मुंबई पाहण्यास जाणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवण्यासारख्या काही ठळक गोष्टी. 

मुंबईचा मार्गदर्शक अर्थात मुंबईमित्र. लेखक जयराम रामचंद्र चौधरी. 

पुस्तकाची किंमत १ रुपया. 

ता. १ जानेवारी १९२५. 

मुंबई मित्र या पुस्तकात लेखक जयराम चौधरी यांनी मुंबईत कस फिरावं काय पहावं याच वर्णन यात केलं आहे. आत्ता तुमचा प्रश्न येणार की, ठिकाय यात विशेष काय ? तर विशेष अस कि तेव्हा केलेलं मुंबईच वर्णन आणि त्यांची भाषा. त्यांनी खूपच साध्या आणि छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. जस की मोठ्या शहरात डाव्या बाजून चालावं लागतं याबद्दल केलेलं वर्णन. अशा साध्या गोष्टी आपणाला अजूनही समजत नाहीत. असो, 

तर तेव्हा कोणती काळजी लोकांना घ्यायला सांगितली जायची त्यांच्याच शब्दात वाचा. 

१) आपणास कोठें उतरावयाचें ह्याविषयीं पूर्वीच ठरवून ठेवावें. ज्याकडे उतरावयाचें असेल त्याचेकडे जागेची सोय होईल किंवा नाहीं, ह्याविषयीं अगोदरच पत्रानें चौकशी करुन घ्यावी, कारण मुंबईस घरभाडें फार महाग असल्यामुळें एकाद्याकडे उतरण्यास पुरेशी जागा असेलच असें समजून चालू नये. सबब पत्रानें चौकशी करुन घ्यावी. 

२) प्रत्येक मनुष्याने ट्रामगाडीतून उतरतेवेळी ट्राम ज्या बाजून जात असेल त्या बाजूसच तोंड करुन उतरावें. ट्राम चालत असताना उलट बाजूस तोंड करुन उतरल्यास ट्रामच्या वेगामुळें मनुष्याचा झोंक मागे जाउन, मनुष्य जमिनीवर आपटण्याची भांति असते. गैर माहितगार मनुष्याकडून अशा चुका झाल्याचीं व त्यामुळे अपघात झाल्यांची अनेक उदाहरणे घडली आहेत. सबब ट्रामगाडीतून उतरतेवेळी सावध असावे. 

३) प्रत्येक इसमानें मुंबईस जातेवेळीं आपला पोषाख शक्य तितका स्वच्छ, निटनेटका व उत्तम असा करुन जावें. वेडेवाकडे उपरणे, वेडा वाकडा फेटा किंवा पागोंटे पाहून हा मनुष्य परगांवाचा व अर्थात खेडे गावाचा आहे असे समजून, मुंबईतील परजातीय लोक व दुकानदार कधीं कधीं थट्टामस्करी किंवा फसविण्याचा यत्न करितात. 

४) कोणत्याही मोठ्या शहरांत गाडी डाव्या बाजूने हाकावी असा ठराविक नियम असतो. सबब प्रत्येक मनुष्याने मुंबईत फिरताना नेहमी जेथे नसेल तेथे रस्त्याचे उजवे बाजूनें चालावें. उजवे बाजूनें जाण्यापासून मागून येणाऱ्या गाड्यांना धक्का बसण्याची भिती नसते. मग फक्त समोरून येणाऱ्या गाड्यांचीच काय ती काळजी राहते. 

५) पायी मार्गातून केव्हांही चालत असताना किंवा एकादे स्थळी कोणतीही गंमत पहात असताना खिशांतील पैसाअडका चांगला संभाळून ठेवावा व कोटाची बटनें नेहमी लावलेली असावी. चालतांना ह्याविषयी नेहमी खबरदारी घेत असावें. 

६) मुंबईस अपरिचित मनुष्यानें बोलाविल्यास त्याचे बरोबर कोठेंही जाउ नये व त्याचे बरोबर कोणताही व्यवहार करुं नये. 

७) तुम्हास अमुक गंमत दाखवितों असे म्हणून बोलावणारे पुष्कळ ठग लोक असतात त्यांचेकडे बिलकूल लक्ष देवू नये.. 

८) मुख्य रस्त्यावर १५,२० औषधी जिनसा पुझें ठेवून बसणारे काहीं भोंदू वैद्य असतात व त्यांच्याशी कोणाताही व्यवहार करु नये. 

९) काही ठग लोक असे असतात की, आपल्या जवळ दिसण्यात मोल्यवान व गुणांत नकली असा एकादा जिन्नस घेतात, व रस्त्याने चलतां चालतां एकादा भोळसर मनुष्य दृष्टीस पडताच त्यास नकळत तो जिन्नस त्याचे पुढें मोठ्या शिताफींने टाकतात. नंतर त्या वस्तूवर ह्या भोळसर व अजाणत्या मनुष्याची नजर पडताच तो ती वस्तु तात्काळ उचलून घेतो. एवढे कृत्य होताच ढग त्यास गाठतो व गोड गोड थापा मारून त्यांचेकडून पैसे काढून घेतो व लागलीच तिथून निघून जातो. 

१०) लहानसहान दुकानदार आपणाला भलतीच किंमत सांगतात, व आपण योग्य किंमतीस ती वस्तु मागितली तर, अरे ज्या ज्या मोठा घ्यायला आला अशा प्रकारची हलकट भाषा वापरून मनुष्याचा अगदी पाणउतारा करुन टाकतात. त्यामुळे मनुष्य ती वस्तू जड्या किंमतीत घेतो. 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.