मुंबईच्या वाहतुकीचा कणा असलेले ट्रॅफिक मामा कधी पासून आले?

पोलीस…असं म्हंटल की चोर घाबरतात आणि सामान्य माणसं आशेनं बघतात. तसा पोलिसांचा इतिहास खूप जुना आहे पण पोलिसांची नाव मात्र वेगवेगळी, त्या त्या काळानुसार ठरलेली. जसं की, पोलीस हा शब्द शहर किंवा नगरराज्य आणि राज्याची परिस्थिती व राज्यघटना या अर्थांच्या ग्रीक शब्दापासून निघालेला आहे. तो मुलकी राज्यव्यवस्था या अर्थाने पहिल्यांदा तर फ्रेंच भाषेमध्ये रूढ झाला.

पण आज आपण जरा वेगळ्या पोलिसांविषयी जाणून घेणार आहोत.

वेगळे पोलीस म्हणजे ज्या पोलिसांना मुंबईची तरणी पोर ट्रॅफिक मामा म्हणतात. अर्थात ट्रॅफिक पोलीस. तर या ट्रॅफिक पोलिसांचा इतिहास तसा खूप जुना आणि अगदी रंजक आहे. अगदी जसा मुंबईचा आहे ना अगदी तसाच.

तर मुंबई शहरात १८७३ मध्ये बॉम्बे ट्रामवे कंपनीने घोड्यांच्या साहाय्याने ओढली जाणारी ट्राम सेवा पहिल्यांदाच सुरू केली. आता ट्राम सुरु झाली तशी या ट्रामसाठी रस्त्यांवर गर्दी वाढायला लागली. मग  तेव्हापासून मुंबईमध्ये वाहतुक नियंत्रणाची सुरुवात झाली. पुढं प्रगती होत गेली आणि १९०७ साली घोड्यांच्या सहायाने ओढल्या जाणाऱ्या ट्रामची जागा ऑटोमोबाईल ट्रामने घेतली.

जमशेदजी टाटा यांनी १९०१ मध्ये पहिली मोटर कार विकत घेतली. तर  १९०४ मध्ये श्रीमती सुजॅन टाटा यांना मोटारगाडी चालवायचं पहिलं लायसन्स मिळालं.

एव्हाना मुंबईत खाजगी गाड्या वाढू लागल्या होत्या. मग त्यामुळेच टॅक्सी सेवेची सुरुवात झाली. आता मुंबईचे रस्ते त्याकाळात इतके मोठे नव्हते की, गाड्या, घोडा, मोटार वाहने आपले आपलेच नियम पाळतील. या सगळ्यांना नियम पाळायला लावणारी यंत्रणा हवी होती. त्या यंत्रणेची व्यवस्था करणारा पहिला पीएलसीएल कायदा सन १९२० मध्ये ब्रिटिशांनी तयार केला.

ब्रिटिश पोलीस दलात असणाऱ्या सर पॅट्रिक यांनी पुढं १९२४ मध्ये मुंबईत पहिल्यांदाच वाहतुक नियंत्रण कक्षाची सुरुवात केली. या नियंत्रण कक्षात १ प्रभारी निरीक्षक, ३ अधिकारी आणि १५५ अंमलदार कार्यरत होते. हेच ते जुने ट्रॅफिक पोलीस. 

पुढं जसजशी लोकसंख्या वाढू लागली, तशा लोकसंख्येच्या प्रमाणात या ट्रॅफिक नियंत्रण कक्षाच्या मनुष्यबळामध्ये वाढ करण्यात आली. पोलीस उपआयुक्त, मुख्यालय आणि काही काळानंतर पोलीस उपआयुक्त, बंदर परिमंडळ हे एमव्ही युनिटचे प्रमुख झाले.

१९३५ मध्ये वाहतूक शाखेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस उपआयुक्त हे पद निर्माण करण्यात आलं. गर्दी वाढायला लागली तशी १९४० मध्ये मोटार वाहन कायदा १९३९ मंजुर करण्यात आला आणि पहिले पोलीस उपआयुक्त, वाहतुक या पदावर ई शिही यांची नियुक्ती करण्यात आली.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एस लिऑन हे वाहतूक शाखेचे पहिले पोलीस उपआयुक्त बनले. हे पद सन १९५० मध्ये सहायक पोलीस आयुक्त पदात मर्ज करून सहायक पोलीस आयुक्त हे नवं पद निर्माण करण्यात आलं. १९६० मध्ये एम. एस. कसबेकर हे वाहतूक शाखेचे पहिले स्वतंत्र पोलीस उपआयुक्त बनले. त्यानंतर १९८७ मध्ये पी. एस. पसरिचा हे वाहतूक शाखेचे पहिले अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झाले.

वाहतूक नियंत्रण कक्षातली पद तयार होत राहिली, अगदी त्याच पद्धतीत ट्रॅफिक हवालदारांची भरती करण्यात येऊ लागली.

आता वाहतूक शाखेचं कार्यालय हवं म्हणून मंत्रालयाजवळ असलेल्या क्वीन बॅरक्स इथं ट्रॅफीक पोलिसांचं ऑफिस सुरू करण्यात आलं. पुढं १९८७ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी सर पोचखनवाला रोड, वरळी, मुंबई येथील वर्तमान वाहतूक मुख्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन केलं.

अशाप्रकारे मुंबईच्या गर्दीला कंट्रोल करण्यासाठी मुंबईत ट्रॅफिक मामा आले. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.