दंगल नियंत्रणात न आल्यामुळं सुधाकरराव नाईकांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची गमवावी लागली होती

सध्या राज्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापलंय. त्याचं कारण ठरतंय त्रिपुरामधला हिंसाचार. राज्यातल्या काही भागांमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि दंगल म्हणलं की १९९२-९३ चा काळ आठवल्याशिवाय राहत नाही.

आयोध्येतली बाबरी मस्जिद पडल्यानंतर उसळलेल्या दंगलीत मुंबईचं मोठं नुकसान झालं. मालमत्तेला तर याचा फटका बसलाच, पण अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. या दंगलीचा आणखी एक गंभीर परिणाम म्हणजे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना दंगलीची परिस्थिती न हाताळता आल्यानं मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

सुधाकरराव नाईक हे राज्याचे १३ वे मुख्यमंत्री. आपले काका व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि मग मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय कारकिर्दीचा आलेख कायम चढता राहिला. पुसद मतदारसंघाचं त्यांनी जवळपास १७ वर्ष प्रतिनिधित्व केलं.

९० च्या दशकाच्या सुरुवातीला तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नरसिंग राव यांच्या नेतृत्वातील केंद्रीय मंत्रीमंडळात त्यांच्याकडे संरक्षणमंत्री पदाची जबाबदारी आली. त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी सुधाकरराव नाईक हे राज्याचे १३ वे मुख्यमंत्री झाले. २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ या कालावधीसाठी त्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलं.

ते मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्यात राजकीय अस्थिरता होती. सुधाकररावांनी मोठ्या प्रयत्नांनी शिवसेनेच्या दहा आणि जनता पक्षाच्या नऊ आमदारांना काँग्रेसमध्ये आणत पक्षाचं संख्याबळ वाढवलं. गुन्हेगारांवरही त्यांनी वचक आणला; मात्र बाबरी मस्जिद पडल्यानंतर देशभरात दंगल उसळली.

त्यानंतर, मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानं सगळं देश हादरलाच पण मुंबईतल्या दंगलीला आणखी हिंसक वळण लागलं.

मुंबईत दोनवेळा दंगल उसळली. डिसेंबर १९९२ बाबरी मस्जिद पडल्यानंतर आठवडाभर दंगल शांत झाली नाही, तर जानेवारी १९९३ मध्ये दहा दिवस दंगलीनं थैमान घातलं. दुर्दैवानं यात ९०० हुन अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

या सगळ्या कालावधीत मुख्यमंत्री म्हणून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात नाईक अपयशी ठरले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यात आलेलं अपयश आणि शरद पवार यांच्या सोबत झालेल्या मतभेदामुळं नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं शरद पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

त्यानंतर नाईक यांची हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. ते वाशिममधून खासदार म्हणून निवडूनही आले. त्यांनी १९९९ मध्ये काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्याचवर्षी नाईक पुन्हा एकदा पुसदचे आमदार म्हणून निवडून आले.

जलसंवर्धनात केलेली महत्त्वाची कामगिरी, गुन्हेगारांवर ठेवलेला वचक यामुळं त्यांची कारकीर्द गाजली. मात्र, दंगल हाताळण्यात आलेल्या अपयशामुळं त्यांना मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द पूर्ण करता आली नाही.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.