महाराष्ट्राच्या मातीनं जगाला “डंगरी जिन्स” दिली, कशी ?

भारताचा सुपरस्टार सलमान खान आणि लातूरच्या दयानंद कॉलेजमध्ये शिकणारा बालाजी यांच्या कपड्यात कोणते साम्य असू शकते? दोघेही रोज न चुकता जीन्स वापरतात. भलेही त्यांच्या जीन्सच्या किंमतीमध्ये जमीन अस्मानाचं अंतर असेल मात्र जीन्स हा आपला राष्ट्रीय पोशाख बनत चालला आहे.

बारा महिने चालणारी जीन्स बॅचलर पोरांसाठी तर वरदान असते. टिकाऊ, दमदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही वापरली तरी घाण होत नाही. कुठल्याही शर्टवर सहज मॅच होते. कॉलेजच्या पोरापोरींना तर ही कम्फर्टेबल आहेच पण अनेक ‘पिकलं पान’ आणि ‘हिरवा देठ’ असलेले भिडू सुद्धा जीन्स वागवताना दिसतात.

जीन्स ही चीन आणि जपानपासून ते युरोप-अमेरिकेपर्यंत सगळ्यांच्या वार्डरोबचा  अविभाज्य घटक बनली आहे. अशी ही जीन्स नेमकी बनली तरी कशी याची तुम्हाला कल्पना आहे का ?

सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीन्सच्या निर्मितीत मराठी मातीचं कनेक्शन आहे हे तुम्हाला माहितेय का?

चला तर आम्ही तुम्हाला घेऊन जातोय थेट सोळाव्या शतकात.

हो सोळाव्या शतकात जेव्हा महाराष्ट्रात छत्रपतींचं स्वराज्य आकार घेत होतं. त्याकाळात भारतीय कापड जगावर राज्य करायचं. सुरतच्या बंदरातून अतिशय महागड मलमल कापड जगभरात निर्यात व्हायचं. भारतीय मसाले आणि भारतीय कापड यांचा वास घेत-घेतच तर ब्रिटीश भारतात आले होते.

सुरतवर होणाऱ्या मराठी हल्ल्यानंतर इंग्रजांनी आपलं व्यापारी केंद्र मुंबई बंदरावर हलवलं. मुंबईजवळ डोंगरी या छोट्या खेड्यात जॉर्ज व्हाईट या ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने मराठ्यांच्या परवानगीने ‘अँग्लो ट्रेडिंग पोस्ट’ सुरु केली.

या गावात येणाऱ्या ब्रिटीश खलाशांच्या लक्षात आलं की गावकरी एक विशिष्ट प्रकारचं कापड कपड्यासाठी वापरतात. जाडंभरड कॉटन असलेलं हे कापड टिकायला अतिशय मजबूत असल्याची बाब देखील त्यांनी हेरली. कोणतंही कष्टाचं काम करताना हे कापड फाटणार नाही याची त्यांना खात्रीच होती. व्यापारी बुद्धीच्या इंग्रजांनी श्रीमंत भारतीय मलमलसोबत गरीब डोंगरीवासीयांचं कापडसुद्धा युरोपमध्ये नेलं.

डोंगरी या गावाच्या नावावरून या कापडाला ‘डूंगरी’ किंवा ‘डंगरी’ असं संबोधण्यात येऊ लागलं.

याच काळात इटलीमध्ये डंगरी आणि तसल्याच कापडाची पँट फेमस झाली. तीला जीन्स असं संबोधण्यात आलं. लोहार, सुतार आणि शेतकरी असे कष्टकरी लोक या कापडाचे कपडे वापरत होते. युरोपमधून सोन्याच्या शोधात अमेरिकेला जाणाऱ्या भिडूनी हे कापड अमेरिकेला नेलं.

यापैकीच एक भिडू होता लेव्ही स्ट्रोस. या गड्याने सोनं शोधण्याऐवजी तिथं आपला कापडाचा धंदा सुरु केला. १८७२ साली त्याचं कापड घेणाऱ्या एका शिंप्याचं त्याला पत्र आलं. त्यात त्यानं लिहिलं होत की त्याच्या एका गिऱ्हाईकाच्या बायकोने त्याच्याकडे एका न फाटणाऱ्या पँटची मागणी केलीये.

लेव्ही सप्लाय करत असलेल्या जाड कापडाला लोखंडी खिळ्यांची जोड देऊन त्याने एक पँट बनवली होती. ही पँट अमेरिकेत खूप हिट होणार याची जेकबला खात्री होती. मग लेव्ही आणि जेकबने मिळून १८७३ साली या पँटसाठीचं पेटंट मिळवलं. त्या काळात तीला ‘ओव्हरऑल’ असं संबोधल जायचं.

‘लेव्ही स्ट्रोस आणि कंपनी’ या ब्रँडखाली पहिली जीन्स अमेरिकेत विकली जाऊ लागली. जाड कापडाची जीन्स अमेरिकेच्या कष्टकरी जनतेमध्ये देखील हिट झाली. ‘काऊ बॉय’मध्ये तर ती विशेष गाजली.

सुरवातीच्या काळात जीन्स फक्त निळ्या रंगात विकली जायची. या निळ्या रंगासाठी सुद्धा भारतीय नीळ वापरलं जायचं. १९१० साली एच.डी.ली ने डंगरी कापडाचा हाफ शर्ट आणि पँट जोडून ‘बिब ओव्हरऑल’ बनवली. तीला दोनही खांद्यावर पट्ट्या होत्या. पुढे पोटावर दोन खिसे होते.

सुतार, गवंडी ,लोहार, रेल्वे कामगार अशा श्रमजीवींना त्यांची छोटी हत्यारे ठेवायला सोपी असणारी ही पँट खूप आवडली. दुसऱ्या महायुद्धानंतर तर जीन्सचा जगभर प्रसार झाला. १९७० च्या दशकात तर जीन्सने क्रांतीच केली.

आजही ‘लेव्हीस्ट्रोस’ हा ज्याला आपण ‘लिवाइस’ म्हणून ओळखतो तो जगातला जीन्स बनवणारा सगळ्यात मोठा ब्रँड आहे. आज जीन्स फक्त कष्टकरी जनतेची राहिली नाही, तर ती सगळ्यांचीच झाली.

आपली डंगरी, तिचं काय झालं ?

अहो ‘डंगरी जीन्स’सुद्धा आज जगभरातल्या ब्रँडमध्ये खूप फेमस आहे. ‘सुपर मरिओ’ सुद्धा डंगरी जीन्स घालतो. लहान मुले आणि मुली या ‘डंगरी जीन्स’मध्ये आणखीन क्युट दिसतात, नाही का ?

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.