आदित्य ठाकरेंनी मुंबईच्या हवेचं मनावर घेतलंय…त्या मागे सिरीयस कारण आहे

वायूप्रदूषण हा नुसता शब्द ऐकला तरी डोक्यात सगळ्यात आधी येतं ते नाव म्हणजे दिल्ली. खरंतर दिल्लीतील हवा प्रचंड खराब आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीय, पण मागच्या काही दिवसांचा विचार केला तर दिल्लीपेक्षा मुंबईतलं वातावरण हे अधिक खराब असल्याचं पाहायला मिळतं.

दिल्ली म्हणजे प्रदुषणयूक्त दुषित आणि धुकं असलेली हवा असं एक चित्र दिल्लीच्या हवामानाबाबत आपल्या मनात आणि डोक्यात तयार झालेलं आहे. पण, वायूप्रदूषणाच्या बाबतीत मुंबईनं दिल्लीलाही मागे टाकलंय. मुंबईतही धुकं असललेलं अन् दुषित वातावर पाहायला मिळतंय.

याबाबतीत आदित्य ठाकरेंनी केंद्रीय मंत्री भूपेंदर यादव यांना पत्र लिहून मुंबईत ढासळलेला हवेचा दर्जा आणि महाराष्ट्रातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरून चिंता व्यक्त केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या सहा महिन्यांत मुंबईतील हवेच्या गुणवत्तेला AQI वर सातत्याने ‘खराब’ आणि ‘खूप खराब’ असे रेट केले गेले आहे. महाराष्ट्रातील इतर शहरे देखील हवेच्या गुणवत्तेबद्दल पोस्ट करत आहेत आणि त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे शिवाय तसेच राज्याला पूर्णवेळ पर्यावरण मंत्री नाही याचीही आठवण त्यांनी करून दिली.

त्यामुळे आपण जाणून घेऊया मुंबईच्या वायू प्रदूषणाची कारणे काय आहेत ?

  • मुंबई आणि दिल्लीतील प्रदुषण

मुळात प्रदुषण मोजण्यासाठी एक्यूआय नावाचं एक विशिष्ट एकक असतं. एक्यूआय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स. हा एक्यूआय जितका कमी असतो तितकं त्या शहरातील वातावरण चांगलं असतं.

किती AQI  असणं म्हणजे शुद्ध हवा असते?

१-५० दरम्यान एक्यूआय असेल तर ती हवा अगदी शुद्ध असते. ५१-१०० दरम्यान एक्यूआय असण्याचा अर्थ हवा पूर्णपणे शुद्ध नसली तरी, बऱ्यापैकी शुद्ध आहे. १०१-२०० मध्ये एक्यूआय असल्यास ती हवा फक्त जगण्यायोग्य असते. २०१-३०० एक्यूआय असेल तर, हवा वाईट आणि ३०१-४०० मध्ये एक्यूआय असेल तर, हवा खूप वाईट असते.

आता ही आकडेवारी वाचल्यावर आणि मुंबईतील हवामान बघता मुंबईकरांनी चिंता करण्यासारखीच ही परिस्थिती निर्माण झाल्याचं दिसतंय. पण, मुळात ही परिस्थिती कश्यामुळं निर्माण झाली, त्यामागची कारणं काय आहेत ते बघुया…

१) हवेच्या पॅटर्नमध्ये होणारे बदल:

मुंबईतल्या वायू प्रदूषणाचं मुख्य कारण आहे मुंबईतील हवेच्या पॅटर्नमध्ये होत असलेले बदल… मुंबईतील वाऱ्याचा वेग कमी झालाय. हाच कमी झालेला वेग हे प्रदुषणामागचं प्रमुख कारण आहे.

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, मुंबईतील वारं हे जमिनीकडून समुद्राकडे आणि समुद्राकडून जमिनीकडे… असा फेरा आधी ३-४ दिवसात पूर्ण व्हायचा पण आता तो कधी आठवडाभर घेतोय तर कधी कधी तब्बल १० दिवसांचा वेळही लागतोय. त्यामुळं होतंय असं की, शहरातील दुषित हवा ही शहराच्यावरच बराच काळ फिरत राहतेय. त्यामुळं या एक्यूआयमध्ये वाढ होतेय.

२) वाढती बांधकामं:

मुंबईलारख्या वाढ मेट्रोसिटीमध्ये बांधकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढणं हे स्वाभाविकच आहे. शहर मोठं होत असताना निसर्गाचा ऱ्हास कमी प्रमाणावर होईल हे पाहणंही गरजेचं असतं. मुंबईमधल्या वाढत्या वायू प्रदूषणाबाबत बोलताना मुंबईमहापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी म्हटलंय,

“मुंबईतील बांधकाम व्यवसाय याच महिन्यात मोठा होतोय असं नाहीये.”

एकूण वायू प्रदूषणातील ७२ टक्के प्रदुषण हे मुंबईतील धुळीमूळे होतंय असं २०२१ सालचा एक अहवाल सांगतो. २०१० मध्ये हे प्रमाण फक्त २८% इतकंच होतं. शहरातील हवेलतील धुळीचं प्रमाण हे वाढत्या बांधकामांमुळंच अधिक वाढतं.

या बांधकामांमध्ये फक्त इमारतींचाच समावेश होतो असं नाहीये. मुंबईमध्ये अनेक मोठ मोठे पायाभूत सुविधांच्या बांधकामाचंही काम सुरू आहे. त्यात प्रामुख्यानं मुंबई मेट्रो, गोरेगाव-मुलूंड लिंक रोड, अनेक उड्डाणपूलांच्या दुरूस्तीची कामं अशी अनेक कामंही यासाठी कारणीभूत आहेत.

३) वाहनांची वाढती संख्या:

मुंबई ही स्वप्नांची नगरी असं म्हटलं जातं. त्यामुळे आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच जण हे मुंबईत येतात. ज्यांची स्वप्न पूर्ण व्हायचीयेत अश्या नागरिकांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर ताण येतो आणि सार्वजनिक वाहतूकीसाठीची वाहनं वाढतात… तर, ज्यांची स्वप्न पूर्ण झालेली असतात ते अर्थातच सार्वजनिक वाहतुकीची साधनं वापरत नाहीत. उलट, वैयक्तिक गाड्यांचा वापर करतात. या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मुंबईतील वायू प्रदूषण वाढतं.

आकडेवारी पाहायची झाली तर, मुंबईमध्ये सध्ये प्रति किलोमीटरमध्ये २,००० गाड्यांची घनता आहे त्यामुळे मुंबईतील ट्राफिकही वाढतंय आणि ही घनता भविष्यात मुंबईमधील हवामानाच्या वाईट स्थितीकडे बोट करतेय.

ही तीन मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाची महत्त्वाची कारणं आहेत.

दरम्यान, या वायू प्रदूषणाच्या मुद्द्यावरून टीकांना आणि राजकारणालाही सुरूवात झालीय. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये पर्यावरण मंत्री राहिलेले शिवसेना(ठाकरे गटाचे) नेते आदित्य ठाकरे यांनी या विषयावरून शिंदे फडणवीस सरकारमध्ये पूर्णवेळ पर्यावरणमंत्री नसल्यानं मुंबईतील हवा ही अशी दुषित झाली असल्याचं म्हटलंय.

तर, काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही सरकारवर निशाणा साधत मुंबईतील मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.

हा झाला सत्ताकारणाचा आणि राजकारणाचा भाग, पण देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये पैसे कमवत असतानाच देशाच्या अर्थव्यवस्थेतही भर पाडणाऱ्या एका सामान्य मुंबईकराला चांगली हवा मिळणंही आता कठीण झाल्याचं दिसतंय.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.