पोलिसांना टीप देऊन मुंबई वाचवणाऱ्या, सलीम लंगडाच्या खुन्याची टीप अजून मिळालेली नाही
कुठलीही क्राईम वेब सिरीज घ्या किंवा अगदी क्राईम पेट्रोलचा शो. पोलिसांकडे कुठल्या अवघड केसचा तपास आला, की एका कॅरॅक्टरची एंट्री होते. ते कॅरॅक्टर म्हणजे, टिपर किंवा खबऱ्या.
कुठल्या गॅंगमध्ये काय चाललंय, कुणाची सुपारी कुणी वाजवली, कोण आत्ता शहरात आहे आणि कोण नाही, ही माहिती पोलिसांपर्यंत हे टिपर पोहोचवतात. यांची नावं पोलीस सोडून कुणालाच माहीत नसतात, हे कसे दिसतात हे फक्त पोलिस सांगू शकतात आणि अर्थात ते कधीच सांगत नाहीत.
मुंबईच्या इतिहासात असाच एक टिपर होऊन गेलाय, ज्याचं नाव सगळ्यांना माहितीये आणि त्यानं दिलेल्या टिपाही. आता नाव जगजाहीर झालंय, हा टिपर कसला? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, पण आधी त्याची स्टोरी वाचा आणि मग ठरवा.
त्याचं नाव सलीम सिद्दीकी. अंगावर मांस फक्त नावालाच, डोक्यावर भरपूर केस असं त्याचं वर्णन उपलब्ध असलेल्या त्याच्या एकाच फोटोवरुन करता येतं.
सलीमचं प्रोफेशन होतं, खबर पुरवणं. तो फक्त मुंबई पोलिसच नाही, तर एटीएस, एनसीबी, सीबीआय, आयबी अशा महत्त्वाच्या सरकारी तपास यंत्रणांना गुन्हेगारांच्या हालचालींची आणि शहरात होऊ शकणाऱ्या गैरप्रकारांची माहिती द्यायचा.
यामागचं सलीमचं कारण सोपं होतं, पैसे कमवणं.
सलीमची कित्येक नावं होती. सलीम चोर, सलीम कुलाबावाला (तो कुलाब्यात रहायचा म्हणून) कुणी त्याला सलीम खबरीही म्हणायचं.
एकदा सलीम गाडीवरुन चालला होता, तेवढ्यात त्याचा अपघात झाला. तो वाचला खरा पण लंगडून चालायला लागला, इथंच त्याला नाव पडलं सलीम लंगडा.
लंगडा कधी अंडरवर्ल्डच्या गॅंगसोबत असायचा, तर कधी कुणाला समजणार नाही अशा रूपात एखाद्या टोळीत, पण टिपा पार पोलिसांपासून पत्रकारांपर्यंत सगळ्यांना द्यायचा.
तो फक्त अंडरवर्ल्डच्याच टिपा द्यायचा असं नाही, तर गैरप्रकारांच्या टिपाही द्यायचा. साधारण २००७-०८ ची गोष्ट असेल. मुंबई आणि महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या खाद्यतेलात मोठ्या प्रमाणावर भेसळ होत होती. सलीमला ही खबर लागली. त्यानं अधिकाऱ्यांपर्यंत ही खबर पोहोचवली आणि पोलिसांनी सूत्रं हलवली.
भेसळ करणाऱ्यांना मालासोबत पकडलं गेलं आणि कित्येक जणांचे जीव वाचले.
सलीम लंगडानं दिलेल्या आणखी दोन टिपाही गाजल्या होत्या. बॉलिवूड अभिनेता फरदीन खानला १ ग्रॅम कोकेन जवळ बाळगल्याच्या आरोपात अटक झाली होती. असं सांगतात, की ही एका ग्रॅमची टीपही एनसीबीला सलीम लंगडानं दिली होती.
१८ लाखाचे दोन किस्से
असं सांगण्यात येतं की, एकदा सलीमनं मुंबईत कस्टम अधिकाऱ्यांना एक टीप पोहोचवली आणि ड्रग्सचं मोठं कन्साईनमेन्ट सापडलं. माल इतका मोठा होता, की कस्टम्सवाल्यांनी त्या टीपचं बक्षीस म्हणून सलीम लंगडाला १८ लाख रुपये दिले. म्हणजे विचार करा मला किती सापडला असेल किंवा होणारी डील कितीची असेल..
पण या १८ लाखांमुळेच सलीम अडचणीत आला होता..
ही एवढी मोठी कॅश सलीम बँकेत भरायला गेला. त्याचे साधे कपडे आणि अवतार पाहून बँकवाल्यांना आला डाऊट. त्यांनी थेट डिपार्टमेंटला फोन लावला, पोलिस आले आणि त्याला घेऊन चौकीत गेले. तिकडे चौकशी वैगेरे होऊ लागली, तेव्हा सलीम एकच गोष्ट सांगू लागला की, ‘हे माझ्या कष्टाचे पैसे आहेत, जे मी मेहनतीनं कमावलेत.’ पण कुठून कमावले हे काय तो सांगेना…
तेवढ्यात एक मोठा अधिकारी चौकीत आला, त्यानं सलीम लंगडाला ओळखलं आणि पोलिसांना सांगून सोडायलाही लावलं.
गप्पा मारताना ते अधिकारी म्हणाले की, ‘तू आपलं प्रोफेशन त्यांना का सांगितलं नाही?’ तेव्हा लंगडा म्हणला, ‘मी एखाद्या अधिकाऱ्याला टीप देऊन हे पैसे कमावले, हे त्यांना समजलं असतं, तर तो अधिकारीही संकटात आला असता आणि मी पण अंडरवर्ल्डच्या रडारवर आलो असतो. मी कधीच कुठल्या अधिकाऱ्याला काय टीप दिली हे बाकीच्यांना सांगत बसत नाय. पैसा काय मी पुन्हाही कमवू शकतोच की.’
त्याच्या प्रामाणिकपणाचा हा किस्सा सगळ्या मुंबईत सांगितला जातो.
सलीम लंगडानं दिलेल्या टीपमुळे मुंबईही वाचली होती…
झालेलं असं की, एका अंडरवर्ल्ड डॉननं सलीमला दोन माणसांच्या सोबत राहायला आणि त्यांना लागेल ती मदत करायला सांगितलं. सुरुवातीला त्याला वाटलं की, हे तेल किंवा ड्रग्सचा धंदा करायला आले असतील. पण त्यांच्या हालचाली बघून त्याला कळलं हे साधे कार्यकर्ते नाहीत, हे इकडं मुंबईतला अमेरिकन दूतावास उडवायला आलेत.
त्यानं आयबी ऑफिसरला टीप दिली आणि त्या दोन शूटर्सचा करेक्ट कार्यक्रम झाला. या टीपचं सलीम लंगड्याला बक्षीस मिळालं असेलही, पण यामुळं त्याच्याकडे अंडरवर्ल्डचं चांगलंच लक्ष गेलं.
त्यांचा प्लॅन फसवणाऱ्या सलीम लंगडाची ही शेवटची टीप असेल, हे त्यांनी डोक्यात ठेवलं.
एक दिवस सलीम आपल्या बायकोसोबत जात होता, तेव्हा एका डंपरनं त्याला उडवलं. नुसतं उडवून थांबला नाही, तर पुन्हा डंपर त्याच्या अंगावर घातला… सलीम लंगडाचा शेवट हा असा झाला.
पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली काही जणांना अटकही केली, पण त्यांच्या हाती ठोस पुरावा सापडलाच नाही. सलीमच्या अस्सल खुन्यापर्यंत ते कधी पोहोचलेच नाहीत आणि दुर्दैवानं खुन्यापर्यंत पोहोचवणारी टीपही त्यांना कधी कुणी दिली नाही…
हे ही वाच भिडू:
- मुंबई पोलीस ग्रेट का आहेत, एका छोट्या पुराव्यावरून असा शोधलेला खूनी..
- १५ वर्ष झाली पण डोंबिवलीच्या स्नेहल गवारेचा खुनी अजूनही मोकाट आहे…
- वयाच्या आठव्या वर्षी त्याला अटक झाली आणि गुन्हा सिद्ध झाला ‘सिरीयल किलिंग’चा