदा चर्चा झडली.

शेवटी पहिली बस १५ जुलै १९२६ या दिवशी अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केट या मार्गावर मुंबईमध्ये पहिली मोटारबस धावली. 

हे अंतर पार करायला बसला फक्त १० मिनिटे लागत. प्रायोगिक तत्वावर या बसची सुरवात केली होती. मुंबईकरांनी या बसच जोरदार स्वागत केलं. पण टॅक्सीवाल्यांनी बेस्टच्या या बसला कडाडून विरोध केला. तेव्हा ब्रिटीशांनी हा विरोध दडपून टाकला.

दादर टीटीपासून पारशी काँलनीतून किंग्ज सर्कलपर्यंत, आँपेरा हाऊसपासून लँमिंग्टन रोडपर्यंत असे त्या मोटारबसचे काही मार्ग होते. मोटारबस सुरु झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये ती लवकरच लोकप्रिय झाली.

पण तेव्हा बेस्टची बससेवा उच्च मध्यमवर्गीयांसाठीच आहे असे मानले जाई.  कारण ट्राम हेच प्रवासाचे स्वस्त साधन होते. ट्रामच तिकीट १५ पैसे तर बसच तिकीट २५ पैसे होत.

म्हणून मुंबईने बससेवा पूर्णपणे आत्मसात करायला वेळ लागला. ३१ डिसेंबर १९२६पर्यंत बाँम्बे इलेक्ट्रिकल सप्लाय अँड ट्रॅम कंपनीकडे २४ बसगाड्या झाल्या होत्या. १९२७ सालपर्यंत मुंबईत ४९ लाख प्रवाशांनी या बससेवेचा फायदा घेतलेला होता. हळूहळू बेस्ट हाच सर्वात सोपा आणि किफायतीशीर मार्ग आहे हे लोकांच्या लक्षात आले. बेस्ट बसेस फेमस होऊ लागल्या.

वाढत्या प्रवाशांचा भार उचलण्यासाठी बेस्टने १९३७ साली डबल डेकर बस आणली. 

DOUBLE DECKER BUS

पुढे १९४७ साली भारत स्वतंत्र झाला आणि ब्रिटीश कंपन्यांची भारतातील सद्दी संपली. मुंबई महापालिकेने त्याच वर्षी बेस्ट सुद्धा विकत घेतली. याच काळात उपनगरात इतर खाजगी बसगाड्या देखील वाहतूक सेवा देत होत्या. एकीकडे बेस्ट वाढत होती इतर  खाजगी कंत्राटदार कातावत होते.

१९५५ साली बेस्टने बांद्रा बस कंपनी विकत घेऊन तिथेदेखील सुविधा देण्यास सुरवात केली. अखेर खाजगी कंपन्या व खाजगी बस कंपन्या यांचा वाद पेटला, तो पार सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचला. पण सर्वोच्च न्यायालयाने बेस्टच्या बाजूने निर्णय दिला आणि खाजगी बस गाड्या मुंबईतून कायमच्या हद्दपार झाल्या.

३१ मे १९६४ रोजी बेस्टने ट्राम बंद केली. हळूहळू तिचे रूळ सुद्धा इतिहासजमा झाले. मुंबईच्या रस्तांवर लाल बेस्टचंच राज्य उरलं.

आज बेस्टची सेवा पार मुंबईपलीकडे नेरूळ, बेलापूर पनवेल पर्यंत पोहचली आहे.१९८६ पर्यंत तिची तिकिटे इंग्रजीत असायची ती मराठी करण्यात आली. बॉम्बे हे नाव जाऊन तिथे बृहन्मुंबई हे नाव करण्यात आले.एकेकाळी ब्रिटीशांचा रॉयल छाप खोडून काढून तिला संपूर्णपणे मराठी बनवण्यात आलं आहे.

जगातल्या सर्वात मोठ्या शहरी परिवहनसेवेत बेस्टचा समावेश होतो. आजही तिच्या वेळेची, शिस्तीची उदाहरणे देशभरात दिली जातात. तिच्या नंबरवरून अस्सल मुंबईकर तीच ठिकाण ओळखतो. कोरोनामुळे तिचा अखंड स्पीड थोडा कमी झालाय पण हे संकट गेलं तर मुंबईच स्पिरीट तिला पुन्हा वेगाने धावायला भाग पाडेल हे नक्की.

संदर्भ- मुंबई ब्रिटीशांची होती तेव्हा.. लेखक माधव शिरवळकर

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.