एक काळ असा होता जेव्हा मुंबईत फक्त ७ आणे भाडं असायचं..

मुंबईचं रुप काळानुरूप बदलत गेलं. सुरुवातीला निर्जन असणारे मुंबईचे रस्ते आज २४ तास माणसांनी गजबजलेले असतात. जुन्या सिनेमांमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर किती कमी गर्दी असायची, याची थोडीशी झलक पाहायला मिळते. आता मात्र लोकांच्या गर्दीत शूटिंग करणं हे कुठल्याही दिग्दर्शकासाठी एक आव्हानात्मक काम झालं आहे.

मुंबई हे माणसांनी घडवलेलं एक शहर आहे. आता जरी मुंबईत लोकांची कायम वर्दळ दिसली तरीही एक काळ असा होता की, लोकांना मुंबईत यायला सरकारला आमंत्रण द्यावं लागायचं.

मुंबईत हळूहळू माणसं कशी येऊ लागली याचीच ही गोष्ट.

मुंबई आधी काहीशी निर्जन होती. लोकांची तुरळक वस्ती असायची. मुंबईबाहेर म्हणजे सध्याचं वसई, वांद्रे अशा भागात राहणारी आगरी, कोळी माणसं व्यवसाय आणि बाजाराच्या निमित्ताने मुंबईत यायची. आणि सूर्य मावळायच्या आत पुन्हा घरी परतायची.

मुंबईत त्यावेळी इमारती वगैरे नव्हत्या. काहीसं जंगल आणि झाडंझुडपं असायची. त्यामुळे असंही सांगण्यात येतं की, खूपदा माणसांवर प्राण्यांचे हल्ले व्हायचे. त्यामुळे रात्र व्हायच्या आधी स्वतःच्या घरी जाण्याचा सर्वांचा प्रयत्न असायचा.

१९०० साली ब्रिटिश सरकारने वरळी, नायगाव, शिवडी भागात बॉम्बे इम्प्रुवमेंट टेनामेंट्स (BIT) चाळी उभारल्या.

त्यासोबतच काही खाजगी चाळी उभारण्यात आल्या. आणि त्या चाळींना विशिष्ट व्यक्तींची नावे दिली गेली. त्यामुळे आजही मुंबईतल्या चाळींना त्या चाळींची उभारणी करणाऱ्या विशिष्ट व्यक्तींची नावे असलेली पाहायला मिळतात. उदाहरणार्थ पालनजी रतनजी चाळ, हारूसिंग शोभराज चाळ वगैरे वगैरे. चाळी उभारल्या असल्या तरी चाळीत राहायला माणसं येत नव्हती.

माणसांना जागेबद्दल आकर्षित करण्यासाठी सरकारने शक्कल लढवली. त्या काळी मुंबईत थोडीफार माणसं पोटापाण्यासाठी काहीतरी नोकरी मिळावी, या आशेने येत होती. त्यामुळे अशा माणसांना

‘तुम्ही लग्न करून या ! तुमच्या संसाराला लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा आम्ही तुम्हाला पुरवतो’,

अशी प्रलोभनं चाळ मालकांकडून दिली जाऊ लागली. एखाद्या चाळीच्या जवळच किराणामालाचे वगैरे दुकान असायचं. एखादे दुकान सोडल्यास आजूबाजूला सर्व जंगल असायचं. त्यामुळे प्राण्यांचा हल्ला होण्याची शक्यता अधिक असल्यामुळे संध्याकाळ झाल्यानंतर कोणीही अशा दुकानांमध्ये फिरकायचं नाही.

या कारणामुळे सरकारने जंगल साफ करण्याची मोहीम हाती घेतली आणि जंगलातले प्राणी हळूहळू कमी झाले.

सध्या मुंबईच्या कुठल्याही वस्तीमध्ये राहण्यासाठी असलेल्या जागेचं भाडं हे जास्त असतं. परंतु तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्याकाळात अवघ्या पाच ते सात रुपये भाड्याने टू बीएचके फ्लॅट राहायला मिळत होता.

चाळीमध्ये राहण्यासाठी घर मालक सात आणे इतकं भाडं आकारायचा.

मुंबईत त्यावेळी जागेची कमतरता नव्हती.

यामुळे एक गमतीशीर प्रकार घडायचा. समजा घरमालक भाड्यासाठी सारखा मागे लागला असेल तर, बिऱ्हाड भाडं न देता खुशाल जागा सोडून दुसरीकडे राहायला जायचं. त्यामुळे

‘तुम्ही भाडं कमी द्या पण परत राहायला या’,

अशी विनंती घरमालक भाडेकरुंना करायचा. भाडेकरू जागेत राहत असल्याने घरमालकाला सरकारकडून अनेक सवलती मिळत होत्या. त्यामुळे भाडेकरू जर निघून गेला तर त्या सवलती रद्द होण्याची शक्यता होती.

म्हणून घरमालक भाडेकरुंजवळ जरा नमतं घ्यायचे.

१८५३ साली मुंबई आणि ठाणे या दोन भागांना जोडणारी रेल्वे सुरू झाली होती. मुंबईतल्या इतर भागांना जोडणारा सुद्धा रेल्वेमार्ग काही वर्षांनी सुरू झाला होता. त्याकाळी रेल्वेच्या दोन कंपन्या कार्यरत होत्या. त्यांनी लोकांना मुंबईत बोलावण्यासाठी इंग्रजीमध्ये एक जाहिरात केली होती. त्या जाहिरातीची प्रचंड चर्चा झाली.

‘मुंबई तुम्हाला बोलवत आहे. तुम्ही मुंबईचं जीवन अद्याप अनुभवलं नाही किंवा एखाद्या सिनेमागृहात सिनेमा पाहिला नाही. हा सर्व आनंद घ्यायचा असेल तर रेल्वे तुम्हाला मदत करेल. दुसऱ्या वर्गाचं स्वस्तातले तिकीट खरेदी करून व्हिक्टोरिया टर्मिनस इथे या.’

असं लोकांना आवाहन करणारी ही जाहिरात प्रचंड गाजली.

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, रेल्वेतर्फे लोकांना आमंत्रण देण्यात आलं होतं.

त्याचा परिणाम असा झाला की, व्यापारासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. शहरात हळूहळू उद्योगधंदे सुरू झाले. ठिकठिकाणी व्यवसाय उभारले जाऊ लागले. BIT चाळीनंतर सरकारतर्फे बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट (BDD) या चाळी सुद्धा उभारल्या गेल्या.

गिरण्यांमध्ये काम करणाऱ्या माणसांनी दुसरीकडे राहायला जाऊ नये म्हणून, गिरण्यांच्या बाजुलाच गिरण्यांच्या चाळी निर्माण झाल्या. अशा चाळींमुळे लालबाग-परळ हा भाग अजुनही ‘गिरणगाव’ म्हणून ओळखला जातो. हळूहळू वेगळ्या प्रांतातली माणसं मुंबईत येऊन स्थिरावली. आणि मुंबई गजबजली.

आधी निर्जन असणाऱ्या या शहरात जागांची कमतरता भासू लागली आणि मुंबईची लोकसंख्या वाढली.

कधीकधी आपण ज्या शहरात राहतो ते शहर कसं घडलं याची आपल्याला कल्पना नसते. प्रत्येक गोष्टीला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असते. ती जाणून घेतली की आपल्या शहराचा समृद्धपणा आपल्याला कळून येतो.

मुंबई आता जरी चकचकीत, प्रकाशमान दिसत असली तरी या शहराचा आधीचा असा इतिहास जाणून घेतल्यावर, मुंबई विषयीचं कुतूहल आणखी वाढतं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.