गुल्लूला सिरीयस न घेणं पोलिसांना महागात पडलं आणि मुंबईत बॉम्बस्फोट झाले.

त्या दिवशी स्फोटांची योजना अंतिम टप्प्यात अली होती, सगळ्या जागा पाहून झाल्या होत्या , कुठे बॉम्ब पेरायचे, कुठे हातबॉम्ब फेकायचे असा सगळं प्लॅन एकदम तयार झाला होता. टायगर मेननने बांधलेला  मुंबई उडवायचा चंग पुढच्या काही तासात सफल होणार होता.

गुल महमंद खान हा टायगरच्या टोळीतील अत्यंत विश्वासाचा माणूस होता. पाकिस्तानात झालेल्या प्रशिक्षणाला तो हजर होता. मुंबई हल्ल्याच्या कटाच्या संपूर्ण प्लॅन बद्दल त्याला खडानखडा माहिती होती. टोळीतील सगळ्या लोकांची त्याला सविस्तर माहिती होती.

गुल्लू हे त्याचं टोपणनाव. वांद्रे पूर्व भागातल्या बेहरमपाड्याच्या एका झोपडपट्टीत तो राहत होता. मुंबईत उसळलेल्या हिंसाचारात लोकांना भोसकण्याच्या कारणावरून तो पोलिसांना हवा होता. बेहरामपाडा परिसर हा दंगलींमुळे हॉटस्पॉट एरिया बनला होता. दंगल झाल्यानंतर त्याने लगेचच टायगर मेमनच्या टोळीत भाग घेतला आणि तो दुबई मार्गे पाकिस्तानला गेला. त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी जंग जंग पछाडलं होत. वारंवार त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी अक्षरशः अख्खा बेहरामपाडा पिंजून काढला होता.

पण गुल्लू काही पोलिसांच्या हाती लागत नव्हता किंबहुना तो तिथे नव्हताच. ४ मार्चला तो मुंबईत त्याच्या घरी परतला. पोलीस मागावर आहेत हे त्याला आधीच कळलं होतं, तो पोलिसांना चकवा देत होता. इतकंच काय तर त्याने त्याच्या टोळीतल्या एकालाही टोळी सोडल्याचा सुगावा लागू दिला नाही.

शेवटी त्याला शोधून शोधून वैतागलेल्या पोलिसांनी त्याच्या भावाला आणि कुटुंबाला जेल मध्ये टाकलं आणि बेदम मारहाण करायला सुरवात केली. त्यामुळे गुल्लूला वाईट वाटायला लागलं पण तो पोलिसांना शरण गेला नाही.

तेल शुद्धीकरण कारखान्यावर बॉम्ब फेकायचा उद्देशाने  विचार करत असताना टोळीतल्या उस्मान जान खानला बशीर अहमदने विचारलं तुला गुल्लू बद्दल कळलं कि नाही ? त्याच क्षणी बादशहा खानला  गुल्लूची आठवण झाली. तो भूमिगत झालाय असं कळल्यावर उस्मान जान खान चिडला आणि म्हणाला अजून कामाला सुरवातही झाली नाही आणि भूमिगत होण्याचं कारण काय ? बशीर म्हणाला तो पोलिसांना शरण जाणार म्हणत होता.

उस्मान जान खानने पटकन गाडी काढून बेहरामपाडा गाठलं आणि अनेक चहाच्या टपऱ्यांवर त्याला धुंडाळलं , एका चिंचोळ्या गल्लीतल्या घरात तो सापडला. उस्मानने त्याच्यावर खेकसत त्याला विचारलं असा अचानक गायब का झाला ? पोलिसांना शरण का जातोय ? त्यावर रडत रडत गुल्लूने सांगितलं माझ्यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास का ? पोलीस त्यांना विनाकारण मारताय आता तूच सांग मी काय करू ?

उस्मानला गलबलून आलं. तिथून तो तडक टायगर मेमनला घडलेली घटना सांगण्यासाठी निघाला. टायगर मेमनकडे पोहचताच उस्मानने त्याला सगळं प्रकार सांगितला. यावर मेमन स्तब्ध झाला आणि चेहऱ्यावरचे हावभाव किंचितही न बदलता म्हणाला

ठोक दो……

उस्मान म्हणाला मी समजावतो भाई त्याला, मेमनने त्याला सांगितलं , गुल्लूला तोंड बंद करायला सांगा नायतर त्यांच्या कुटुंबासकट त्यालाही संपवण्यात येईल.

memons story 647 073015125649

आदल्या दिवशी टायगर मेमन आणि उस्मान खान गुल्लूला शोधायला घरी आले पण तो घरातच लपून बसला , मेमन आणि उस्मान चिडून परत माघारी गेले.

९ मार्चला गुल्लू स्वतःहून पोलिसांना शरण गेला. पोलिसांनी आधी त्याच्यावर थर्ड डिग्री लावून त्याला काळा निळा होईस्तोवर मारला. पोलिसांनी त्याला दंगलीत केलेल्या भानगडी विचारल्या पण दंगली बरोबरच गुल्लूने पाकिस्तानला घेतलेलं प्रशिक्षण , मुंबई उडवण्याचा प्लॅन ताबडतोब सांगितला.

साधा दंगल करणारा मुलगा मुंबई उडवण्याचा प्लॅन आपल्याला सांगतोय हा खुळचटपणाचा विचार वाटून मुंबई पोलिसांनी त्याला गंभीरतेने घेतलं नाही.

टायगर मेमनला आधीच कळलं होत कि गुल्लू पोलिसांना सगळं सांगणार पण काहीही झालं तरी मुंबई उडवायची या धेय्यानं तो पेटून उठला होता आणि त्याने माघार घेतली नाही. १२मार्चला त्याने बॉम्बस्फोट घडवून आणलेच.

84563993 blast000201

एकूण १२ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. शेकडो जणांचे मृत्यू झाले. धावती मुंबई ठप्प झाली. मृतांच्या कोलाहलामुळे सगळं देश सुन्न झाला होता.

बॉम्बस्फोट झाल्याच्या तीन दिवसानंतर मुंबई पोलिसांना गुल्लूला गंभीरतेने न घेण्याचा पश्चाताप झाला आणि अनेक जीवांची किंमत त्यांना मोजावी लागली. ज्या पोलिसांना गुल्लूने हि माहिती दिली होती त्यांचं नाव मात्र पुढे आलं नाही आणि त्यांच्यावर कुठली कारवाईही झाली नाही. मात्र नंतर पुढे आलेल्या माहितीत CBI चौकशीत गुल्लूने हि माहिती सांगितली होती.

या माहिती नंतर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं, तिथल्या ऑफिसरच्या ढिलाईपणाची जबर किंमत अख्ख्या मुंबईला मोजावी लागली होती.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.