टूर डी फ्रान्सच्या देखील तोंडात मारणारी मुंबई पुणे घाटाचा राजा सायकल स्पर्धा

एककाळ सायकलींचा होता. रस्त्यावर सायकलींचं राज्य असायचं. शाळेला जाणाऱ्या पोरांपासून ते सरकारी कचेरीत कामाला जाणाऱ्या नोकरदारापर्यंत प्रत्येकाला सायकल प्रिय होती. पुण्याला तर जगभरात सायकलींचं शहर म्हणून ओळखलं जायचं.

मग पुढच्या काळात सायकल अडगळीत पडली. त्याच्याशी जोडलेल्या गोड आठवणी उरल्या.

अशीच एक पुण्या मुंबईच्या सायकलकरांना अभिमानाची आठवण म्हणजे घाटाचा राजा

गोष्ट आहे स्वातंत्र्यापूर्वीची. मुंबईत एक सिडनी चोर्डर नावाचा अँग्लो इंडियन खेळाडू होता. स्पर्धांच्या निमित्ताने त्याची अनेकदा युरोप वारी व्हायची. तिथे त्याने तुफान चुरशीने चालणारी सायकल स्पर्धा पाहिली होती.

साधारण एकोणिसाव्या शतकापासून इंग्लंड युरोपमध्ये रस्त्यावरच्या सायकल शर्यती होत होत्या. यातील टूर डी फ्रान्स ही स्पर्धा सर्वात मानाची समजली जायची. आजही ही रेस जिंकणारा जगातील सर्वोत्कृष्ट सायकलपटू मानला जातो.

सिडनी यांच्या मनात आले की याच धर्तीवर मुंबईला सायकल शर्यत का सुरू करू नये?

१९४५ साली भारतातली पहिली सायकल रेस मुंबई पुणे दरम्यान आयोजित करण्यात आली.

मुंबईच्या काळा घोडा इथे सायकलपटूना झेंडा दाखवण्यात आला. शर्यतीचा शेवट पुण्याच्या शिवाजीनगर येथे झाला. तब्बल २०० किलोमीटरची ही रेस होती. यात खंडाळ्याचा सर्वात अवघड ११ किलोमीटरचा चढा घाट होता.

हा घाट सर्वात कमी वेळेत जो पार करतो त्या स्पर्धकाला घाटाचा राजा हे वेगळे पारितोषिक दिले जायचे.

बऱ्याचदा मुख्य स्पर्धेच्या विजेत्या पेक्षाही घाटाच्या राजाची जास्त उत्सुकता असायची. ९ किलोमिटर अंतरावर १८०० फूट चढायला लावणारा हा बोर घाट जगातल्या सर्वात अवघड सायकल शर्यतीपैकी एक मानला जातो. याच घाटामुळे या शर्यतीला भारतातील टूर डी फ्रांस असंही काही क्रीडा प्रेमी या सायकल रेसला ओळखायचे.

मुंबई पुणे जुन्या महामार्गावर ही रेस व्हायची.

गंमत म्हणजे या रेसवेळी ट्रॅफिक अडवलं जात नव्हते. तसं करणे शक्यदेखील नव्हतं. आधीच अडवळणे असणारा अवघड रस्ता त्यात मुंबई पुण्याचं ट्रॅफिक यामुळे सायकलपटुंच्या स्टॅमिनाची कसोटी लागायची. कित्येकदा सिग्नलचा अडथळा देखील यायचा पण सायकल रेस कधी थांबली नाही.

कितीही अडचनी असल्या तरी हा घाटाचा राजा हे पारितोषिक कमवण्यासाठी कित्येक सायकलपटूंनी बाजी लावायचे.

पुढे काही वर्षांनी सायकल रेसचा मार्ग थोडा बदलून अंतर कमी करण्यात आलं मात्र चुरस कायम राहिली.

संपुर्ण देशभरातून स्पर्धक या स्पर्धेसाठी मुंबईला यायचे.

अशोक कॅप्टन, प्रमोद वाघमारे, बापू माल्कम, कमलाकर झेंडे, अभय जोशी, केरमन फ्रामना, यझदी खंबाटा, होमी भातेना, राजासाहेब अत्तार अशा पट्टीच्या सायकलपटूनी ही स्पर्धा गाजवली.

अशोक खळे यांनी तर  तब्बल चार वेळा घाटाचा राजा हा मान पटकवला होता. त्यांनी तेव्हा फक्त २२ मिनिटात खंडाळ्याचा घाट चढण्याचा विक्रम देखील केला होता.

वयाच्या साठी नंतरही ते मुंबई पुणे अंतर सहज कापायचे. दुर्दैवाने या घाटाच्या राजाचा खंडाळ्याच्या घाटातच सायकलवरून अपघाती मृत्यू झाला.

ही स्पर्धा गाजवणारे अनेक स्पर्धक होते मात्र यातीलच विनोद पुनामिया या अवलिया स्पर्धकाने एकदा डेक्कन क्वीन या भारतातील सर्वात वेगवान रेल्वे पैकी एक असलेल्या एक्स्प्रेस बरोबर २००७ साली रेस लावली आणि जिंकले देखील.

अशा कित्येक कडू गोड आठवणी या सायकल शर्यतीबरोबर जोडलेल्या आहेत. महाराष्ट्र सायकल रेसिंग असोसिएशन ही स्पर्धा आयोजित करते.

आज पन्नासच्या वर वर्षे झाली या रेसची पूर्वीची रया, ग्लॅमर उरले नाही. या स्पर्धेला आणि सायकलला पूर्वीचा मान मिळावा, त्याची ख्याती टूरडी फ्रांसच्याही पलीकडे जावी, सायकलपटूना योग्य बक्षिसे, त्यांना मदत मिळावी एवढीच अपेक्षा सायकलप्रेमी व्यक्त करताना दिसतात.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.