पहिल्या मराठी मुख्यमंत्र्याचे नाव आपण विसरलो तरी खेरवाडीने त्यांच स्मरण ठेवलय

मराठी माणसाचं हक्काचं राज्य असावं यासाठी अनेक वीरांनी आपलं रक्त सांडलं. मुख्यमंत्री  मोरारजी देसाई यांच्या पासून ते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पर्यंत अनेकांशी लढा दिला.

अखेर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्व.यशवंतराव चव्हाणांनी मुंबईला आणला. ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले.

हा इतिहास आपल्याला माहित असतो. मात्र यशवंतरावांच्या ही खूप आधी जेव्हा मुंबई प्रांताची निर्मिती झाली होती तेव्हा या पदावर बसणारा सुद्धा एक मराठी माणूसच होता. आपल्या पैकी अनेकांना त्यांचं नाव ठाऊक  नसतं.

बाळासाहेब गंगाधर खेर.

बाळासाहेब खेर यांचा जन्म रत्नागिरीचा. २४ ऑगस्ट १८८८ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील गंगाधर खेर हे टिळकांचे निस्सीम भक्त. त्यांच्या प्रेरणेतून आपल्या मुलाचं नाव बाळ असे ठेवले. खरोखर बाळ गंगाधर टिळक यांच्याप्रमाणेच बाळ गंगाधर खेर यांनी देखील रत्नागिरीची कीर्ती दिगंतात पोचवली.

त्यांचे सुरुवातीचे बालपण जमखंडी संस्थानातील कुंदगोळ येथे गेले.  स्वातंत्र्यसेनानी गोपाळ कृष्ण गोखले हे गंगाधरपंतांचे मित्र. ते एकदा कुंदगोळ येथे आले असता त्यांची नजर चुणचुणीत बाळ वर पडली.

गो.कृ .गोखले हे काँग्रेसचे मोठे नेते होते. त्यांनी भविष्यातली उच्चशिक्षित राष्ट्रभक्त कार्यक्षम तरुणांची पिढी घडवण्यासाठी १२ वर्षांखालील ग्रामीण मुलांना आपल्या घरी ठेवून त्यांच्या शिक्षणाचा विडा उचलला होता.

गंगाधर खेर यांनी बाळासाहेबांना त्यांच्यासोबत पुण्याला पाठवून दिले.

बाळासाहेब खेर गोपाळ कृष्ण गोखले यांच्या संस्कारात वाढले. शाळेत असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी त्यांचा संबंध आला. प्राथमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे पूर्ण केले. विल्सन कॉलेज, मुंबई येथून १९०८ साली त्यांनी बी.ए.ची पदवी मिळवली. तेव्हा त्यांना संस्कृतामध्ये प्रथम आल्याबद्दल ‘भाऊ दाजी लाड पुरस्कार’ मिळाला.

कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा संबंध स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मित्रमेळा क्रांतिकारी संघटनेशी आला. पुढे कायद्याचे शिक्षण घेऊन ते वकील झाले.

याच काळात गोपाळ कृष्ण गोखले यांचे शिष्य महात्मा गांधी हे दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते व त्यांनी ब्रिटिश सत्ते विरुद्ध असहकार चळवळीची सुरवात केली होती. त्याकाळच्या लाखो तरुणांप्रमाणे बाळासाहेब खेरदेखील या चळवळीकडे आकर्षित झाले.

मुंबईतूनच १९२२ साली त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली.

त्यांची हुशारी, वक्तव्य आणि विचार यांच्या जोरावर पदार्पणातच त्यांना स्वराज्य पक्षाचे सचिवपद बहाल करण्यात आले. गांधीजींच्या सत्याग्रह चळवळी वेळी त्यांनी दोन वेळा कारावास भोगला. फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात एक सज्जन स्वच्छ चारित्र्याचा गांधी वादी नेता ही ओळख निर्माण झाली.

सविनय कायदेभंग व त्यानंतर झालेला आयर्विन करार, गोलमेज परिषद याचा परिणाम ब्रिटिशांनी भारतीयांना काही प्रमाणात सत्तेत सहभागी  घेण्यासाठी १९३५ साचा इंडिया ऍक्ट लागू केला.

या कायद्या अनुसार काही सुधारणा केल्या आणि त्यानुसार प्रांतांना काही अंशी स्वायत्तता बहाल करण्यात आली.

मुंबई प्रांताचे विभाजन होऊन सिंध प्रांत वेगळा करण्यात आला. नव्या मुंबई प्रांतात निवडणुका झाल्या आणि त्यात कॉंग्रेस पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. ८८ सीट्स निवडणून आल्या.

या विजयाचे शिल्पकार बाळासाहेब खेर हे मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री (काही वेळा पंतप्रधान असाही उल्लेख आढळतो) झाले. 

मोरारजी देसाई, कन्हैयालाल मुन्शी वगैरे मंडळी त्यांच्या मंत्रिमंडळात होती. मुंबई प्रांताला पहिल्यांदा सुशासन काय असते याचा आदर्श बाळासाहेब खेर यांनी घालून दिला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश कसा चालणार आहे याची झलक दाखवून दिली.

सुमारे दोन वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविल्यानंतर ऑक्टोबर १९३९ साली काँग्रेसने त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले. दुसऱ्या महायुद्धात भारताला ओढल्याचा निषेध करत काँग्रेस ने सगळ्या प्रांतीय कायदेमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. 

मुख्यमंत्रीपदाची वस्त्रे नदीत बुडवून बाळासाहेब खेरांनी पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.

पुन्हा त्यांना अटक झाली. इंग्रजी केलं मधून बाहेर पडतात तेवढ्यात ४२ चे चले जावं आंदोलन सुरु झाले. काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह बाळासाहेब खेर हे पुन्हा कारावासात गेले.

पुढे त्यांची सुटका झाली. ब्रिटिशाना जाणीव झाली होती की या देशात आणखी जास्त काळ अशक्य आहे. त्यांनी सुधारणेचा नवा हफ्ता भारतीयांना दिला. १९४६ साली पुन्हा प्रांतीय निवडणूका झाल्या. काँग्रेसने मुंबई प्रांतावर पुन्हा  गाडला. बाळासाहेब खेर यांचीच मुख्यमंत्री पदी निवड झाली.

पुढे स्वातंत्र्यानंतरही  ते मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्रीपदी राहिले. त्यांच्याच काळात महाराष्ट्रात अनेक शैक्षणिक सुधारणा झाल्या. एक  प्रशासक, समाजकार्य करणारा कार्यकर्ता, शिक्षणतज्ञ या नात्याने त्यांनी महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यांची पायाभरणी केली.

पुणे विद्यापीठ ही त्यांचीच देण आहे.

त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत हिंदू खाटीक समाजातल्या भटक्या व विमुक्त जमातीतल्या कुटूंबाना राहण्यासाठी मुंबईत बांद्रा पूर्व येथे जागा सोडण्यात आली होती.  ती वाडी  राजस्थानी हिंदू खाटिकांची वस्ती असल्यामुळे पूर्वी ‘चमडेवालाकी वाडी’ म्हणून ओळखली जात होती.

खेर यांनी त्यांच्यासाठी तेथे खूप सामाजिक कार्य केले. त्याची कृतज्ञता म्हणून या वस्तीला ‘खेरवाडी’ हे नाव पडले. 

बाळासाहेबांना त्यांच्या साध्या आणि विनयशील स्वभावामुळे संपूर्ण भारतीय राजकारणात त्यांना सज्जन म्हणून ओळखले जायांचे. त्यांना राजकारणात विरोधक असे कधी नव्हतेच. ते अतिशय उत्तम वक्ते होते. त्यांच्या भाषणात खुसखुशीतपणा असायचा. एरवी बोलतानाही ते मिस्कील टीका-टिप्पणी करण्यात प्रसिद्ध होते.

महात्मा गांधीपासून ते मुंबईतलय काँग्रेस कमिटी मध्ये काम करत असलेल्या छोट्या कार्यकर्त्या पर्यंत प्रत्येकाचं मन जिंकायचं कसब त्यांनी साधलं होतं. गाडगेबाबा देखील बाळासाहेबांना आपला लाडका शिष्य मानायचे.  

१९५४ साली पहिल्यांदा नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यात बाळासाहेबांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शेवटच्या काळात ते पुण्यात स्थायिक झाले होते. तेथेच ८ मार्च १९५७ रोजी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली.

त्यांची आठवण म्हणून पुणे विद्यापीठाच्या इमारतीचे नाव खेर भवन असे आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.