१९७४ मध्ये जिथं खनिज तेलाचा खजिना सापडला ते बॉम्बे हाय काय आहे ?

रशियन संशोधकांच्या सहकार्याने मुंबईच्या वायव्य दिशेकडील समुद्रभागात भारताने खनिज तेलाचं जे शोधकार्य हाती घेतलं होतं, त्याला १९७४ मध्ये मोठं यश लाभलं….यशाचं नाव म्हणजे बॉम्बे हाय !!!

बॉम्बे हाय असं नामकरण झालेल्या या भागात तेलविहिरी खोदण्यात आल्या. सर्वप्रथम म्हणजे, मे १९७४ मध्ये इथे खनिज तेलाचा साठा सापडला होता. 

‘मुंबई हाय’ हे अरबी समुद्रात मुंबईपासून १७६ किलोमीटर पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. १९६० ते ७० या दशकात गुजरातमधील अंकलेश्वर व खंबायतच्या आखातात खनिज तेलांचे विस्तृत साठे सापडल्यामुळे गुजरात व महाराष्ट्र या राज्यांलगतच्या अरबी समुद्राच्या उथळ भागात खनिज तेलाचे साठे असण्याची शक्यता निर्माण झाली. 

भूकंपीय सर्वेक्षणाच्या अभ्यासातूनही या शक्यतेला दुजोरा मिळाला होता. त्यामुळे खनिज तेल व नैसर्गिक आयोगाच्या संशोधकांनी रशियन संशोधकांच्या सहकार्याने या भागात शोधमोहीम हाती घेतली. या शोधमोहिमेला यश मिळून मुंबईच्या वायव्येस सुमारे १६० कि.मी. अंतरावर उथळ समुद्रामध्ये विस्तृत खनिज तेल क्षेत्र सापडलं. या क्षेत्राचं ‘बॉम्बे हाय’ असं नामकरण करण्यात आलं. 

जानेवारी १९७४ मध्ये ओएनजीसीने ‘सागर सम्राट’ या ड्रिलशीपद्वारे या क्षेत्रात तेलविहीर खोदण्यास सुरुवात केली.. मे १९७४ मध्ये या विहिरीत खनिज तेलाचा साठा उपलब्ध झाला. त्यानंतर अनेक विहिरी खणण्यात येऊन ‘बॉम्बे हाय’ या क्षेत्राचा विकास करण्यात आला.

१९८० मध्ये या क्षेत्रातून मिळणाऱ्या खनिज तेल व नैसर्गिक वायूवर प्रक्रिया करण्याच्या यंत्रणा ‘बॉम्बे हाय’ व उरण परिसरात स्थापन करण्यात आल्या. खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या साठ्यांच्या संदर्भात ‘बॉम्बे हाय’ हे भारतातील सर्वांत विस्तृत क्षेत्र ठरल्यामुळे या क्षेत्राचा शोध ही १९७० च्या दशकातील एक महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरली. पुढे वसई आणि सॅटेलाईटमधून १९८८ पासून उत्पादन सुरु करण्यात आले

नंतरच्या काळात या क्षेत्रातील तेलविहिरींची संख्या साडेआठ हजारांहून अधिक झाली, तर नैसर्गिक वायूच्या ३३ विहिरी खणण्यात आल्या.  भारतातील खनिज तेलाच्या एकूण उत्पादनात या क्षेत्राचा वाटा ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचला; तर देशाच्या खनिज तेलाच्या एकूण गरजेपैकी १४ टक्के गरज या क्षेत्रामुळे पूर्ण झाली.

पण २०२१ च्या नोव्हेंबर मध्ये मोदी सरकारकडून आता ‘मुंबई हाय’चे खासगीकरण आले आहे.

या येथून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने या तेल क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा विचार केंद्र सरकारने केला आहे. मोदी सरकारच्या नेतृत्वात असणाऱ्या ‘ओएनजीसी’ने स्वतःकडील तेल विहीरी आणि तेल क्षेत्रांचे खासगीकरण करावे, यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने मनावर घेतलं.  त्याबाबत पेट्रोलियम मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अमरनाथ यांनी ‘ओएनजीसी’चे अध्यक्ष सुभाष कुमार यांना पत्र पाठवले आहे.

या पत्रात, मुंबई हाय आणि वसई सॅटेलाईटमधील उत्पादन क्षमता कमी झाली आहे त्यामुळे अंतरराष्ट्रीय भागिदारांना येथे गुंतवणुकीसाठी आमंत्रित करायला हवे आणि त्यांना ६० टक्के हिस्सा आणि परिचालनाचे अधिकार द्यायला हवेत, असे अमरनाथ यांनी आपल्या तीन पानी पत्रात लिहिलं होतं.

ओएनजीसी’कडून उत्पादन होणाऱ्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूमध्ये ‘मुंबई हाय’चे मोठे योगदान आहे पण जर का ‘मुंबई हाय’चे खासगीकरण झाले तर ‘ओएनजीसी’कडे छोट्या तेल विहिरी आणि काही मोजके तेल साठे शिल्लक राहतील हे तितकंच खरंय…

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.