सोशल मीडियामुळं करियर घडू शकतं याचं उदाहरण म्हणजे हा कॅरम किंग….

सोशल मीडियावर लोकं मी दिवसभर काय करणार आहे पासून ते काय काय केलं याचं जागरण मांडत असतात. त्यात आधी फेसबुक होतं, इन्स्टाग्राम होतं पण काही दिवसांपूर्वी टिकटॉक आलेलं आणि या टिकटॉकमुळे अनेक लोक सेलिब्रिटी झाले ही सेलिब्रिटी पणाची क्रेझ इतकी वाढली की सिनेमा करणाऱ्या लोकांसुद्धा त्यांचा हेवा वाटू लागला.

अनेक जण योगाच्या टिप्स देऊ लागलं, काहीजण गुंडगिरी करू लागले, काही जण नवीन नवीन content आणू लागले, काही जण ९० च्या दशकातले गाणे लावून आपलं हरवलेलं प्रेम किती ग्रेट होतं यावर व्हिडिओ बनवू लागले म्हणजे पहा सोशल मीडियाची जादू.

कालांतराने टिकटॉक बंद झालं बंद म्हणजे बळजबरीने लोकांची क्रिएटिव्हिटी बघून शासनाला ते ऍप बंद पाडावं लागलं. मग लोकांनी इन्स्टाग्रामवर आपला मोर्चा वळवला आणि तिथं धुडगूस घालायला सुरवात केली. पण सोशल मीडियाचा एक रुल असतो की फेमस व्हायचं असेल आणि कायमच किंग बनून राहायचं असेल तर एकदम तगडा कंटेंट तुमच्याकडे हवा.

वन नाईट वंडर झालेले आणि नंतर कायमचे गायब झालेले सेलिब्रिटी लोकसुद्धा आपण पाहिलेले आहेत.

असाच एकजण भिडू आहे सध्या तो जोरदारपणे इंस्टाग्रामवर मार्केट गाजवतो तेही एक खेळ खेळून, खेळपण काय साधासुधा नाहीए तर कॅरम आहे. आपल्याकडे कॅरम हा खेळ फक्त दिवाळीच्या नाहीतर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहिती आहे पण इंस्टाग्राम रिल्सवर कॅरम खेळून राडा घालणारा तो भिडू तुम्ही नक्कीच पाहिला असेल.

कितीही अवघड डाव असू दे ह्यो गडी बरोबर स्ट्रायकर सोडतो आणि डाव फिरवतो. तर जाणून घेऊया हा गडी नक्की कोण आहे. कॅरम किंग या नावाने फेमस असलेला तो गडी आहे हाजी अली अगारिया. टिकटॉकमुळे आपलं टॅलेंट जगाला दाखवता आलं त्या लोकांपैकी एक म्हणजे हा हाजी अली अगारिया.

जेव्हा हाजी अली अगारिया टिकटॉकवर आला तेव्हा काही दिवसांमध्येच त्याने ५७ लाख फॉलोवर झाले होते.भारतातल्या टॉप मोस्ट टिकटॉकर लोकांपैकी एक म्हणून हाजी अली अगारियाचं नाव घेतलं जातं. कॅरम मध्ये मास्टरी असलेला हा हाजी अली अगारिया इंस्टा रिल्सवर मिलियन्समध्ये व्हीव मिळत आहे आणि त्याचे चाहतेसुद्धा वाढत आहेत.

इन्स्टाग्रामवर रिल्स सेक्शन उघडल्यावर पहिल्या टॉप ५ व्हिडीओजमध्ये हाजी अली अगारियाचं कॅरम कौशल्य आपल्याला दिसून येतं.

सगळ्या सोंगट्यांच्या गर्दीतून वाट काढत क्वीन कशी पटकवायची याची त्याची शैली अफाट आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये त्याच कौशल्य दिसून येतं आणि कायम नवीन कंटेंट असल्याकारणाने हाजी अली अगारिया इन्स्टाग्रामवर कॅरम किंग म्हणून फेमस आहे.

फँड्री सिनेमात नागराज मंजुळेला आपण दुकानात कॅरम खेळताना पाहिलं असेलच तसाच हा गडी सुरवातीच्या काळात टाइमपास म्हणून कॅरम खेळायचा नंतर नंतर तो कॅरममध्ये इतका परफेक्ट झाला की त्याला दुसरं कुणी हरवू शकत नव्हतं.

मग कालांतराने टिकटॉकचं आगमन झालं आणि आपलं कौशल्य सोशल मीडियावर टाकायला त्यानं सुरू केलं आणि काही दिवसातच लोकांच्या प्रतिसादाच्या अंदाजवरून तो फेमस होत गेला जस जसा तो फेमस होत गेला त्याचा कंटेंट नव्या दमाने येऊ लागला आणि लोकांच्या पसंतीस उतरू लागला.

आज घडीला गाणी, डान्स, जादू या कंटेंटच्या व्यतिरिक्त हाजी अली अगारियाचा कंटेंट आहे आणि त्याचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हालाही कळेल की त्याला कॅरम किंग का म्हणतात ते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.